विलेपाल्रे  येथील पाल्रे टिळक विद्यालयाच्या प्रांगणात संध्याकाळी सहा वाजता होणाऱ्या ‘नक्षत्रांचे देणे’ या मफलीच्या निमित्ताने रसिकांवर आशाताईंच्या चतुरस्र गायकीची बरसात होणार आहे. याच कार्यक्रमाच्या प्रारंभी आशाताईंना लतादीदींच्या हस्ते ‘हृदयनाथ पुरस्कारा’ने गौरविण्यात येणार आहे. ‘हृदयेश आर्टस’ या संस्थेने आयोजित केलेल्या या सोहळ्याच्या निमित्ताने आशा भोसले व हृदयनाथ मंगेशकर यांनी ‘लोकसत्ता’कडे मनोगत व्यक्त केलं.
पाल्र्यात होणा-या या कार्यक्रमात अनेक चांगले योग जुळून आले आहेत. एक तर मुंबईत मी अनेक वर्षांनी हा कार्यक्रम करत्ये, त्याचा आनंद आहेच, मात्र विशेष आनंदाची गोष्ट म्हणजे लतादीदीच्या हस्ते होत असलेला माझा सत्कार. दीदीच्या हस्ते मला पुरस्कार दिला जाणार आहे, तोही आमच्या भावाच्या नावाचा, ही खूप आनंदाची आणि सुखावणारी गोष्ट आहे. त्यामुळे या सोहळ्याची मीही आतुरतेने वाट पाहात आहे.
आधी म्हटल्याप्रमाणे मुंबईत अनेक वर्षांनी मी नक्षत्रांचे देणे करत्ये. मला वाटतं, १९९६मध्ये पाल्र्यात मी हा कार्यक्रम केला होता, त्यानंतर एवढ्या वर्षांनी हा कार्यक्रम होतोय. या कार्यक्रमात बाळ म्हणजे हृदयनाथही माझ्यासह गाणार आहे, त्याचाही आनंद आहेच. आम्ही दोघे मुंबईत अनेक वर्षांनी एकत्र गाताना दिसू.
यात पूर्णपणे मराठी गाणी असतील, हे आणखी एक विशेष. कारण हिंदीत जरी मी भरपूर गाणी गायली असतील तरी तो माझ्या व्यवसायाचा भाग आहे, असं मी मानते. मराठी गाण्यांची मात्र बातच काही और. मराठी गाण्यांची मफल करणं हा माझ्यासाठी समाधानाचा अनुभव असतो. हृदयनाथ आणि सुधीर फडके यांची गाणी गाताना माझ्यातील गायिकेचा कस लागतो, त्यामुळे असं काही आव्हानात्मक गाताना मजा येते. आपल्या मराठी गाण्यांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यातील काव्य! आरती प्रभू, ग्रेस, सुरेश भट, शांता शेळके, ना. धों. महानोर, ग. दि. माडगूळकर यांच्यासारख्या प्रतिभावान किवच्या दर्जेदार रचना गाताना एकप्रकारचा आत्मिक आनंदच लाभतो. मराठी गाण्यांचा कार्यक्रम सादर करण्यासाठी मी नेहमी उत्साही असते ती यामुळेच. केवळ हृदयनाथ व बाबूजीच नाहीत, तर श्रीनिवास खळे, वसंत प्रभू, यशवंत देव, राम कदम आदी संगीतकारांची गाणीही मी गाणार आहे.
ही गाणी सादर करताना तो काळ जागा होतो, त्या आठवणी फेर धरु लागतात आणि नकळत मी त्या-त्या संगीतकारांची वैशिष्ट्ये, त्यांच्या आठवणी, त्यांच्या कामाची पद्धत, त्यांच्या लकबी-सवयी प्रेक्षकांसमोर मांडते. गायकांना चाल शिकवताना बाबूजींचा अर्वभिाव कसा असे, योग्य शब्दोच्चारांबाबत ते कसे आग्रही असत, तर शब्दांना खुलविण्याची, त्यांच्याशी खेळण्याची बाळची पद्धत, हे सारं मी साभिनय करुन दाखवते, गंमत म्हणजे गाण्याएवढ्याच टाळ्या या प्रकारालाही पडतात. या मंतरलेल्या चत्रबनात नेण्यासाठी सुधीर गाडगीळ सोबत असतातच.
आपले मराठी श्रोते फार हुषार आहेत. कधी दाद द्यायची हे त्यांना चांगलं उमगतं. हा कार्यक्रम तर पाल्र्यात होतोय. पाल्र्यातील रसिक भलतेच चोखंदळ. शब्द-सुरांसकट त्यांना गाणी पाठ असतात. अशा रसिकांसमोर कार्यक्रम करणं कोणत्या कलाकाराला आवडणार नाही?

हे गीत जीवनाचे..

