सध्या देशभरात दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी आणि बॉलिवूड हा सर्वाधिक चर्चेत असलेला मुद्दा आहे. दोन्ही चित्रपटसृष्टीतील कलाकारांमध्ये मागच्या काही दिवसांपासून सातत्यानं सोशल मीडिया वॉर सुरू असलेलं पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबूनं मी बॉलिवूडला परवडणार नाही, त्यामुळे हिंदी चित्रपटांवर मी अजिबात वेळ वाया घालवणार नाही असं वक्तव्य केलं होतं. यानंतर बॉलिवूडमध्ये खळबळ माजल्याचं चित्र आहे. कलाकार यावर प्रतिक्रिया देत असून आता या वादात प्रसिद्ध अभिनेता सुनील शेट्टीनंही उडी घेतली आहे. ‘बाप हा बापच असतो. तसं बॉलिवूड नेहमीच बॉलिवूड राहिल.’ अशी प्रतिक्रिया त्यानं एका मुलाखतीत दिली आहे.

सुनील शेट्टीनं नुकतीच ‘आज तक’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत तो म्हणाला, “मी जन्माने दाक्षिणात्य असलो तरीही माझी कर्मभूमी ही मुंबई आहे. त्यामुळे मला मुंबईकर म्हटलं जातं. सध्या दाक्षिणात्य विरूद्ध बॉलिवूड हा मुद्दा सोशल मीडियावर तयार करण्यात आला आहे. पण आम्ही सर्व भारतीय आहोत. डिजिटल प्लॅटफॉर्मवर पाहायला गेलं तर तिथे भाषा नाही तर कंटेन्ट महत्त्वाचा आहे. सत्य हे आहे की प्रेक्षक ठरवत आहेत की त्यांना काय पाहायचं आहे.”

बॉलिवूड नेहमी बॉलिवूड राहणार
सुनील शेट्टी म्हणाला, “समस्या ही आहे की आपण आपल्या प्रेक्षकांना विसरलोय. आपण कंटेन्टवर काम करायला हवं. चित्रपटात आपण नेहमीच म्हणतो की बाप हा नेहमीच बाप असतो आणि कुटुंबीय हे कुटुंबीयच असतात. तसंच बॉलिवूड नेहमीच बॉलिवूड असणार आहे. जेव्हा भारताचं नाव घेतलं जाईल तेव्हा बॉलिवूडच्या अभिनेत्यांचंही नाव घेतलंच जाईल.” सुनील शेट्टीनं यामध्ये कोणाचंही नाव घेतलं नसलं तरीही त्याने अप्रत्यक्षपणे दाक्षिणात्य अभिनेता महेशबाबूलाच टोला लगावल्याचं बोललं जात आहे

काय म्हणाला होता महेश बाबू
काही दिवसांपूर्वी महेशबाबूनं बॉलिवूडबाबत मोठं वक्तव्य केलं होतं. ज्यावरुन मोठा वाद झाला होता. तो म्हणाला होता, “बॉलिवूडला मी परवडणार नाही. त्यामुळे मी हिंदी चित्रपटांवर माझा वेळ अजिबात वाया घालवणार नाही. तसंही मला बॉलिवूडमधून फारशा ऑफर मिळालेल्या नाहीत. त्यामुळे मी इथेच ठीक आहे.”

महेश बाबूनं दिलं स्पष्टीकरण
आपल्या वक्तव्यावरून वाद झाल्यानंतर महेश बाबून त्यावर स्पष्टीकरण दिलं होतं. तो म्हणाला, “मी ज्या चित्रपटसृष्टीत काम करत आहे त्या ठिकाणी मी कंफर्टेबल आहे. पण त्यासोबतच मी सर्व भाषांचा आदर करतो.”