सुप्रसिद्ध स्टॅण्डअप कॉमेडियन वीर दासची मोठी फसवणूक झाली आहे. एका व्हिडीओच्या माध्यमातून त्याच्याबरोबर झालेल्या फसवणुकीची पूर्ण हकीकत त्याने समाज माध्यमांवर मांडली आहे. वीरने अॅप्पल कंपनीचं एक महागडं घड्याळ विकत घेतलं, ज्याची किंमत ५० हजार रुपये आहे. मात्र डिलिव्हरी झाल्यावर जे घड्याळ त्याला मिळालं ते अॅप्पल कंपनीचं नव्हतंच! हे घड्याळ दुसऱ्याच कोणत्यातरी एका चिनी ब्रॅण्डचं असल्याचं वीरने सांगितलं आहे. वीरने त्या घड्याळाचे फोटो आणि त्याच्या पॅकेजिंगचे फोटो समाजमाध्यमांवर प्रसारित केले आहेत. या घड्याळावर चिनी निर्मितीचा उल्लेख असल्यामुळे ही गोष्ट अधिकच स्पष्ट होते असेही वीर म्हणाला.

‘झेप्टोने चिनी वस्तू विकण्याचा घोटाळा सुरू केलाय का?’ – वीर

वीरने ग्राहक प्रतिनिधींशी संवाद साधण्याचादेखील प्रयत्न केला पण तोदेखील सुरुवातीला असफल ठरला. वीरने या घटनांचे सविस्तर वर्णन आपल्या पोस्टमध्ये केले आहे. तसेच त्याने हेही सांगितले की, झेप्टोच्या प्रतिनिधीने ते या बाबत काहीही करू शकत नाहीत असे कळवले. झेप्टोकडून मिळालेल्या या वागणुकीनंतर वीर इन्स्टाग्रामवर लिहितो…

“चूक नेमकी माझी आहे की झेप्टोची? झेप्टोने चिनी वस्तू विकण्याचा घोटाळा सुरू केला आहे का? मला तात्काळ एका शूटसाठी हे घड्याळ हवं होतं, म्हणून मी आगाऊ पैसे भरून अॅप्पलचं हे घड्याळ विकत घेतलं… अॅप्पलची घड्याळंही अशीच दिसतात का? मी कधीही वापरलं नाही म्हणून विचारतोय, कृपया सांगावे.” झेप्टो स्टोअर्स ऑफिशियल आणि कैवल्य वोहरा यांना टॅग करून इन्स्टाग्रामवर या पोस्टस् केल्या आहेत. हाच व्हिडिओ त्याने त्याच्या ‘एक्स’च्या खात्यावरदेखील पोस्ट केला.

नेटिझन्सच्या प्रतिक्रिया

त्याच्या या पोस्टनंतर तात्काळ इतर नेटिझन्सनेही पटापट त्यांच्या तक्रारी शेअर करायला सुरुवात केली. “मीदेखील एअरपॉड्स – ४ विकत घेतले होते, मलाही तोच त्रास अनुभवावा लागत आहे. अनेकदा तक्रार केल्यानंतरही समोरून काहीच प्रतिसाद आला नाही, त्यामुळे तुमचं म्हणणं कदाचित खरं असू शकेल”, असं एका एक्स वापरकर्त्याने सांगितले. एक वापरकर्ता म्हणाला, “घड्याळाच्या मागच्या बाजूला असलेला फॉन्ट पाहिल्यावर लगेच स्पष्ट होतं की, हे घड्याळ नकली आहे.” एक वापरकर्ता तर थेट असंही म्हणाला, “तुम्ही समाजमाध्यमांवर व्यक्त झाल्याशिवाय झेप्टोची माणसं तुमचं म्हणणं कधीही ऐकणार नाहीत.”

झेप्टोचे स्पष्टीकरण…

झेप्टोच्या एका प्रवक्त्याने इंडियन एक्सप्रेसला याविषयी सांगितले, वीर दासचा रिव्हर्स पिक-अप नियोजित करण्यात आला असून कंपनी याविषयी सखोल तपास करत आहे. झेप्टोचे प्रवक्ते अधिक माहिती देताना म्हणाले, “अशा बाबींकडे आम्ही गांभीर्याने लक्ष देतो आणि आमच्या ग्राहकांसाठी रिव्हर्स पिक अपची व्यवस्थादेखील करतो. आमच्या ब्रॅण्ड पार्टनर्सशीदेखील याविषयी आम्ही चर्चा करतो. महागड्या वस्तूंसाठी, आम्ही ग्राहकांना ओटीपी (वन टाईम पासवर्ड) पाठवतो. अशा वेळी ग्राहकांनी नीट पॅकेट पाहून ते सीलबंद आहे याची शहानिशा करून ते चांगल्या स्थितीत असल्यासच स्वीकारावे.” आम्ही सध्या या घटनेचा नीट तपास घेत आहोत आणि लवकरच आम्ही योग्य ती कार्यवाही करू, असेही प्रवक्त्यांनी सांगितले.