रेश्मा राईकवार

कोणतीही नक्कल न करता स्वत:च्या कल्पनेतून, विचारातून उतरलेली कथा. सद्य:स्थितीत राजकीय – सांस्कृतिक – सामाजिक पटलावर जिथे कुठे आपलीच भलामण करण्यात मग्न असलेल्या कित्येकांना प्रतीकात्मक पद्धतीने पण थेट सवाल विचारण्याची लेखक-दिग्दर्शक म्हणून असलेली आर. बाल्की यांची ताकद या दोन दुर्मीळ गोष्टींची अनुभूती ‘चूप : रिव्हेंज ऑफ द आर्टिस्ट’ पाहताना येते.

या चित्रपटाबद्दल बोलताना नाही म्हटलं तरी त्यातला आशय आणि सगळे प्रसंग आठवून चित्रपट समीक्षकांच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. त्याचं कारण म्हणजे हा चित्रपट एका विकृत मनोरुग्णाची कथा सांगतो. हा मनोरुग्ण शहरातील चित्रपट समीक्षकांना मारत सुटला आहे. चित्रपटांना एक, दोन, तीन.. चार किंवा त्याहून अधिक किती ‘स्टार’ समीक्षक देतो आहे त्यावर कटाक्षाने लक्ष ठेवणारा हा मनोरुग्ण त्यांना मारून तेवढे स्टार त्यांच्या डोक्यावर कोरत सुटला आहे. ज्या पद्धतीने या हत्या घडवण्यात आल्या आहेत, त्या अत्यंत निर्दयीपणे, थंड डोक्याने आणि त्या घटनेची मजा घेत केलेल्या निर्घृण हत्या आहेत. चित्रपट समीक्षकच का? हे हत्यासत्र आरंभणाऱ्या या मनोरुग्णाचा चित्रपटांशी किंवा समीक्षकांशी काय संबंध? तो चित्रपटसृष्टीतला आहे की बाहेरचा आहे?  असे असंख्य प्रश्न या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकारी अरविंद माथुर (सनी देओल) यांच्यासमोर आहेत. या व्यक्तींना मारण्यासाठी वापरण्यात येणारे विशिष्ट प्रकारचे प्लॅस्टिक आणि एकापाठोपाठ एक झालेल्या चित्रपट समीक्षकांच्या हत्या.. एवढय़ा दोनच गोष्टींची माहिती पोलिसांच्या हातात आहे. हा गुंता नेमका कसा सुटतो? एकापाठोपाठ एक आपल्याच जमातीतल्या लोकांची हत्या होते आहे म्हटल्यावर माध्यमकर्मी आणि पर्यायाने चित्रपट समीक्षक काय भूमिका घेतात? अशा कित्येक प्रश्नांची उत्तरं मिळवत दिग्दर्शक आर. बाल्की आपल्याला हवा असलेला विषय पाहणाऱ्यांपर्यंत थेट पोहोचवतात.

इथे हत्यासत्र आहे, पोलीस आहेत, मनोरुग्ण आहे. त्याची लोकांना मारण्याची विशिष्ट पद्धत आहे. त्यामुळे खरोखरच असा मनोरुग्ण कोणत्या थराला जाऊन या हत्या करू शकतो, याची खूप भेदक मांडणी दिग्दर्शक म्हणून आर. बाल्की यांनी केली आहे. एरव्ही बाल्की यांच्या चित्रपटाची फ्रेम न् फ्रेम सुंदर आणि प्रतीकात्मक पद्धतीने केलेली वास्तव मांडणी असते. इथे प्रतीकात्मकता येते ती आशयाच्या बाबतीत.. आणि फ्रेममधलं सौंदर्य अनुभवायला मिळतं कारण मुळात नायक खुनी असला तरी तो कलाकार आहे. त्याचा कलासक्तपणा त्याच्या वावरातून, व्यक्त होण्यातून जाणवेल याची पुरेपूर काळजी दिग्दर्शकाने घेतली आहे. पण त्या सौंदर्यापेक्षा त्याच्या कलासक्त मनाआड दडलेला थंड खुनशीपणा पाहणाऱ्याच्या अंगावर जास्त काटा आणतो. समोर दिसणारी दृश्यं आपल्याला अस्वस्थ करतात. बाल्की यांच्या आत्तापर्यंतच्या मांडणीतला हा खूप भेदक चित्रण असलेला असा भावनापट आहे.

