मराठी रंगभूमीवर सध्या लक्ष वेधून घेत असलेल्या ‘सुभेदार गेस्ट हाऊस’ या नाटकाने अल्पावधीतच ५० व्या प्रयोगाचा टप्पा गाठला आहे. येत्या १५ ऑगस्ट रोजी दादर येथील श्री शिवाजी मंदिरात या नाटकाचा सुवर्णमहोत्सवी प्रयोग रंगणार आहे. या नाटकाचे लेखन शिरीष देखणे यांनी केले असून, नाटकाचे दिग्दर्शन विजय केंकरे यांचे आहे.

या नाटकाचे नेपथ्य प्रदीप मुळ्ये यांचे आहे आणि नाटकाला अजित परब यांनी संगीत दिले आहे. शीतल तळपदे यांनी नाटकाची प्रकाशयोजना केली आहे. शंतनू मोघे, सौरभ गोखले, अंगद म्हसकर, मृण्मयी गोंधळेकर, विनिता दाते, आनंद पाटील, सना कुलकर्णी, रोहित देशमुख असे सध्याचे आघाडीचे कलावंत या नाटकात भूमिका साकारत आहेत.

प्रख्यात लेखिका अगाथा ख्रिस्ती यांच्या गाजलेल्या ‘माऊस ट्रॅप’ या नाटकावर आधारित हे नाटक आहे. ‘माऊस ट्रॅप’ हे नाटक मराठी बाज घेऊन ‘सुभेदार गेस्ट हाऊस’ या नावाने मराठी रंगभूमीवर गाजते आहे. थरारक-रहस्यमय बाजाच्या ‘सुभेदार गेस्ट हाऊस’ या नाटकाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे मराठी रंगभूमीवर आतापर्यंत अनेक लोकप्रिय नाटके देणारी ‘धि गोवा हिंदू असोसिएशन’ ही संस्था या नाटकाच्या निमित्ताने पुन्हा एकदा नाट्यनिर्मितीत उतरली आहे. ‘धि गोवा हिंदू असोसिएशन’ व ‘सुकल्प चित्र’ यांनी या नाटकाची निर्मिती केली आहे. ‘सुभेदार गेस्ट हाऊस’ या नाटकाचे प्रयोग सध्या मोठ्या धडाक्यात रंगभूमीवर सुरू आहेत.