ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना चव्हाण यांची भावना

रंगभूमी आणि चित्रपटांमधून काम करीत असताना रसिकांनी सदैव दाद आणि प्रोत्साहन दिले. रसिकांनी भरभरून दिलेल्या प्रेमामुळेच इथवर पोहोचले, अशी भावना ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांनी बुधवारी व्यक्त केली.

कलासंस्कृती परिवारतर्फे आयोजित स्टार ऑफस्क्रीन पुरस्कार सोहळ्यात सुलोचना दीदींना कलाकृतज्ञता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या वेळी त्यांनी हे मनोगत व्यक्त केले. ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त, प्रसिद्ध अभिनेते जॅकी श्रॉफ, चारुदत्त सरपोतदार, सुधीर मांडके, कलासंस्कृती परिवारचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले या वेळी उपस्थित होते.

गुरु भालजी पेंढारकर आणि रसिकांची मी आभारी आहे, त्यांच्या प्रोत्साहनामुळेच हा टप्पा गाठता आला, असेही सुलोचनादीदींनी सांगितले.

मी कामगार आहे, मला फक्त काम करता येते, बोलता नाही. ‘तोंड बंद, कान खुले आणि काम सुरू’ हाच माझ्या कामाचा फंडा अशी सुरूवात करीत जॅकी श्रॉफ म्हणाले,की पडद्यामागील मंडळींमुळेच माझ्यासारखे कलाकार मोठे होतात. जात-पात न मानता सर्वाचा सन्मान करा आणि आई-वडिलांची सेवा करा.

झगमगत्या रुपेरी पडद्यामागील अनिल शेलार, बाळू शेलार, बाळू भोकरे, अमित इंगळकर, विठ्ठल सलगर, चंद्रकांत भंडारी, जगदीश जगदाळे या सहायक तंत्रज्ञ, स्पॉट बॉय, सेट बॉय, प्रकाशयोजना, वेशभूषा, प्रॉडक्शन आर्टिस्ट आदी विभागातील कर्मचाऱ्यांना सन्मानचिन्ह, पुस्तके आणि दोन लाख रुपयांच्या विम्याची कागदपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

बाबा शिंदे, तन्मय पेंडसे, विवेक दामले, भारत कुमावत, प्रवीण जोशी यांना समाजसंस्कृती पुरस्कार आणि यशवंत भुवड, शिवानंद आक्के यांना निकोप पुरस्काराने गौरविण्यात आले.