बाल्की यांची दिग्दर्शकीय मांडणी जेवढी प्रभावी आहे तेवढीच यातला आशय टोकदारपणे मांडतानाही तो थेट आणि हुशारीने त्यांनी पोहोचवला आहे. यात अमिताभ बच्चन यांची पाहुणे कलाकार म्हणून अगदी छोटी आणि महत्त्वाची भूमिका आहे. ते अमिताभ म्हणूनच प्रेक्षकांना दिसतात आणि समाजाला टीकाकारांची गरज आहे हा मुद्दा ठळकपणे मांडतात. इथेच दिग्दर्शकाने एका दगडात दोन पक्षी मारले आहेत. वरवर पाहता हा चित्रपट समीक्षकांवर भाष्य करतो. समाजमाध्यमे, ऑनलाइन माध्यमे सगळी आयुधे हाताशी घेऊन झटपट, सवंग पद्धतीने एखाद्याच्या कामाविषयी उथळ भाष्य करणाऱ्यांना चपराक लगावण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने केला आहे. तर दुसरीकडे कलाकार म्हणून आपल्यासाठी समीक्षकांच्या मतापेक्षा चित्रपटाची कमाई जास्त महत्त्वाची आहे हे अमिताभ मान्य करतात. पण, कलाकारच नव्हे तर कोणत्याही क्षेत्रात काम करणारी व्यक्ती असेल त्याला त्याच्या कामातील उणिवा समजावून सांगणारी, काय बदल स्वत:त करायला हवेत हे सांगणारी दुसरी व्यक्ती असावीच लागते, हेही ते सांगतात. व्यक्ती ते समष्टी या नात्याने समाजाला कायमच टीकाकारही गरजेचे असतात, हे दिग्दर्शकाच्या भूमिकेतून बाल्की यांनी ठासून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. हे भाष्य आजच्या परिस्थितीत खूप सूचक आणि धाडसाचं आहे, त्यामुळे हा चित्रपट महत्त्वाचा ठरतो. 

त्याच वेळी प्रसिद्ध अभिनेते – दिग्दर्शक गुरू दत्त आणि त्यांना आयुष्यात आलेले अपयश असा आणखी एक धागा या कथेत आहे. तो तपशिलात जाऊन सांगणे योग्य नाही. पण एक कलाकार आणि व्यक्ती म्हणून नायकाचा उलगडा करताना काही कच्चे दुवे राहून गेले आहेत. तेच अर्धवट प्रेमकथेच्या बाबतीतही म्हणता येईल. अभिनयाचा विचार करता दुलकेर सलमानचा सहज अभिनय आणि नायिकेच्या आईच्या भूमिकेतील अभिनेत्री सरन्या हे दोन्ही दाक्षिणात्य कलाकार लक्ष वेधून घेतात. कलाकार जितके जुने होतात, तितकेच ते नव्या कलाकारांच्या गर्दीत फार आश्वासक भासू लागतात. तसंच काहीसं इथे सनी देओल आणि पूजा भट यांच्या बाबतीत होतं. (ता. क. – इतक्या वर्षांनंतर त्यांच्या अभिनयात काडीचाही बदल झालेला नाही.) तरीही त्यांचा वावर चित्रपट पाहताना सुखावून जातो. भेदक मांडणीतून खरोखरच उथळ बडबडीला ‘चूप’ करत विचारप्रवृत्त करणारा बाल्कीपट अनुभवण्याची पर्वणी आहे.

चूप : रिव्हेन्ज ऑफ द आर्टिस्ट

दिग्दर्शक – आर. बाल्की

कलाकार – दुलकेर सलमान, सनी देओल, पूजा भट, श्रेया धन्वंतरी, राजा सेन.