‘सहर्ष’ सादर आहे.. चार नाटकांची स्पर्धा!

सांस्कृतिक कार्य संचालकांनी स्पर्धेच्या नियमांसंदर्भात घातलेल्या कथित घोळामुळे निर्मात्यांनी या स्पर्धेसंबंधात आक्षेप घेतला होता.

हाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे दरवर्षी घेतली जाणारी व्यावसायिक नाटय़स्पर्धा लागोपाठ दुसऱ्या वर्षी नाटय़निर्मात्यांबरोबरच्या वादात सापडली असून, यंदा स्पर्धेच्या प्राथमिक फेरीतून निवड झालेल्या दहा नाटकांपैकी सहा नाटकांच्या निर्मात्यांनी या स्पर्धेवर बहिष्कार घातल्याने आता उर्वरित केवळ चार नाटकांमध्येच ही स्पर्धा घेण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सोमवार, २ मेपासून या अंतिम फेरीस सुरुवात होईल.
सांस्कृतिक कार्य संचालकांनी स्पर्धेच्या नियमांसंदर्भात घातलेल्या कथित घोळामुळे निर्मात्यांनी या स्पर्धेसंबंधात आक्षेप घेतला होता. गेल्या वर्षी पुनरुज्जीवित नाटकांच्या स्पर्धेतील समावेशावरून काही निर्माते न्यायालयात गेल्यामुळे शासनाने ही स्पर्धाच रद्द केली होती. या वर्षी मात्र शासनाला उपरती होऊन गेल्या वर्षी स्पर्धा रद्द झाल्याने त्या वर्षीच्या नाटकांवर अन्याय होऊ नये म्हणून यंदाच्या स्पर्धेत त्या नाटकांचा अंतर्भाव करण्याचे शासनाने ठरवले. तथापि अशा प्रकारे दोन वर्षांच्या स्पर्धा एकत्र घेण्यास काही निर्मात्यांनी तीव्र आक्षेप घेत शासनाने या निर्णयाचा फेरविचार करावा अशी मागणी केली होती. तशात गेल्या वर्षीची न्यायालयातील प्रलंबित याचिका फेरविचारार्थ दाखल करून घ्यावी म्हणून त्या निर्मात्यांनी पुन्हा कोर्टास विनवले. त्यानुसार न्यायालयाने त्यांची याचिका पुनरुज्जीवित करण्याची विनंती मान्य केली.
या सगळ्या वादंगास सांस्कृतिक कार्य संचालक अजय अंबेकर हे कारणीभूत असल्याचा निर्मात्यांचा आक्षेप होता. दरम्यान, मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी अंबेकरांची सांस्कृतिक संचावक पदावरून त्यांच्या मूळच्या माहिती आणि जनसंपर्क विभागात बदलीचे आदेश काढले. मात्र, आता व्यावसायिक नाटय़स्पर्धा केवळ उर्वरित चार नाटकांमध्येच घेण्याचा निर्णय जाहीर करून शासनाने नाटय़निर्मात्यांच्या कोणत्याही दबावाला आपण बळी पडणार नसल्याचेच स्पष्ट केले आहे. सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनीही नाटय़निर्मात्यांबरोबरच्या या विकोपाला गेलेल्या वादात हस्तक्षेप करून सामोपचाराने काही तोडगा काढण्याचे प्रयत्न केले नाहीत.
उर्वरित चार नाटकांमध्येच अंतिम स्पर्धा घेण्याच्या शासनाच्या या निर्णयासंबंधात प्रतिक्रिया विचारली असता स्पर्धेतील नियमांसंदर्भात आक्षेप घेणाऱ्या नाटय़निर्मात्यांचे म्होरके अजित भुरे यांनी, ज्या क्षणी आम्ही स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला त्याच क्षणी आमचा या स्पर्धेशी संबंध संपला असून आता शासनाने चार नाटकांत स्पर्धा घ्यायची की दोन नाटकांत, हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न असल्याचे म्हटले आहे. तर दुसरे एक निर्माते प्रसाद कांबळी म्हणाले की, ‘आम्ही उपस्थित केलेल्या मुद्दय़ावर कारवाई करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांस्कृतिक कार्य संचालक अजय अंबेकर यांची बदली केली आहे. याचाच अर्थ आमचा निषेध यशस्वी झाला आहे. आता चार नाटकांत त्यांनी स्पर्धा घ्यावी की आणखी कशी, हा शासनाचा प्रश्न आहे. आम्ही या स्पर्धेतून आधीच बाहेर पडलेलो आहोत.’
अ. भा. मराठी नाटय़ परिषदेचे प्रमुख कार्यवाह दीपक करंजीकर यांनी, असले वाद दुर्दैवी आहेत, असे सांगून, सगळ्याच गोष्टी समन्वयाने सोडविता येतात. देशातले समस्त रंगकर्मी महाराष्ट्रातील नाटय़-चळवळीकडे दिशादर्शक म्हणून पाहतात याची नम्र जाणीव आपण सर्वानी ठेवायला हवी, असे म्हटले आहे.

.. तर अंतिम स्पर्धाही धोक्यात!
अ. भा. मराठी नाटय़ परिषदेच्या घटक संस्था असलेल्या कलाकार संघ, रंगमंच कामगार संघटना आणि व्यवस्थापक संघ यांनीही स्पर्धेवर बहिष्कार घालण्याच्या नाटय़निर्मात्यांच्या निर्णयाला सक्रीय पाठिंबा जाहीर केलेला आहे. त्यामुळे अंतिम स्पर्धेत सादर होणाऱ्या चार नाटकांतील कलाकार आणि रंगमंच कामगार आता यासंदर्भात काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. आपल्या संघटनेने घेतलेला स्पर्धेवरील बहिष्काराचा निर्णय त्यांनी शिरसावंद्य मानल्यास स्पर्धेत सादर होणाऱ्या उर्वरित चार नाटकांचे प्रयोगही अडचणीत येऊ शकतील.

व्यावसायिक नाटय़स्पर्धेची अंतिम फेरी बोरीवलीच्या प्रबोधनकार ठाकरे नाटय़मंदिरात २ ते ११ मे या कालावधीत रात्रौ ८ वा. होणार आहे. सोमवार, २ मे रोजी सोनल प्रॉडक्शन्स निर्मित ‘परफेक्ट मिसमॅच’, तर मंगळवार, ३ मे रोजी सोनल प्रॉडक्शन्सच्याच ‘डोन्ट वरी बी हॅप्पी’ या नाटकाचे प्रयोग सादर होतील. शनिवार, ७ मे रोजी जिगिषा आणि अष्टविनायक निर्मित ‘वाडा चिरेबंदी’ या नाटकाचा आणि बुधवार, ११ मे रोजी अष्टविनायक निर्मित ‘श्री बाई समर्थ’ या नाटकाचा प्रयोग सादर होईल. नाटय़रसिकांसाठी रु. ५० आणि रु. ३० इतक्या कमी किमतीत स्पर्धेतील या नाटकांची तिकिटे उपलब्ध करण्यात येत आहेत, तरी त्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालकांनी केले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: State commercial theater competition

ताज्या बातम्या