अभिनेत्री श्रीलीला तिच्या एका वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. “जबाबदाऱ्या टाळण्यासाठी मासिक पाळीचे कारण देऊ नये,” असं तिने म्हटलं आहे. तिच्या या विधानामुळे सोशल मीडियावर अनेकांनी संताप व्यक्त केला असून, काहींनी तर तिच्या ‘डी.वाय. पाटील विद्यापीठा’तील एमबीबीएस पदवीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

मासिक पाळीचे कारण देऊ नका – श्रीलीला

पवन कल्याणच्या ‘उस्ताद भगत सिंग’ चित्रपटाच्या सक्सेस पार्टीमध्ये महिलांच्या आव्हानांवर बोलताना श्रीलीला म्हणाली, “माझ्या गाण्यांचं खूप कौतुक झालं आहे. मी माझ्या मासिक पाळी दरम्यानही गाण्यांचे शूटिंग केलं आहे, त्यामुळे पाळी हे काही कारण असू शकत नाही. जेव्हा आपण सत्तेत समान हक्क मागतो, तेव्हा आपल्याला शारीरिक अडथळ्यांच्या पलीकडे जाऊन काम करावं लागेल असं मला वाटतं. त्यामुळे मानसिक किंवा शारीरिक, असे कोणतेही कारण चालणार नाही.”

नेटकऱ्यांनी व्यक्त केली नाराजी

श्रीलीलाच्या या भाषणाची क्लिप व्हायरल होताच इंटरनेटवर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. रेडिट प्लॅटफॉर्मवर युजर्सनी तिच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली. एका युजरने लिहिलं, “ही कसली डॉक्टर? तिला याबद्दल काहीच माहिती नाही का आणि लोकांबद्दल सहानुभूती नाही का? तिने खोटी शपथ घेतली आहे.” दुसऱ्या एका युजरने तिच्या पदवीवर शंका घेत म्हटलं, “कृपया तिला डॉक्टर म्हणू नका. ५-६ वर्षे परीक्षांसाठी दिवसरात्र मेहनत करणे आणि तुम्ही श्रीमंत व प्रसिद्ध आहात म्हणून पदवी मिळणं यात खूप मोठा फरक आहे.”

श्रीलीलाच्या भूमिकेवर दुसऱ्या एका युजरने ताशेरे ओढले. “महिला मासिक पाळीचे कारण देऊन काम टाळत नाहीत, जर तसं असतं तर त्या ४ दिवसांत कोणीही कामावर गेलं नसतं. महिला मातृत्वाचंही कारण देत नाहीत, नाहीतर बाळंतपणानंतर त्यांचं करिअर इतकं पुढे गेलं नसतं. त्यामुळे ‘मी एकटीच मासिक पाळी असूनही काम करते’ असं बोलून ‘मी किती श्रेष्ठ’ आहे असं दाखवणं चुकीचं आहे. कोणतीही स्त्री मुद्दाम असं करत नाही. त्या फक्त इतकीच अपेक्षा करतात की ज्या दिवसांत त्यांना वेदना होत असतात, त्या दिवसांत बाहेरील परिस्थितीमुळे त्यांना अधिक त्रास होऊ नये,” असं युजरने म्हटलं.

श्रीलीला नुकतीच झाली डॉक्टर

याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात श्रीलीलाने तिचे वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. तिच्या दीक्षांत समारंभाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. यामध्ये २४ वर्षीय श्रीलीला पदवीदान समारंभाचा गाऊन आणि टोपी परिधान करून स्टेजवर आपली पदवी स्वीकारताना दिसली होती.