scorecardresearch

“…तर एखाद्याने आत्महत्या केली असती”, सहकलाकारांच्या आरोपानंतर किरण माने संतापले

तसेच महिलांशी गैरवर्तन यावर मी काहीतरी निश्चितच कारवाई करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

kiran mane

अभिनेते किरण माने यांना कोणतीही पूर्वसूचना न देता ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून काढून टाकले. यानंतर राजकीय भूमिका घेत असल्याचे कारण देत ही कारवाई करण्यात आली, असा आरोप किरण माने यांनी केला होता. दरम्यान स्टार प्रवाह वाहिनीने किरण माने प्रकरणी लेखी स्पष्टीकरण दिलं आहे. तसेच मालिकेतील सहकलाकारांनी त्यांनी सेटवर गैरवर्तन केल्याचे सांगितले आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणानंतर किरण माने यांची प्रतिक्रिया दिली आहे.

किरण माने यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महिलांशी गैरवर्तन म्हटले तर माणूस पूर्ण बॅकफूटवर जातो. जर असं काही असेल तर मग तक्रार का केली नाही? त्याचवेळी का केली नाही? त्या बायकांनी सहन का केले? एखादी मुस्काटात का दिली नाही? असे अनेक सवाल उपस्थित केले आहेत. तसेच महिलांशी गैरवर्तन यावर मी काहीतरी निश्चितच कारवाई करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

किरण माने यांची प्रतिक्रिया

“एकीकडे काही कलाकार आरोप करत आहेत. तर दुसरीकडे काहीजण मला सपोर्ट करताना दिसत आहे. यावरुनच कुठेतरी पाणी मुरतंय हे स्पष्ट दिसत आहे. हा सांस्कृतिक दहशतवाद आहे. मी पहिल्यापासून सांगत आहे. जर मी असे काही केले असेल तर मग तुम्ही इतके दिवस गप्प का बसलात, काही कारण का देत नाही. मला रितसर लेखी देऊन माझी बाजू मांडायला लावून का काढलं नाही? कुठेतरी हे राजकीय हेतूने झालेले आहे.” असे त्यांनी सांगितले.

साताऱ्यात ‘मुलगी झाली हो’ मालिकेचं शूटींग नियमित सुरु, गैरसमजातून घडला प्रकार, पंचायत समितीने दिली माहिती

“पहिल्यांदा व्यावसायिक कारणांमुळे काढून टाकले असे कारण त्यांनी सांगितले. राजकीय मुद्द्यामुळे मला काढून टाकले असे मी पहिल्यापासून एकच मुद्दा धरुन ठेवला आहे. महिलांशी गैरवर्तन म्हटले तर माणूस पूर्ण बॅकफूटवर जातो. जर असं काही असेल तर मग तक्रार का केली नाही? त्याचवेळी का केली नाही? त्या बायकांनी सहन का केले? एखादी मुस्काटात का दिली नाही? जर मी अपशब्द वापरत असेन तर मग इतर महिला माझी बाजू का घेतात? तो आम्हाला बापासारखा, भावासारखा होता, असे का सांगत आहेत,” असेही त्यांनी यावेळी म्हटले.

“महिलांशी गैरवर्तन यावर मी काहीतरी निश्चितच कारवाई करणार आहे. वकिलांचा सल्ला घेऊन मी खूप मोठी कारवाई करणार आहे. जर मी काही केले होते तर मग तुम्हाला ५० तास का लागले हे स्पष्टीकरण द्यायला. त्या तिघींचा साचा एकच होता बोलण्याचा. तर दुसरीकडे त्या इतर महिलांनी अत्यंत संयमीपणे बोलत आहेत. याचा मालिकेवर परिणाम होईल की नाही माहिती नाही. पण माझ्या आयुष्यावर, करिअरवर परिणाम झाला आहे. एखादा दुसरा असता तर त्याने आत्महत्या केली असती किंवा मी आताही मरु शकतो.” असेही त्यांनी सांगितले.

“मी कलाकार म्हणून…”, किरण माने प्रकरणी ‘स्टार प्रवाह’ने स्पष्टीकरण दिल्यानंतर अभिनेत्री अनिता दातेची प्रतिक्रिया

“मराठी सिनेसृष्टीत बहुजन कलाकारांची गळचेपी होत आहे. मी हे सहन केलं आहे. माझी इमेज स्ट्राँग आहे. मी फार भक्कम आहे. मी कायम सांगतो की मी वाघासारखा आहे. वाघावर चिखल उडवणारी जी विचारधारा आहे त्यांच्यावर मी कारवाई करणार आहे.” असेही ते म्हणाले.

“माझा मुद्दा राजकीय पोस्टचा आहे. ही व्यक्ती म्हणून माझी एकट्याची लढाई आहे आणि विचार म्हणून खूप मोठ्या समूहाची लढाई आहे. ही व्यवस्था माझा बळी घेते की मी जिंकतो हेच मला बघायचे आहे. पण मी खरा माणूस आहे. मी नेहमी खरेच बोलतोय, यात खोटेपणा नाही.” असेही किरण माने यांनी ठणकावून सांगितले.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Star pravah mulgi zali ho serial kiran mane comment after co actors allegations nrp