‘शिवी नाही… खेळ आहे हा’ असे वेगळेच घोषवाक्य घेऊन आलेल्या ‘तुझ्या आयला’ या राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक सुजय डहाके यांचा आगामी चित्रपट त्यातल्या वेगळ्या विषयामुळे लक्ष वेधून घेतो आहे. माणसांच्या तोंडी शिव्या का असतात, शिव्या देणं याचा भाषेशी काही संबंध आहे का, अशा प्रश्नांचा वेध घेत २५ सप्टेंबरला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाची मांडणी केली आहे, अशी माहिती सुजय डहाके यांनी दिली.
‘मी बोर्डिंग स्कूलचा विद्यार्थी, आम्ही मधल्या सुट्टीत हा वेगळा खेळ खेळायचो. मी पन्हाळ्यात शिकलो. पुण्यासारख्या शहरी वातावरणात वाढलेला मी आणि माझे इथले बोर्डिंग स्कूलमधले मित्र हे सांगली, सातारा, मिरज अशा वेगवेगळ्या ग्रामीण भागातून आलेले होते. त्यामुळे खेळ खेळत असताना, माझे शहरी संदर्भ असायचे. तर त्यांचे गावखेड्यातले विषय आणि त्यातून आलेले संदर्भ जोडले जाऊन एक वेगळाच खेळ आकाराला येत गेला. माझ्या डोक्यात हा विचार घोळत होता, की आजवर शिव्यांवर कोणीही संशोधन केलेलं नाही. म्हणजे आत्ताही तरुण मुलं शिव्या देत बोलतात, यावरून गदारोळ सुरू आहे. पण, मुळात या शिव्या येतात कुठून? त्यांचा उगम कसा झाला? शिव्या नेहमीच आईवरून का दिल्या जातात? बापावरून दिलेली शिवी आपल्याला फार मनाला लागत नाही, पण आईवरून शिवी दिली की संताप का होतो? असे अनेक प्रश्न एका बारा वर्षांच्या मुलाला पडले आहेत. आणि या सगळ्याचा शोध घेण्याची त्याची जी प्रक्रिया आहे, त्यातून ‘तुझ्या आयला’ हा चित्रपट आकाराला आला आहे’, असं सुजय डहाके यांनी सांगितलं.
‘तुझ्या आयला’ हा चित्रपट करत असताना आलेलं खरं आव्हान हे यातल्या पात्रांसाठी योग्य मुलांची निवड करणं आणि त्यांच्याकडून काम काढून घेणं हे होतं, असं त्याने सांगितलं. ‘संपूर्ण महाराष्ट्रभरातून जवळपास बाराशे मुलांची ऑडिशन्स आम्ही घेतली होती. ही सगळीच १०-१२ वर्षांची मुलं आहेत. आणि ही जेवढी दहा-पंधरा मुलं चित्रपटात आहेत, त्यांच्यापैकी कोणीही बालकलाकार नाही. आम्ही जी पात्रं लिहिली होती, त्यानुसार कोण अधिक चपखल बसतं आहे, हा विचार करून आम्ही प्रत्येकाची निवड केली. त्यांच्याकडून कार्यशाळा करून घेतली आणि मग या चित्रपटाच्या चित्रीकरणाला प्रत्यक्ष सुरुवात झाली. हा खेळ त्यांच्यात रुजणं आणि त्यांना तो खेळता येणं महत्त्वाचं होतं. या खेळातून जेन झी पिढीचे प्रश्न, त्यांचे संदर्भ, त्यांच्या समस्या लोकांसमोर कशा आणता येतील, हा विचार मी प्रामुख्याने केला’, असं सुजयने सांगितलं.
