“तुमच्यासारखा कलावंत कधीच मरत नाही”; सुबोध भावेने व्यक्त केले दु:ख

सुबोधने दिली ऋषी कपूर यांना दिली श्रद्धांजली

बॉलिवूडमधील जेष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे गुरूवारी सकाळी निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते. बुधवारी त्यांना मुंबईतील एच.एन. रिलायन्स रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे देशभरात शोककळा पसरली आहे. दरम्यान अभिनेता सुबोध भावे याने ट्विटरच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

“ऋषी कपूर काय कमाल ऊर्जा घेऊन तुम्ही आजवर वावरलात. तुमच्यासारखा कलावंत कधीच मरत नाही ऋषीजी. तुम्ही नेहमीच जिवंत आहात आमच्या मनात आणि रहाल.” असे ट्विट सुबोध भावेने केले आहे. त्याचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

ऋषी कपूर यांनी जवळपास ९२ चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. सगळ्याच पिढ्यांमध्ये त्यांचा चाहतावर्ग आहे. ‘मेरा नाम जोकर’ हा त्यांचा पहिला चित्रपट होता. ‘बॉबी’, ‘दामिनी’,’दो दुनी चार’, ‘कर्ज’, ‘प्रेमरोग’, ‘चांदनी’ या चित्रपटांमध्ये त्यांनी दमदार भूमिका साकारल्या होत्या. कर्करोगाशी यशस्वी झुंज देऊन ऋषी कपूर भारतात परतले होते. ११ महिने ११ दिवस न्यूयॉर्कमध्ये उपचार घेऊन ते भारतात परतले होते. परदेशी उपचार सुरू असताना त्यांनी अनेकदा मायदेशी येण्याची तीव्र इच्छा व्यक्त केली होती. पुन्हा रुपेरी पडद्यावर झळकण्याची त्यांची खूप इच्छा होती. मला पुन्हा काम मिळेल ना, अशी चिंता ते मुलांकडे व पत्नीकडे व्यक्त करायचे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Subodh bhave on rishi kapoor passes away at 67 mppg