scorecardresearch

‘क्षितिज’भरारी

काळानुसार भवतालातील बदल टिपत, आपल्या कथांतून ते मांडायचे. नव्या-जुन्या हरएक माध्यमातून व्यक्त होत एकीकडे आपल्या लेखनाच्या कक्षा विस्तारायच्या, त्याच वेळी प्रेक्षकांनाही नवा काही आशय देत राहायचा ही तारेवरची कसरत.

रेश्मा राईकवार

काळानुसार भवतालातील बदल टिपत, आपल्या कथांतून ते मांडायचे. नव्या-जुन्या हरएक माध्यमातून व्यक्त होत एकीकडे आपल्या लेखनाच्या कक्षा विस्तारायच्या, त्याच वेळी प्रेक्षकांनाही नवा काही आशय देत राहायचा ही तारेवरची कसरत. चित्रपट लेखक, गीतकार म्हणून नावलौकिक कमावल्यानंतर तेवढय़ापुरते मर्यादित न राहता सतत स्वत:ला नवनव्या प्रांतात अजमावत पुढे राहण्याची ही शब्दांवरची कसरत क्षितिज पटवर्धन हा मराठमोळा लेखक मनापासून करतो आहे. ‘आधी नींद आधा ख्वाब’ हा त्याचा पहिलाच हिंदूी काव्यसंग्रह प्रकाशित झाला आहे. हिंदूी चित्रपट, वेबमालिका लेखनापर्यंत विस्तारलेला त्याचा प्रवास, लेखनाच्या मुशाफिरीतील त्याचे अनुभव सांगताना गल्लीत राहणाऱ्याला एकदम महामार्गावर उभं केलं तर काय होईल, याचा अनुभव घेतो आहे असं तो गमतीने सांगतो.

या काव्यसंग्रहाच्या निमित्ताने त्याने भाषेचंही सीमोल्लंघन केलं आहे, पण ही उडी जाणीवपूर्वक घेतलेली नाही, असं तो स्पष्ट करतो. या कविता हिंदूीतच सुचत गेल्या हे सांगत असतानाच त्याच्या ओठी कवितेच्या ओळी रुळू लागतात. ‘मेरी हसीं मे भी मायूसी जान लेता है यह शहर, मेरे हालात पेहचान लेता है.. रास्ते मे भीड बढ जाती है अचानक, यह चुपकेसे गली कोई सुनसान देता है.. हे हिंदूीतच सुचत गेलं असं तो म्हणतो. गेली कित्येक र्वष हिंदूी भाषेवर मेहनत घेत असल्याने हे लिखाण हिंदूीतच अधिक चांगलं करू असा विचार केला. ठरवून नाही पण जे जे डोक्यात आलं ते करत गेलो, असं त्याने स्पष्ट केलं. हिंदूीत सुरू झालेला त्याचा प्रवास वेगवेगळय़ा माध्यमांतून चौफेर सुरू आहे. त्याने लिहिलेलं ‘फिसल जा तू’ हे पहिलं हिंदूी गाणं ‘हसीन दिलरुबा’ या तापसी पन्नूच्या चित्रपटातून प्रसिद्ध झालं. हिंदूी लेखनाचा हा प्रवास तितका अवघड नव्हता, याचं कारण आपलं पोषणच मुळी हिंदूी चित्रपट आणि गाण्यांवर झालेलं असतं, असं तो म्हणतो. ‘‘हिंदूी साहित्याची जाण तेवढी नव्हती. नाटक करायला लागल्यापासून हिंदूी नाटकेही वाचत गेलो. त्यातून हिंदूी साहित्य कळलं, नाटककार कळले, कवी कळले. मुंबईत मुशायरे ऐकले, राहत इंदौरी असतील, वसीम फरेबी, मंजर भोपाली असतील यांची शायरी, कविता ऐकत गेलो. त्यामुळे हिंदूी भाषेची समजही वाढत गेली. एरवी आपण मराठीपुरतेच मर्यादित राहायचा प्रयत्न करतो. पुलंनी एकदा भाषणात म्हटलं होतं की, जो स्वत:च्या भाषेवर खरं प्रेम करतो तो दुसऱ्या भाषेवरही प्रेमच करतो. त्यामुळे हिंदूीत इतकं चांगलं साहित्य आहे, त्याचाही आस्वाद घ्यायला हवा असं माझ्या मनाने घेतलं. आणि खूप मजा आली हिंदूी भाषेत काम करताना..’’ असं सांगणाऱ्या क्षितिजने संगीतकार अमित त्रिवेदींबरोबर आगामी हिंदूी चित्रपटासाठी गाणी लिहिली आहेत.

