Millie Bobby Brown Adopts Second Baby Boy : ‘स्ट्रेंजर थिंग्स’ (Stranger Things) मालिकेत ‘इलेव्हन’ ही गाजलेली भूमिका साकारणारी जागतिक स्तरावरील लोकप्रिय अभिनेत्री मिली बॉबी ब्राऊन (Millie Bobby Brown) आणि तिचा पती जेक बाँजिओव्ही (Jake Bongiovi) यांनी दुसऱ्या बाळाचं स्वागत केलं आहे. अवघ्या २२ वर्षांच्या मिलीने आणि तिचा पती जेकने आपल्या दुसऱ्या बाळाला दत्तक घेतले आहे. शुक्रवारी इन्स्टाग्रामवर या गोंडस मुलाच्या हाताचा फोटो शेअर करत त्यांनी ही आनंदाची बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली. मिलीने २०२५ मध्ये एका मुलीला दत्तक घेतल्यानंतर आता एका मुलाला दत्तक घेऊन आपले स्वप्न पूर्ण केले आहे.

मिली बॉबी ब्राऊन आणि तिचा पती जेक बाँजिओव्ही यांनी त्यांच्या दुसऱ्या बाळाचं स्वागत केलं आहे. या दाम्पत्याने एका गोंडस मुलाला दत्तक घेतलं आहे. मिली २२ वर्षांची आहे. तर जेक २४ वर्षांचा आहे. मिली व जेक यांनी शुक्रवारी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नवजात बाळाचा हात असलेला फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी दिली. त्यांनी या फोटोला Hi little guy असं कॅप्शन दिलं आहे.

मिली बॉबी ब्राऊनची पोस्ट

प्रसिद्ध संगीतकार जॉन बॉन जोव्ही यांचा मुलगा जेक बाँजिओव्ही आणि मिली यांनी २०२३ मध्ये एंगेजमेंट केली होती. त्यानंतर २०२४ मध्ये एका खासगी सोहळ्यात त्यांनी लग्न केलं होतं. या जोडप्याने २०२५ मध्येही पहिली मुलगी दत्तक घेतली. आता वर्षभराने त्यांनी दुसरा मुलगा दत्तक घेतला आहे. “या उन्हाळ्यात आम्ही आमच्या गोड मुलीचे स्वागत केलं. पालकत्वाच्या या नवीन आणि सुंदर प्रवासाची शांततेत सुरुवात करण्यासाठी आम्ही दोघेही उत्सुक आहोत. आता आम्ही तिघे झालो आहोत,” असं त्या वेळी सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी लिहिलं होतं.

मिलीने म्हटलं होतं की लहानपणापासूनच मूल दत्तक घेणं हे तिचं स्वप्न होतं. “हे माझं लहानपणीचं स्वप्न होतं. मी ५-६ वर्षांची असताना माझ्याकडे असणाऱ्या सर्व बाहुल्यांना मी दत्तक घेतलेलं मूल मानायचे,” असं मिली म्हणाली होती. मिलीने, दत्तक घेण्याचा निर्णय घेतला असला तरी भविष्यात स्वतःची मुलं होऊच द्यायची नाहीत, असा तिचा विचार नाही. “मला स्वतःचं मूल नकोय म्हणून मी हा निर्णय घेतलाय असे नाही, भविष्यात कधीतरी ती गोष्टही घडेल अशी आशा आहे,” असं ती म्हणाली.

नेटफ्लिक्सच्या अत्यंत लोकप्रिय ‘स्ट्रेंजर थिंग्स’ या साय-फाय मालिकेत ‘इलेव्हन’ ही भूमिका साकारून मिली बॉबी ब्राऊन घराघरांत पोहोचली. या मालिकेचा शेवटचा सीझन २०२५ मध्ये प्रदर्शित झाला होता.