ट्रोलिंग ही शाब्दिक हिंसाच…
ट्रोलिंग ही एक प्रकारे शाब्दिक हिंसाच आहे, असा आग्रही मुद्दा त्याने मांडला. ‘ट्रोलिंग ही थेट शिवी नाही, पण एखाद्याने पोस्ट टाकली आणि ती कोणाला नाही पटली तर त्याखाली ज्या भाषेत कमेंट्स आलेल्या असतात ते लक्षात घेता ट्रोलिंग हेही आता शिवी म्हणूनच गणलं जात आहे’, असं त्याने सांगितलं. म्हणजे अलीकडे तरुणांनी केलेलं आंदोलन हे अगदी याचं ताजं उदाहरण म्हणता येईल. आंदोलनातील तरुणांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिव्या दिल्या म्हणून गदारोळ झाला, पण खरोखरच जेन झी शिव्या देत आहेत का? हा विचारच केला गेला नाही. या शिव्यांचा त्यांच्या भाषेशी, ते ज्या वातावरणात वाढले आहेत त्याच्याशी संबंध आहे का याचाही विचार व्हायला हवा. आपली पिढीसुद्धा अर्धी आधुनिक आणि अर्धी पारंपरिक अशा मिश्र वातावरणात वाढली. आईवडिलांनी दिलेले संस्कार असल्याने आपण शिव्यांचा वापर रोजच्या बोलण्यात फार जपून करतो. पण, जेन झी मुळातच अशा वातावरणात जन्माला आले आहेत, जिथे त्यांच्या आजूबाजूला ट्रोलिंग आणि त्यात वापरली जाणारी हिंसक भाषा सर्वत्र व्यवहारात आहे. त्यामुळे आपल्याला शिव्या जेवढ्या असांस्कृतिक वाटतात, तितक्या त्या जेन झींना वाटत नाहीत. आम्ही आमच्या भाषेतून व्यक्त झालो आहोत फक्त… तुम्हाला ते एवढं का लागलं? असा प्रश्न ते विचारतायेत. ‘तुझ्या आयला’च्या माध्यमातून मी या सगळ्याचा शोध घ्यायचा प्रयत्न केला आहे आणि आंदोलनाच्या निमित्ताने घडलेल्या घटना ताज्या असल्याने या सगळ्याचा एक संदर्भ छान जुळून आला आहे, अशा शब्दांत त्याने योग्य वेळी हा चित्रपट प्रेक्षकांसमोर येत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला.
सेन्सॉर बोर्डाच्या चौकटीतून…
या चित्रपटाचा हेतू लोकांना चिथावण्याचा अजिबात नाही, आणि तरीही कथाविषयाच्या अनुषंगाने जर शिव्या चित्रपटात येणारच असतील तर त्याची मांडणी कशी योग्य पद्धतीने करता येईल, वादविवाद होणार नाहीत किंवा सेन्सॉर बोर्डाच्या चौकटीत राहूनही आशय चोख कसा पोहोचवता येईल, हे आव्हान कथालेखन करण्याच्या प्रक्रियेपासून असतंच, असा अनुभवही सुजयने सांगितला.
चित्रपटांच्या निमित्ताने नवनव्या क्षेत्रांचा अभ्यास होतो
प्रत्येक वेळी नवीन कथाविषय घेऊन चित्रपट करायला आपल्याला आवडत असल्याचं त्याने सांगितलं. ‘तुझ्या आयला’च्या निमित्ताने शाळा-महाविद्यालयांच्या सद्यःस्थितीचा अभ्यास करता आला. तेच ‘श्यामची आई’ म्हणजे थेट इतिहासातलं संशोधन-अभ्यास, ‘केसरी’च्या निमित्ताने पैलवान आणि आखाड्यांचा अभ्यास झाला. तर ‘आजोबा’च्या निमित्ताने वन्यजीव संवर्धन क्षेत्राचा अभ्यास करता आला. हे सतत नवं नवं शिकत राहणं मला आवडतं, असं त्याने सांगितलं.
चित्रपट दिग्दर्शनाचा वेग वाढवणार
‘तुझ्या आय़ला’ चित्रपटाबरोबरच सुजयने ‘रक्तफळ’ या त्याच्या आगामी चित्रपटाचीही तयारी सुरू केली आहे. त्याबद्दल बोलताना सुरूवातीला मी तीन वर्षांतून एखादा चित्रपट करत होतो, आता मात्र चित्रपट दिग्दर्शनाचा वेग वाढवण्याचा निर्णय घेतला आहे, असं त्याने स्पष्ट केलं. ‘रक्तफळ’ हाही पूर्णपणे वेगळा चित्रपट असून त्यानिमित्ताने उपेंद्र लिमये, अमृता खानविलकर, ‘कोटा फॅक्टरी’ या गाजलेल्या वेबमालिकेत महत्त्वाची व्यक्तिरेखा साकारलेला मयूर मोरे असे कलाकार एकत्र आले आहेत, असंही त्याने सांगितलं. त्याने आजवर नवीन कलाकारांबरोबर काम करण्यावर अधिक भर दिला आहे. प्रचलित कलाकारांबरोबर त्यांनी साकारलेल्या भूमिकांची प्रतिमाही प्रेक्षकांच्या मनात प्रवेश करते, जे मला फारसं रुचत नाही. एकदा प्रेक्षक कथेत शिरला की त्याला मध्येच तोडणारे कुठलेही संदर्भ येऊ नयेत आणि एकसंध कथा पाहण्याचा अनुभव त्यांना घेता यावा, या उद्देशाने मी शक्यतो नवीन कलाकारांबरोबर काम करण्यावर भर देतो, असंही त्याने सांगितलं.