गाणी लिहिणं हे मराठीपेक्षा हिंदूीत अधिक सोपं आहे, असं तो म्हणतो. ‘‘हिंदूीत गाणं लिहिताना अनेक बोलीभाषांचा वापर करता येतो. पंजाबीचा खरं तर अतिरेक झाला आहे, पण ते बाजूला ठेवलं तरी भोजपुरी, ब्रिज भाषा, अवधी, उर्दू, संस्कृत अशा किती तरी भाषांतील शब्दांचा हिंदूीत गाणं लिहिताना उपयोग करून घेता येतो,’’ असं त्याने सांगितलं. मात्र हिंदूी चित्रपटसृष्टीत काम करणं हा सर्वार्थाने वेगळा अनुभव आहे असं तो म्हणतो. तो सध्या हिंदूीत एका नावाजलेल्या निर्मिती संस्थेसाठी दोन चित्रपट लिहितो आहे. ‘‘गेले आठ महिने मी हे चित्रपट लेखनाचं काम करतो आहे. मराठीत काम करताना एक घरगुतीपणा असतो. कित्येकदा आम्ही एकत्र कुटुंबासारखे होतो, त्यामुळे काम करताना मजा आली, असं प्रत्येकाच्या तोंडून ऐकायला मिळतं. हिंदूीत काम करताना व्यावसायिकपणा जास्त असतो. इथेही मजा करतात, पण व्यावसायिकपणाच्या चौकटीत राहून काम केलं जातं. दुसरा महत्त्वाचा फरक म्हणजे इथे तुमचं काम आणि तुमचा वेळ याला मिळणारं मूल्य खूप जास्त आहे. इथे कामाचा मोबदला म्हणजे मान आणि धन दोन्ही चांगलं असतं आणि तुमचं काम मोठय़ा परिघापयर्म्त पोहोचत असल्याने तुमचे विचार बदलतात, दृष्टिकोन बदलतो. तुम्हाला कामाचा तो वेग, स्वरूप सगळय़ाशी जुळवून घेत आपल्याकडचं सर्वोत्कृष्ट द्यायचं असतं,’’ असं तो सांगतो.

