रोहित शेट्टी, काजोल या आपल्या आवडत्या व्यक्तींबरोबर शाहरूख खान ‘किंग ऑफ रोमान्स’ या त्याच्या नेहमीच्या लोकिप्रय भूमिकेच्या रूपात प्रेक्षकांसमोर येतो आहे. ‘दिलवाले’सारखे उत्तम व्यावसायिक मसाला असलेल्या चित्रपटांची लोकांना आपल्याकडून अपेक्षा आहेच, असे चित्रपट नाव-पैसा मिळवून देतात जे गरजेचे आहे. तरीही कारकिर्दीच्या या टप्प्यावर ‘दिलवाले’सारख्या चित्रपटांवर मेहनत घेत असताना आता ‘फॅ न’ आणि ‘रईस’ असे वेगळे प्रयोग करण्याची संधी देणारे चित्रपट ही आपली गरज असल्याचे शाहरूख खानने सांगितले.
सरत्या वर्षांत मनोरंजनाचा धमाका उडवून द्यायचा हा शाहरूखचा नेहमीचा कित्ता तो यावेळी ‘दिलवाले’च्या निमित्ताने गिरवतो आहे, मात्र आपले लक्ष पुढच्या वर्षी प्रदर्शित होणाऱ्या ‘फॅ न’ या महत्त्वाकांक्षी चित्रपटाकडे असल्याचे शाहरूखने ‘रविवार वृत्तांत’शी बोलताना सांगितले.
साचेबद्ध भूमिका करायला मला स्वत:ला आवडत नाही, असे शाहरूख सांगतो. रोमँटिक हिरोच साकारायचा असता तर कारकिर्दीच्या सुरुवातीलाच ‘बाजीगर’, ‘डर’, ‘माया मेमसाब’सारखे चित्रपट केले नसते, असे तो म्हणतो. प्रत्येक चित्रपटागणिक भूमिकेत वैविध्यपूर्ण काम करता यावे, अशी इच्छा असतेच, पण व्यावासायिक चित्रपटांचेही आपले एक गणित असते आणि ते त्याच पद्धतीने पूर्ण करावे लागतात. ‘रा. वन’ सारखा सुपर हिरोपट करण्यासारखे काही प्रयोग करायचे आहेत, पण अशा चित्रपटांना खूप वेळ द्यावा लागतो. ‘रेड चिली एंटरटेन्मेट’ या आपल्या कंपनीला अ‍ॅनिमेशन-व्हीएफएक्स क्षेत्रात मोठं करायचं हे आपलं स्वप्न असल्याचं तो म्हणतो. ‘रेड चिली एंटरटेन्मेट’ची आपली टीम खूप उत्तम असल्याने त्यांच्याबरोबरीने ते काम जोरात सुरू आहे, असे तो म्हणतो.
पन्नाशीत पोहोचलेला हा बॉलीवूडचा ‘बादशाह’ आता कुठे ‘फॅ न’ आणि ‘रईस’सारख्या आशय-तंत्राच्या दृष्टीने त्याच्या आत्तापर्यंतच्या चित्रपटांपेक्षा वेगळ्या असलेल्या भूमिकांवर लक्ष केंद्रित क रतो आहे. बॉलीवूडच्या या ब्रॅण्ड ‘एसआरके’चा वारसा पुढे कोण नेणार? याबद्दल तो विचार करू इच्छित नाही. आपला मुलगा आर्यन याला अभ्यासात जास्त रस आहे आणि त्याने त्याला हवे ते शिक्षण पहिल्यांदा घ्यावे, असाच सल्ला आपण त्याला दिल्याचे शाहरूखने सांगितले. सुहानाला अभिनयात रस आहे, पण त्यांना अभिनय क्षेत्रातच आणण्याची घाई आणि अट्टहासही आपण करणार नसल्याचे त्याने सांगितले. प्रेक्षकांची बदलती अभिरुची, वयानुसार आलेले शहाणपण या सगळ्याचा मिलाफ म्हणून आता बादशाहाने कारकिर्दीला वेगळे वळण देण्याची धडपड सुरू केली आहे. तरीही ‘दिलवाले’ ही त्याची लोकांच्या मनातील प्रतिमा जास्त उजवी ठरते की त्याचे येणारे चित्रपट प्रेक्षकांना जास्त भावतात, याचे उत्तर पुढच्या वर्षभरात नक्की मिळेल.

रोहित शेट्टीबरोबर ‘चेन्नई एक्स्प्रेस’ केल्यानंतर त्याच्याबरोबर पुन्हा चित्रपट करायचा हे समीकरण ठरलेले होते. त्यामुळे ‘दिलवाले’चा घाट घातला गेला. या चित्रपटात मी अ‍ॅक्शन हिरो म्हणून लोकांसमोर येण्याचा प्रयत्न करतो आहे. यावेळी विनोदाबरोबरच काहीतरी ‘फास्ट अँड फ्युरिअस’ स्टाइल धमाका करायचा होता. त्यामुळे ‘दिलवाले’मध्ये गाडय़ा, रेसिंग, हॉलीवूड स्टाइल हाणामारी या सगळ्या इच्छा पूर्ण क रून घेतल्या.. तुम्ही रोहितकडून गंभीर विषयावरच्या सिनेमाची अपेक्षा करू शकत नाही. दिग्दर्शक म्हणून हलकेफुलके किंवा अ‍ॅक्शनपट करण्यावर त्याचा भर आहे. मला स्वत:ला त्याच्याबरोबर अशा जॉनरचे चित्रपट करायला आवडतात, मात्र रोहितला सगळेजण ‘अ‍ॅक्शन’साठी ओळखतात ते आपल्याला मान्य नाही. रोहित बाहेरून कितीही रफ -टफ वाटला, तो अ‍ॅक्शन मास्टर म्हणून प्रसिद्ध असला तरी तो खूप प्रेमळ आणि मनस्वी आहे. त्याला सेटवर एकमेकांशी गमतीजमती करायला आवडतात, तो आतून जास्त रोमँटिक आहे.

काजोल आणि मी.. आमच्यात केमिस्ट्री वगैरे काही नाही. ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ हा चित्रपट करतानाही काजोल तशीच होती. लहान मुलांसारखी वागायची, पण कॅमेऱ्यासमोर आली की ती त्याच सहजपणे भाव खाऊन जायची. त्यावेळी ती खूप समर्थ अभिनेत्री वगैरे आहे असा काही विचार करून यश चोप्रांनी तिला भूमिका दिली नव्हती. आज इतक्या वर्षांनंतर ‘दिलवाले’ करतानाही काजोलचा स्वभाव हा असा लहान मुलांसारखाच आहे. तिच्या स्वभावातला जो अवखळपणा आहे तो तिने अजून जपलेला आहे, तिचा स्वभाव एकदा समजून घेतला की काम करायला कधीच अडचण येत नाही. आमच्या दोघांमध्येही ती सहजता असल्याने कदाचित इतरांपेक्षा पडद्यावर ते जास्त खुलून दिसत असेल..