मनोरंजन विश्वात असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी इंडस्ट्रीत येण्याआधी तर काहींनी इंडस्ट्रीत आल्यानंतर त्यांच्या नावामध्ये बदल केला. काहींनी नाव बदललं तर काहींनी नावांमधील अक्षरात बदल केले. यामध्ये अगदी अक्षय कुमार, कियारा अडवाणी, अजय देवगण अशा अनेकांचा समावेश आहे. अनेक कलाकार हल्ली त्यांचं आडनाव न लावता वडिलांचं नाव लावणं पसंत करतात. यामध्ये ललित प्रभाकर, सायली संजीव अशा अनेकांचा समावेश आहे. अशातच आता अभिनेता सुमीत राघवननेही त्याच्या आडनावाबद्दल सांगितलं आहे.
सुमीत राघवन मराठी व हिंदी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेता आहे. आतापर्यंत त्याने अनेक नाटक, मालिका आणि चित्रपटांत काम केलं आहे. पण, अनेकांना माहीत नसेल की सुमीत राघवन हा मुळचा दक्षिणेकडचा असून मराठी ही त्याची मातृभाषा नाहीये. याबद्दल त्याने स्वत: लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे. अभिनेता नेमकं काय म्हणाला याबद्दल जाणून घेऊया…
राघवन हे माझं आडनाव नाही – सुमीत
मुलाखतीत सुमीत राघवन म्हणाला, “आम्ही दक्षिणेकडचे मराठी आहोत. माझे वडील तमिळ आहेत. आई कर्नाटकची आहे पण मी महाराष्ट्राचा आहे. मी मराठी, हिंदी आणि गुजरातीत काम केलं आहे. पण इथे मला एक स्पष्ट करायचं आहे की राघवन हे माझं आडनाव नाहीये. राघवन हे माझ्या वडिलांचं नाव आहे. आमच्यामध्ये आडनाव नसतं. वडिलांचं नाव हे माझं आडनाव पण, माझी मुलं किंवा चिन्मयी ते राघवन नाही लावणार. ते सुमीत लावतात. चिन्मयी सुमीत, नीरज सुमीत पण बरेच जण काय करतात की चिन्मयी सुमीत राघवन करतात किंवा चिन्मयी राघवन करतात पण तसं नाहीये ते. त्यामुळे आता जर कोणी चिन्मयी राघवन म्हटलं तर आम्ही लक्ष देणार नाही.”
सुमीत राघवनने यावेळी स्पष्ट केलं की त्यांच्याकडे आडनाव नसतं. वडिलांचं नाव हेच त्यांचं आडनाव असतं. त्यामुळे त्याची पत्नी चिन्मयीसुद्धा सुमीतचं नाव लावतात आणि त्याची मुलही प्रथेप्रमाणे वडिलांचं नाव लावतात.
दरम्यान, सुमीत राघवनने आतापर्यंत अनेक मालिका, चित्रपट आणि नाटकात काम केलं आहे. सुमीतने मराठी, हिंदीसह गुजराती रंगभूमीवरही काम केलं आहे. अलीकडेच त्याचं नवीन नाटक प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. यामध्ये तो व चिन्मयी सुमीत एकत्र काम करत आहेत.
