Sumeet Raghavan on Daughter Deeya and Son Neerad profession: कलाकारांची मुलं कोणत्या क्षेत्रात काम करतात हे जाणून घेण्यासाठी चाहते कायमच उत्सुक असतात. तसेच मुलाखती, सोशल मीडियावरील पोस्ट या माध्यमांतून त्यांच्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. अभिनेते सुमीत राघवन आणि त्यांची पत्नी अभिनेत्री चिन्मयी सुमीत हे मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय कलाकार आहेत. आजवर त्यांनी विविध भूमिका साकारत प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं. कधी गंभीर, तर कधी हसवणाऱ्या भूमिका त्यांनी साकारल्या आहेत. मालिका, चित्रपट, नाटक या माध्यमांत ते काम करताना दिसतात.

सुमीत राघवन आणि चिन्मयी यांनी नुकतीच ‘राजश्री मराठी’ला मुलाखत दिली. त्या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या करिअर अन् कामाबद्दल, तसेच त्यांच्या खासगी आयुष्यातील काही गोष्टींबद्दल वक्तव्य केले. याबरोबरच काही किस्सेही सांगितले. या सगळ्यात त्यांनी त्यांची मुले कोणत्या क्षेत्रात काम करतात याबद्दलही खुलासा केला. ते नेमके काय म्हणाले, ते जाणून घेऊ…

“दिया याच क्षेत्रात…”

सुमीत राघवन म्हणाले, “दिया याच क्षेत्रात सिनेमॅटोग्राफर म्हणून काम करते. ती कॅमेरा पर्सन आहे. ती शॉर्ट फिल्म करते. तिने महेश लिमये यांना ‘हिरामंडी’साठी असिस्ट केले होते. तिचं काम सुरू असतं.

चिन्मयी सुमीत म्हणाल्या, “मला वाटतं की, आमच्या घरातील सगळ्यात प्रॅक्टिकल मुलगी दिया आहे. त्यामुळे आम्ही कुठलीही गोष्टी ठरवत असू, म्हणजे आज आम्ही कोणते कपडे घालायचे यासह आम्ही सगळे जण सगळं दियाला विचारतो. अगदी नीरादही तिला विचारतो. सुमीतचं शॉपिंग तिच्याबरोबर असतं, मी जात नाही. ती पैसे वाचवते आणि आम्ही तिघे जण पैसे उधळतो. ती मला विचारते की, अम्मा तुला या वस्तूची खरंच गरज आहे की तुला हे हवंय.” सुमीत राघवन म्हणाले की, ती माझ्याकडे पैसेच मागत नाही. ती सगळं उत्तमरीत्या सांभाळते.

तुमच्या दोघांत खर्चीक कोण आहे, असे विचारल्यानंतर सुमीत राघवन म्हणाले की, मी जास्त खर्चीक; तर चिन्मयी म्हणाल्या की, मी जास्त खर्च करते. त्या असेही म्हणाल्या की, मला खूप वस्तू लागतात आणि सुमीतला खूप महाग वस्तू लागतात.

याबरोबरच मुलगा नीरद म्युझिक क्षेत्रात काम करतोय, असेही त्यांनी सांगितले.