ॲगाथा ख्रिस्ती माहीत नाही असा वाचनप्रेमी या जगात तसा दुर्मीळच. अनेक जागतिक खपाऊ रहस्यकथांची ही लेखिका… जिच्या अनेक रहस्यकथांवर नाटक-चित्रपटदेखील बनवले गेले आहेत. तिचे ‘माऊसट्रॅप’ हे नाटक १९५२ साली लंडनमधील रंगभूमीवर आलं आणि आज पंंच्याहत्तरीकडे वाटचाल करत असतानाही ते तेवढ्याच तुफान प्रचंड गर्दीत सुरू आहे. करोनाचा अल्प काळ वगळता या नाटकाचे प्रयोग नित्य होत असतात. जागतिक रंगभूमीवर या नाटकाच्या प्रयोगांनी शब्दश: विक्रम केला आहे. असंख्य कलाकार या नाटकाच्या मांडवाखालून आजपर्यंत गेले आहेत. ॲगाथा ख्रिस्तीच्या बहुतेक पुस्तकांच्या करोडो प्रती जगभरात विकल्या गेल्या आहेत… आजही विकल्या जात आहेत. तिच्या ‘माऊसट्रॅप’’ या नाटकाचे प्रयोग जगभर सर्वत्र आजवर झालेले आहेत. त्यातला एक प्रयोग मुंबईतही झाल्याचं आठवतं. तर ते असो. आता हे नाटक मराठी रंगभूमीवर अवतरलं आहे… ‘सुभेदार गेस्ट हाऊस’ या नावानं! त्याचे लेखक आहेत शिरीष देखणे. आणि दिग्दर्शक आहेत विजय केंकरे. धि गोवा हिंदु असोसिएशन आणि सुकल्प चित्र संस्थेची ही निर्मिती आहे. ‘माऊसट्रॅप’ला भारतीय… नव्हे मराठी रूपडं यात दिलं गेलं आहे.
चित्रा आणि विनय सुभेदार हे जोडपं त्यांना चित्राच्या आत्याकडून वारसाहक्काने मिळालेल्या वाड्याचं गेस्ट हाऊसमध्ये रूपांतर करतं आणि त्याची जाहिरातही करतं. खरं तर त्यांना गेस्ट हाऊस चालवायचा कसलाही अनुभव पदरी नसतो. तरीही ते आपल्याला जमेल तशी गेस्ट हाऊस चालवण्याची तयारी करतात. त्यानुसार त्यांच्याकडे काही जण बुकिंगही करतात. त्याप्रमाणे भयाण पावसातही एकेक जण गेेस्ट हाऊसमध्ये येऊन दाखल होतो. अमित देसाई, मिसेस तिलोत्तमा टिकेकर, मेजर थोरात, सपना जगताप… आणि अचानक न ठरवता आलेले विजय बॅनर्जी! या प्रत्येक पाहुण्याची वृत्ती-प्रवृत्ती भिन्न असते. साहजिकच त्यांच्याशी वागता-बोलताना चित्रा आणि विनयची भंबेरी उडते. ते कसंबसं प्रत्येकाला आपल्या परीनं ॲडजस्ट करायचा प्रयत्न करतात.
