गणेश उत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली असून विविध गणेशोत्सव मंडळांनी आणि सर्वसामान्यांनीही बाप्पांची आपल्या घरी प्रतिष्ठापना केली आहे. सलमान खान, विवेक ओबेरॉय यांच्यासह इतरही काही सेलिब्रिटींच्या घरी बाप्पा विराजमान झाले आहेत. पण, बाप्पाची पूजा करण्याच्या मुद्द्यावरुनही आता सोशल मीडियावर नव्या वादाला तोंड फुटलं आहे. ‘स्टाईल’, ‘एक्सक्युज मी’ अशा चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या अभिनेता साहिल खाननेसुद्धा त्याच्या घरी बाप्पाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. त्याने आपल्या घरातील गणेश उत्सवाचा एक फोटोही इन्स्टाग्रामवरुन शेअर केला.

साहिलने शेअर केलेल्या या फोटोला अनेकांनी लाइक केलं. पण, त्याच्या मुस्लिम फॉलोअर्सला मात्र हे काही रुचलं नाही. त्यामुळे त्यांनी साहिलची खिल्ली उडवण्यास सुरुवात केली. आपली अशाप्रकारे खिल्ली उडवली जात असल्याचं पाहून साहिलनेही या लोकांना सडेतोड उत्तर दिलं. ‘मी सर्वप्रथम एक भारतीय आहे असून, त्यानंतर मुस्लिम आहे’, असं साहिलने स्पष्ट केलं. ‘ज्या देशाने तुम्हाला खरी ओळख मिळवून दिली, प्रसिद्धी दिली, प्रेम दिलं त्याचा आदर करायला शिका. तुमची इच्छा असेल तर खुशाल इतर मुस्लिम राष्ट्रांमध्ये जाऊन नशिब आजमावा. तुमच्या द्वेषाच्या भावना आणि नकारात्मकतांचा माझ्यासोबत खेळ करु नका. मला सोशल मीडियावर फॉलो करु नका कारण, तुमच्यासारख्या लोकांची मला काहीच गरज नाही’, असंही त्याने स्पष्ट केलं.

‘सर्वप्रथम आपल्या मातृभूमीचा आदर करा त्यानंतरच आपल्या धर्माला मान द्या. माझा धर्म तिरस्कार करायला शिकवत नाही’, असंही त्याने म्हटलं. साहिलने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये तो बाप्पाला नमस्कार करताना पाहायला मिळतोय. पण, त्याने हा फोटो पोस्ट करताच इस्लाममध्ये ही शिकवण दिलेली नाही असं म्हणत अनेकांनी त्याच्यावर निशाणा साधला. ‘असं करायला तुला लाज वाटत नाही का’, असं म्हणत सोशल मीडियावर धर्माच्या नावावरुन एका वेगळ्याच वादाला तोंड फुटल्याचंही पाहायला मिळालं. पण, प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत खुद्द साहिलनेच सर्वांना सडेतोड उत्तर दिलं.