१९९७ मध्ये प्रदर्शित झालेला ‘बॉर्डर’ हा वॉर-अॅक्शन चित्रपट अनेकांना आवडला. हा एक मल्टीस्टारर चित्रपट होता; ज्यामध्ये सनी देओल, अक्षय खन्ना, सुनील शेट्टी व जॅकी श्रॉफसह अनेक कलाकार दिसले होते. चित्रपटाच्या कथेसोबतच लोकांना त्यातील गाणीही खूप आवडली आणि आजही तुम्हाला अनेकांच्या तोंडून ऐकायला मिळतील. हा चित्रपट जेपी दत्ता यांनी दिग्दर्शित केला होता आणि अभिनेता सुनील शेट्टी यांनी या चित्रपटात भैरव सिंहची भूमिका साकारली होती.
आता अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेता सुनील शेट्टीने त्याच्या या आयकॉनिक चित्रपटाबद्दल सांगितले आहे. त्याने सांगितले की, दिग्दर्शक जेपी दत्ता यांच्यामुळे त्याने या चित्रपटात काम करण्यास नकार दिला होता. नंतर त्याच्या सासूच्या आग्रहास्तव त्याने या चित्रपटाला होकार दिला.
जेपी दत्ता यांच्यामुळे दिला होता नकार
अलीकडेच सुनील शेट्टीने ‘रेडिओ नशा’शी त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल चर्चा केली. यावेळी त्याने ‘बॉर्डर’ चित्रपटाचा उल्लेख केला आणि सुरुवातीला भैरव सिंहची भूमिका करण्यास नकार का दिला होता हे सांगितले. तो म्हणाला, “मी ही भूमिका नाकारली होती. कारण- मी ऐकले होते की, जेपी दत्ता खूप कडक दिग्दर्शक आहेत. जर ते नाराज झाले, तर ते मला शिवीगाळही करतील. मी स्वतः खूप रागीट स्वभावाचा माणूस होतो.”
सुनील शेट्टी पुढे म्हणाला, “जेपीजी मला भेटायला आले, तेव्हा मी त्यांना सांगितले की, मी तुमच्याशी बोलेन. नंतर मी माझ्या सेक्रेटरीला सांगितले की, मी हा चित्रपट करू शकणार नाही. कारण- जर त्यांनी मला शिवीगाळ केली, तर मी हात उचलेन. मला कोणाशीही संबंध बिघडवायला आवडत नाही. म्हणून मी ते विसरून जाण्याचा विचार केला; पण जेपी मला कास्ट करण्यासाठी ठाम होते आणि त्यांनी भरत शाहशी संपर्क साधला, जे माझ्या सासूबाईंना ओळखत होते.
त्यानंतर तो चित्रपट माझ्या सासूबाईंमार्फत माझ्याकडे परत आला. माझ्या सासूबाईंनी मला बसवले आणि त्या मला म्हणाल्या की, तू हा चित्रपट कर. पण मी त्यांना सांगितले की, माझी एक अट आहे. जर ‘अशी’ परिस्थिती उद्भवली, तर मी चित्रपट सोडेन.” हा चित्रपट १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित होता.