अशात कोल्हापुरात एका मध्यमवयीन स्त्रीचा खून झाल्याची बातमी येते. आणि अचानक गेस्ट हाऊसमध्ये त्यासंबंधात चौकशी करण्यासाठी पोलीस येणार असल्याची खबर येते. चित्रा आणि विनयला आपला आणि गेस्ट हाऊसचा या खुनाशी काय संबंध, असा प्रश्न पडतो. पण तरीही इन्स्पेक्टर भोसले गेस्ट हाऊसवर येऊन दाखल होतात आणि सगळ्यांची चौकशी सुरू करतात. कारण ती खून झालेली स्त्री ही त्यांच्या गेस्ट हाऊसच्या जवळच राहणारी असते. चित्रा-विनयची तिच्याशी थोडीशी तोंंडओळख असते. साहजिकच त्यासंदर्भात इन्स्पेक्टर भोसले यांना त्यांची चौकशी करायची असते. शिवाय त्यांच्या गेस्ट हाऊसमध्ये उतरलेल्यांपैकीच कुणीतरी खुनी असू शकतो असा त्यांना संशय असतो. आणि हा खुनी आणखीन एकदा खून पाडू शकतो अशीही शक्यता इन्स्पेक्टर भोसले यांना वाटत असते. त्यामुळे ते तिथं आलेल्या गेस्टसकट सर्वांनाच सावधगिरीचा इशारा देतात. परंतु त्यांच्या चौकशीत मात्र काहीच निष्पन्न होत नाही, तेव्हा ते भयंकर वैतागतात. यासंबंधात अधिक तपासासाठी पोलीस ठाण्याची मदत घेण्यासाठी इन्स्पेक्टर बाहेर गेलेले असतानाच माजी न्यायमूर्ती असलेल्या मिसेस तिलोत्तमा टिकेकर यांचा गेेस्ट हाऊसमध्ये खून होतो. आणि सगळेच अडचणीत येतात. इन्स्पेक्टर प्रत्येकाची खोदून खोदून चौकशी करत असताना अमित देसाईचं संशयास्पद वर्तन चित्रा व विनयच्या लक्षात येतं. ते तसं इन्स्पेक्टरना सांगतात. पण अमित ते उडवून लावतो. तसंंच मेजर थोरात यांचीही पार्श्वभूमी संशयास्पद असल्याची गोष्ट चित्रा इन्स्पेक्टरच्या निदर्शनास आणून देते. तिच्या या तर्कबुद्धीबद्दल इन्स्पेक्टर तिची तारीफ करतात. पण त्याचवेळी त्या स्त्रीच्या खुनाच्या घटनेच्या वेळी चित्रा आणि विनयची गेस्ट हाऊसवरची अनुपस्थितीदेखील इन्स्पेक्टर त्यांच्या लक्षात आणून देतात. त्यामुळे संशयाची सुई त्यांच्याकडेही वळते. विजय बॅनर्जीचं अकस्मात गेस्ट हाऊसवर येणं आणि संशयास्पद वागणं हेही इन्स्पेक्टरच्या डोळ्यांत येतं. सपना जगतापचं कोल्हापूरला विनाकारण येणं आणि मुक्काम वाढवणं हेही संशयाच्या र्घे यात येतं. अशा प्रकारे प्रत्येक जण संशयित खुनी असू शकतो, या निष्कर्षाप्रत इन्स्पेक्टर भोसले येतात. अर्थात पुढे कोण खुनी निघतो, हे प्रत्यक्ष नाटकात अनुभवणंच योग्य.
लेखक शिरीष देखणे यांनी हा प्लॉट अत्यंत खुबीनं हाताळला आहे. प्रत्येकाची पार्श्वभूमी तपशिलांत मांडत त्यांच्या गेस्ट हाऊसमधल्या वर्तनव्यवहारांतून ते अडचणीत येतील अशी रचना त्यांनी केली आहे. अर्थात काहींना- म्हणजे मिसेस टिकेकर, मेजर थोरात यांना संशयाच्या जाळ्यात न अडकवता मोकळं सोडलं आहे. तरीही ते शेवटी संशयाच्या र्घे यात येतातच. वरकरणी सगळं व्यवस्थित सुरू असताना इन्स्पेक्टर भोसले उगीचच कुणाकुणाला नको ते प्रश्न विचारून भंडावून सोडत आहेत असं काही क्षणी वाटतं. अर्थात शेवटी खुनी कोण हे कळल्यावर त्याचं खूून करण्यामागचं ‘इन्टेन्शन’ अगदीच पपलू वाटतं, ते सोडा. गैरसमज वा अपसमज हे खुनामागचं कारण स्वीकारार्ह नाही. लेखकानं या रहस्यनाट्यात सगळ्यांनाच संशयाच्या काट्यावर घेऊन नंतर भलताच खुनी निघणं हा फॉम्र्युला यातही आहेच. फक्त संशयित व्यक्ती कुठल्या कारणानं संशयास्पद ठरते, हे रहस्यनाट्यात महत्त्वाचं असतं. पण इथे शेवट स्वीकारार्ह करण्याइतकी कथाबीजाची तार्किक बैठक ठोस आढळत नाही. ‘सुभेदार गेस्ट हाऊस’मध्ये सगळी पात्रं तपशिलांत रेखाटली गेली आहेत. फार भयप्रद वातावरणनिर्मिती न करता कथानक पुढं सरकतं.