एकाच परिवारातील सर्वजणांनी संगीतकलेसाठी आयुष्य समर्पित करुन या क्षेत्रात अत्युच्च शिखर गाठलं आहे, एका संस्थेने या परिवारातील भावाच्या नावे पुरस्कार सुरू केलाय आणि तो पहिल्या वर्षी त्याच्याच थोरल्या बहिणीला तर यंदा दुसऱ्या बहिणीला, तोही थोरल्या बहिणीच्या हस्ते दिला जातोय, ही घटना विलक्षण आहे, अपूर्व आहे, असं तुम्ही म्हणताय खरं.. मात्र, माझ्या मते ही सारी नियतीची योजना आहे. आमचे वडील अवघ्या ४१व्या वर्षी गेले, ते काही जाण्याचं वय नव्हतं. थोरली दीदी तेव्हा केवळ १२ वर्षांची, आई सुशिक्षित, मात्र, वडिलांनी तिला कधी काम करू दिलं नाही. आम्ही भावंडं सुशिक्षित नाही की सुंदर नाही, अशी परिस्थिती निर्माण करुन नियतीने जणू आमची परीक्षाच घेतली आणि आम्ही भावंडांनी संगीतकला हेच जीवनाचं ध्येय व सर्वस्व मानल्याने यात कालांतराने उत्तीर्ण झालो. वडिलांना अपमृत्यू आला, आमच्यापेक्षा ज्ञानी व प्रतिभावान असून आमच्या पावपटही यश त्यांच्या वाटय़ाला आलं नाही, आम्ही सगळे मात्र यशस्वी व दीर्घायुषी झालो, मला वाटतं हीसुद्धा नियतीचीच इच्छा असावी. माईने म्हणजे, आमच्या आईने मुलांचं हे यश, ऐश्वर्य, कीर्ती सारं काही डोळे भरुन पाहिलं, त्यामुळे माईच्याच रुपाने नियती आमच्यासोबत असावी, असंही काहीवेळा वाटतं..
ही साधना करताना माझं वाचनही अफाट होतं, काहीजण म्हणतात तुम्ही इतकं विद्वत्तापूर्ण बोलता की प्राध्यापक वगैरे सहज झाला असतात. कदाचित तसं झालंही असतं, मात्र प्राध्यापक असणाऱ्याच्या नावे कोणी पुरस्कार सुरू केला असता का, या प्राध्यापकाच्या हस्ते लतादीदी किंवा आशाताईला पुरस्कार देणं सुसंगत वाटलं असतं का, असा प्रश्न पडतो. त्यामुळे संगीत आणि केवळ संगीत हेच आमचं प्रारब्ध होतं, झालंही तसंच. वयाच्या अवघ्या १७व्या वर्षी म्हणजे १९५४मध्ये मी ‘तिन्हीसांजा सखे मिळाल्या’ हे माझं पहिलं गाणं ध्वनिमुद्रित केलं. दीदीचा स्वर, भा. रा. तांबे यांची शब्दकळा आणि दोन हजार वर्षांची परंपरा लाभलेला ‘यमन’ हा राग.. हे गाणं काळाच्या कसोटीवर उतरलं नसतं तरच नवल. त्यानंतरही भरपूर गाणी केली, मात्र ती स्वतच्या इच्छेनुसारच. इतरांच्या अटींवर मी कधीही काम केलं नाही. लतादीदी आणि आशाताई दोघी हिंदी-मराठी चित्रपटसंगीतात आघाडीवर असल्याने ठरवलं असतं तर भरमसाट काम मिळणं माझ्यासाठी अशक्य नव्हतं. परंतु माझा तो पिंडच नाही, जुन्या पिढीतील लोकानुनय करणारे संगीतकार आता विस्मरणात गेले आहेत. मी मात्र स्वतच्या कामावर समाधानी आहे. संख्येने अधिक गाणी करण्यापेक्षा ‘मोगरा फुलला’सारख्या विराणीला संगीतबद्ध करताना किती समाधान लाभतं, कायाप्रवेश हा प्रकार काय असतो, हेही मी अनुभवलं आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर व स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या रचना स्वरबद्ध करताना अनुक्रमे शांतीरुपात व क्रांतिकारकांच्या भूमिकेत शिरावे लागते, त्यातून जी संगीतरचना निर्माण होते ती अद्भूत असते, तो आनंद अपूर्व असतो.
आता एवढं यशस्वी झाल्यानंतर आम्ही गाणं सोडलं का, तर त्याचं उत्तर नाही असंच आहे. गाण्याच्या बाबतीत दीदी आजही पूर्वीइतकीच गंभीर आहे. आपला आवाज ठीक नाही, असं वाटलं किंवा बरं वाटत नसेल तर ती आजही ध्वनिमुद्रण टाळते, भले कितीही अपसमज होवोत. आशाताईचंही तसंच आहे, तीही पूर्वीच्याच जोमात व उत्साहात गाते. नियती कालातीत असते, त्यामुळे आमच्या सूरसाधनेला आजही खंड नाही. याचंच फळ म्हणजे माझ्या नावाने एका बहिणीला दुसरीच्या नावाने पुरस्कार दिला जातोय. मी मात्र असं मानतो की हा आमचा गौरव नसून सांगीतिक क्षेत्राचा, सांगीतिक जीवनाचाच सन्मान आहे!