"आतापर्यंत आपण सूडाच्या अनेक मालिका पाहिल्या आहेत. आता 'शुभमंगल ऑनलाइन'च्या माध्यमातून एक हलकीफुलकी कथा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे", अशा शब्दांत अभिनेता सुबोध भावेनं त्याने निर्मित केलेल्या पहिल्यावहिल्या मालिकेचं वर्णन केलं. 'कान्हाज मॅजिक' या निर्मिती संस्थेद्वारे सुबोधची ही मालिका लवकरच कलर्स मराठी वाहिनीवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. यामध्ये सायली संजीव आणि सुयश टिळक अशी नवीन जोडी मुख्य भूमिकेत आहे. आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारा सुबोध आता एका नव्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. पण ही भूमिका पडद्यामागची आहे. याविषयी तो 'लोकसत्ता ऑनलाइन'ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला, "निर्माता म्हणून मला एक अनोखी कल्पना प्रेक्षकांच्या भेटीला आणायची होती. गेल्या काही वर्षांपासून मी यासाठी तयारी करत होतो पण काही कारणास्तव ते शक्य होत नव्हतं. लॉकडाउनदरम्यान मला पटकथेवर काम करण्याची संधी मिळाली. दोन-चार महिने त्यावर काम केल्यानंतर आता अखेर ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मालिका घराघरात पोहोचण्याचं माध्यम आहे आणि त्यातून आपली कल्पकता प्रेक्षकांपर्यंत पोहोचवता येऊ शकते. त्यामुळे या मालिकेची निर्मिती केली." View this post on Instagram प्रेम असतंच, फक्त कधी कधी ते व्यक्त करण्याच माध्यम बदलत! कधी एकमेकांना प्रत्यक्ष भेटून, तर कधी "ऑनलाइन"! "शुभमंगल ऑनलाइन" २८ सप्टेंबर पासून फक्त @colorsmarathiofficial वर @saneness_ @manjirisbhave @vaibhav_chinchalkar_official @sukanyamone9093 @suyashtlk @sayali_sanjeev_official A post shared by Subodh Bhave (@subodhbhave) on Sep 13, 2020 at 10:17pm PDT मालिकेच्या कथानकाविषयी त्याने पुढे सांगितलं, "सध्या आपण अनेक गोष्टी ऑनलाइन करतोय. आजकाल लग्नसुद्धा ऑनलाइन जमतात. शंतनू आणि शर्वरी अशीच एक जोडी आहे ज्यांची भेट ऑनलाइन होते. त्यानंतर पुढे त्यांच्या आयुष्यात काय घडामोडी घडतात, याबद्दलची गोष्ट शुभमंगल ऑनलाइनमध्ये दाखवण्यात येणार आहे. त्या दोघांसोबतच त्यांच्या कुटुंबाचीही ही गोष्ट आहे. ऑनलाइन विश्वाला कुटुंबातील सर्वजण कसं सामोरं जातात आणि त्यातून काय गमतीजमती होतात ते पाहायला मिळणार आहे." या मालिकेची हलकीफुलकी कथा प्रेक्षकांना ताण देणार नाही, असा विश्वास सुबोधनं व्यक्त केला आहे. पडद्यामागे काम करण्याबाबत तो म्हणतो, "फक्त पडद्यासमोरच काम करण्याचा माझा हट्ट नाही. मला पडद्यामागेही काम करायला खूप आवडतं. नाटकातही मी पडद्यामागे काम केलंय. त्यामुळे पडद्यामागे काम करण्यांची मेहनत मला माहीत आहे." सुबोध भावे आणि त्याच्या कुटुंबीयांना करोनाची लागण झाली होती. मात्र आता त्यांची तब्येत सुधारत आहे. लवकरच क्वारंटाइनमधून बाहेर येणार असल्याचं सुबोधने यावेळी सांगितलं.