दिग्दर्शक विजय केंकरे यांचा रहस्यनाट्यं हा हातखंडा विषय. त्यामुळे त्यांनी टप्प्याटप्प्यानं कथानकाचा टेम्पो चढता ठेवला आहे. अनावश्यक भीती निर्माण करण्याचं त्यांनी टाळलं आहे. मात्र इन्स्पेक्टर भोसले नको इतक्या पोलिसी खाक्यानं प्रकरण हाताळतोय हा समज प्रेक्षकांच्या मनात निर्माण होतो. आणि तो अनाठायी नाही हे शेवटाकडे स्पष्ट होतंच. बाकी गेस्ट हाऊसमधील अनेक गेस्ट, त्यांच्या वागण्या-बोलण्याच्या तर्हा, त्यातून निर्माण होणारा संशय अतिशय ठाय लयीत दिग्दर्शकानं नाटकात रेखाटला आहे. फक्त ज्या कारणासाठी खून होतो ते तितकेसे समर्थनीय नाही, एवढंच. असो. कलाकारांची निवड चपखल. त्यांना दिलेले व्यवहारही मनुष्यस्वभावास धरून. त्यामुळेच नैसर्गिक गतीनं नाटक पुढे सरकतं.
प्रदीप मुळ्ये यांनी वाड्याचं गेस्ट हाऊसमधील रूपांतर नेपथ्यातून तपशिलांत दाखवलं आहे. शीतल तळपदे यांनी प्रकाशयोजनेतून काळ-वेळ आणि वातावरण यांची नैसर्गिकरीत्या निर्मिती केली आहे. त्यातून पावसाळी वातावरण उत्तम प्रत्ययाला येतं. अजित परब यांच्या संगीतानं त्यात भर घातली
आहे.
चित्रा सुभेदार झालेल्या मृण्मयी गोंधळेकर यांनी पहिल्या प्रथम गेस्ट हाऊस सुरू करर्णा यांची उडणारी तारांबळ आणि नंतर पोलिसी ससेमिरा मागे लागल्यामुळेची हतबलता व्यवस्थित व्यक्त केली आहे. विनयची नव्या गेस्ट हाऊसची व्यवस्था पाहताना उडणारी भंबेरी आणि पोलीस चौकशीचं शुक्लकाष्ठ मागे लागल्यावरही ‘कर नाही त्याला डर कशाला?’ वृत्ती सौरभ गोखले यांनी पोटतिडकीनं दाखवली आहे. शंतनू मोघेंचा इन्स्पेक्टर भोसले अंगयष्टीनं आणि वावरण्यातून खराखुरा वाटतो. मात्र त्याची चौकशीची पद्धत फारशी डोकॅलिटीनं होते आहे असं वाटत नाही. अर्थात त्यामागचं कारण शेवटाकडे उघड होतंच. तक्रारखोर मिसेस टिकेकर- विनिता दाते यांनी सहजगत्या साकारल्या आहेत… अगदी नॅचरल! रोहित देशमुख यांनी मेजर थोरात यांचा भारदस्तपणा आणि समतोल व्यक्तिमत्त्व उत्तम वठवलं आहे.
सना कुलकर्णी यांची सपना जगताप पहिल्यापासूनच संशयास्पदरीत्या वावरताना दिसते. तिनं कथन केलेली स्टोरीही खोटी आहे हे सहज कळतं. आनंद पाटील यांचा बंगाली विजय बॅनर्जी वाटतो खरा, पण त्यांच्या हालचाली आणि व्यवहार संशयग्रस्त राहिला आहे. साहजिकपणेच ते नाटकाची गरज भागवतात. अंगद म्हसकर यांचा अमित देसाई अनावश्यक उत्साही, अतिशयोक्त वागणारा-बोलणारा असल्याने लक्ष वेधून घेतो. आणि त्यामुळेच संशयाच्या र्घे यात सापडतो.
ॲगाथा ख्रिस्तीच्या ‘माऊसट्रॅप’चं हे मराठी रूपडं प्रेक्षकांना धरून ठेवतं, हे मात्र नक्की.