क्षितिजची सुरुवात ही एकांकिका लेखनापासून झाली आहे. नाटक केल्याचा खूप फायदा हिंदूीत काम करताना होतो, असं तो सांगतो. आपण ज्या नाटय़मय पद्धतीने पटकथा ऐकवतो ते त्यांना खूप भावतं. एकच व्यक्ती वाचनातून पाच-सहा व्यक्तिरेखा उभ्या करत असते. पूर्वी जे आम्ही नाटय़वाचन स्पर्धेत भाग घ्यायचो, त्याचा आता इथे फायदा होतो हे कबूल करायला हवं, असं सांगतानाच हिंदूीत चित्रपट लेखनाची प्रक्रियाही वेगळी आणि रंजक असल्याचे त्याने सांगितलं. ‘‘मी आत्तापर्यंत माझे चित्रपट एकटय़ानेच लिहिले आहेत. माझ्याबरोबर समीर विद्वांस असायचा. इथं आम्ही तीन लेखक एकत्र मिळून काम करतो आहोत. त्यात एक आमची लेखिका परदेशात आहे, एक मूळची बिहारची आहे, मी स्वत: पुण्याचा आहे. तर आमचा दिग्दर्शक अहमदाबादचा आहे. असे चार लोक एकत्र मिळून काम करतात तेव्हा अगदी छोटय़ा छोटय़ा तांत्रिक बाबींपासून ते तुमच्या कलेपर्यंत खूप काही शिकायला मिळतं,’’ असं तो म्हणतो. मराठीत मी अकरा चित्रपट केल्यानंतर मला हव्या त्या कलाकारांना मी चित्रपटासाठी विचारू शकतो. तेही कधी माझ्यावरच्या प्रेमापोटी किंवा त्यांना कथा आवडली म्हणून काम करायला तयार होतात. हिंदूीत तुम्हाला तसं कोणीही ओळखत नाही आणि तुम्ही मराठीत आधी काय केलं यांच्याशी त्यांना देणंघेणं नसतं. पुढच्या दोन तासांत तुम्ही तुमच्या कथेतून आमच्यावर किती प्रभाव पाडू शकता, हा एवढाच मुद्दा असतो. एक प्रकारे तुमचं नव्याने प्रशिक्षण इथे सुरू होतं. तुमच्या सोईच्या किंवा सवयीच्या जगातून बाहेर पडून नवं आव्हान पेलण्याची ही अनुभूती खूप सुखद आहे, आनंददायी आहे, अशी भावना त्याने व्यक्त केली.

लेखक म्हणून काम करत असताना हिंदूीतही खूप फरक पडल्याचा अनुभव त्याने सांगितला. हिंदूीत स्टारची व्याख्या आता बदलली आहे. त्यांनाही स्टारपण टिकवून ठेवण्यासाठी उत्तम कथेची गरज लागते, असं क्षितिज सांगतो. त्यामुळे आता ज्याच्याकडे उत्तम कथा आहे, त्याच्या मातीतली कथा आहे तो खरा स्टार आहे, असं क्षितिज सांगतो. आपल्या मातीतल्या पण जागतिक दर्जा असलेल्या ‘झुंड’सारख्या कथा सांगणं ही आजच्या काळाची गरजही क्षितिज अधोरेखित करतो.

‘आधी नींद आधा ख्वाब’ हा काव्यसंग्रह म्हणजे मुंबईत आल्यानंतर टिपलेला इथल्या शहराचा चेहरा आहे. २०१० मध्ये मी पुण्याहून मुंबईत आलो तेव्हा मुंबईबद्दल काही कल्पना होत्या. हळूहळू लक्षात आलं की त्या चुकीच्या होत्या. तिथे बसून आपण या शहराबद्दल जसा विचार करतो तसं ते नाही आहे. मग जसजसं हे शहर शोधत गेलो, तशा लोकांच्या ओळखी वाढत गेल्या. विविध जातीधर्माची, समाजाची माणसं भेटत गेली आणि परीघ विस्तारत गेला. इतरांच्या जगण्याचा संघर्ष जवळून अनुभवता आला. जे शहर इतक्या जणांना संघर्ष करण्यासाठी प्रेरणा देतं अशा शहराबद्दल त्या त्या वेळी आपल्याला जे जे वाटतं ते  लिहिणं गरजेचं आहे असं वाटू लागलं आणि त्यातून ही कल्पना साकारत गेली. सात वर्षांत मी दहा घरं बदलली, प्रत्येक घर हे एक वेगळं उपनगर होतं. या दहा वर्षांत ही उपनगरंही खूप बदलली. मेट्रोचं एक जाळं आलं, कुठे आगी लागल्या.. घटना घडत होत्या. शहरं बदलत होती. हे शहराचे बदलते चेहरेमोहरे टिपण्याचा प्रयत्न म्हणजे हा काव्यसंग्रह.-क्षितिज पटवर्धन

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Stories environment writing audience film writer lyricist anthology amy