रेश्मा राईकवार

काही विषय नवीन नसले तरी सिनेमा पाहताना ती गोष्ट पडद्यावर रंगवणारे कलाकार त्यांच्या अभिनयाने त्यात नावीन्य आणत असतात. एक चैतन्य, एक अजब उत्साह फक्त त्या कलाकाराचा पडद्यावरचा वावर पाहूनही मिळतो. ‘शर्माजी नमकीन’ पाहताना ऋषी कपूर यांच्या चेहऱ्यात जात्याच असलेला गोडवा, अवखळपणा, त्यांचा उत्साह जाणवत राहतो. सर्वसामान्य मध्यमवर्गीयाची भूमिका साकारणं हा त्यांच्या हातचा मळ होता. तरीही तुलना करायची झाली तर त्यांचा २०१० साली प्रदर्शित झालेला ‘दो दूनी चार’ याबाबतीत फार उजवा होता, तरीही ऋषी कपूर यांची भूमिका असलेला हा अखेरचा चित्रपट निखळ मनोरंजन करण्यात कमी पडत नाही.

‘शर्माजी नमकीन’ या चित्रपटाचे दिग्दर्शन हितेश भाटिया या नवोदित दिग्दर्शकाचे आहे. चित्रपटाची कथाही हितेश भाटिया आणि सुप्रतिक सेन यांनी लिहिली आहे. चित्रपटाची कथा वर म्हटल्याप्रमाणे फार वेगळी किंवा उल्लेखनीय नाही. कार्यालयातून ५८ व्या वर्षी निवृत्त झालेल्या पण मनाने मात्र तितकाच उत्साही, अजूनही आपले शंभर टक्के आपण कामासाठी देऊ शकतो हा ठाम विश्वास असलेल्या शर्माजींची ही कथा आहे. शर्माजींना दोन मुलं आहेत. एक नोकरी करतो आहे आणि मोठं आलिशान घर घेऊन स्थिरस्थावर होण्याचं स्वप्न पाहतोय. तर दुसरा अजून शिकतो आहे, त्याला शिक्षणापेक्षाही नृत्याचं वेड आहे. या दोन्ही मुलांच्या खाण्यापिण्यापासून घरचे सगळे व्यवहार सांभाळण्याची जबाबदारी पत्नी गेल्यानंतर शर्माजी चोखपणे निभावत आहेत. मात्र इतका सगळा रोजचा पसारा सांभाळूनही निवृत्त झाल्यानंतर शर्माजींना घर खायला उठतं. मुलांना रोज काहीतरी नवीन चवीचं खायला घालून, घर आवरून, मालिका पाहून, बाजारहाट करूनही उरणाऱ्या वेळेचं आणि आलेल्या एकटेपणाचं काय करायचं, हा प्रश्न त्यांना सतावतो आहे. तर दुसरीकडे सगळी सुखं पायाशी आहेत, तरीही आपल्या वडिलांना काय हवं आहे? काय समस्या आहे त्यांची.. हे गणित मोठय़ा मुलाला उलगडत नाही आहे. हरतऱ्हेचे उपाय अजमावून झाल्यावर अखेर आपल्या हाताला असलेली चव, स्वयंपाक कला त्यांच्या मदतीला धावून येते. आता ते नेमके कोणासाठी शेफ होतात, त्यामुळे त्यांच्या आयुष्यात काय काय बदल होतात.., त्यांच्या एकटेपणावर त्यांना उत्तर मिळतं का? वडील आणि मुलांमधील विसंवाद संपतो का, अशा सगळय़ाच प्रश्नांची गुंतावळ पडद्यावर चित्रपट पाहूनच सोडवण्यात मजा आहे.

ऋषी कपूर यांचा अभिनय हे चित्रपटाचं मुख्य आकर्षण आहे, पण दुर्दैवाने फार कमी भाग त्यांच्यावर चित्रित झाला आहे. उरलेली कमी अभिनेते परेश रावल यांनी भरून काढली आहे. परेश रावल स्वत: उत्तम अभिनेते आहेत आणि त्यांनीही अशाप्रकारच्या भूमिका याआधी यशस्वी केलेल्या आहेत. मात्र मुळातच या दोन्ही कलाकारांच्या अभिनयाची जातकुळी वेगळी आहे, स्वभाव वेगळा आहे. ऋषी कपूर यांचा कलंदर स्वभाव हुबेहूब उतरवणं यामुळेच परेश रावल यांना शक्य नाही. त्यातही ऋषी कपूर यांच्यावर चित्रित झालेले प्रसंगही एकापाठोपाठ एक झालेले नाहीत. त्यामुळे संपूर्ण चित्रपटात आपण ऋषी कपूर आणि परेश रावल यांना शर्माजी म्हणून आलटूनपालटून पाहत राहतो. अर्थात, अशाप्रकारच्या चित्रणाने त्याच्या दृश्य परिणामांच्या प्रभावावर मर्यादा येणारच आणि त्या येतात. मात्र त्याला दिग्दर्शकाचाही नाइलाज आहे. हा प्रभाव कथेत थोडी आणखी जान असती तर नक्कीच सावरता आला असता. पण तसे होत नाही. उत्तरार्धात कथा फार ठोकळेबाजपणे पुढे सरकत राहते.

‘शर्माजी नमकीन’सारख्या चित्रपटातून म्हटलं तर दिग्दर्शकाने खूप साऱ्या बारीकासारीक गोष्टींना स्पर्श केला आहे. या वयातला एकटेपणा, मुलांनी गृहीत धरणं, वयस्कर माणसं काहीच कामाची नसतात ही समाजाची होणारी धारणा आणि हे सगळं असंच होणार आहे हे लक्षात घेऊन त्यांनी त्यांचं जीवनमान आखावं अशी त्यांच्याकडून केली जाणारी अनाठायी अपेक्षा यावर शर्माजींच्या माध्यमातून लेखक झ्र् दिग्दर्शक व्यक्त झाले आहेत. पण त्यावर त्यांनी सखोल भाष्य करणे टाळले आहे, त्याउलट शर्माजींना सापडलेली वाट ते पुढे कशी नेतात याकडे कथा वळवत केलेली ही रंजक सुखांतिका आहे. त्यामुळे ती नावाप्रमाणे आणि ऋषी कपूर यांच्या स्वभावाप्रमाणे नटखट आहे. निखळ मनोरंजन करणाऱ्या या चित्रपटात ऋषी कपूर यांच्यावर चित्रित झालेले काही प्रसंग अगदी त्यांचे म्हणून आठवणीत राहतील. याशिवाय, त्यांची आणि जुही चावला यांची जोडी पुन्हा पाहण्याची संधी या चित्रपटाने दिली आहे. जुहीलाही खूप दिवसांनी एका चांगल्या भूमिकेत पाहता आले आहे. परेश रावल यांनी आपल्या परीने रंगवलेले शर्माजी आणि अगदी शेवटी ऋषी कपूर यांच्याबरोबर चित्रीकरणातील काही वास्तव दृश्ये यांची पेरणी या एक काळ गाजवणाऱ्या अभिनेत्याची आठवण करून देतात. शेवटी हा त्यांचा आणि त्यांच्यासाठीच पाहिला जाणारा चित्रपट आहे, याची उजळणी करत आपण बाहेर पडतो.

शर्माजी नमकीन

दिग्दर्शक – हिेतेश भाटिया

कलाकार – ऋषी कपूर, परेश रावल, जुही चावला, सतीश कौशिक, सुहैल नय्यर, इशा तलवार, शीबा चढ्ढा, आयेशा रझा, परमीत सेठी.