बॉलिवूडमध्ये अशी अनेक गाणी प्रदर्शित झाली आहे. ज्याच्या लिरिक्सवरून वाद झाले, टीका झाली, धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप झाला. अनेकदा तर या गाण्यांच्या विरोधात खटलेही दाखल करण्यात आले. ज्यामुळे निर्मात्यांना माफी मागावी लागली आहे. आता सनी लिओनीच्या अलिकडेच प्रदर्शित झालेल्या ‘मधुबन में राधिका नाचे’ या गाण्याच्या बाबतीतही असंच काहीसं घडलं. मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी या गाण्यावर आक्षेप घेल्यानंतर आता निर्मात्यांनी गाण्याच्या लिरिक्स बदलण्याचा निर्णय घेतला आहे.

सनी लिओनीच्या ‘मधुबन में राधिका नाचे’ या गाण्याची निर्मिती ‘सारेगम म्युझिक’ने केली आहे. सर्व स्तरातून या गाण्याला होत असलेला विरोध पाहता एक पत्रक प्रसिद्ध करत निर्मात्यांनी या गाण्याच्या लिरिक्स बदलणार असल्याचं स्पष्ट केलं. आपल्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी लिहिलं, ‘या गाण्यावर लोकांच्या प्रतिक्रिया पाहता आणि लोकांच्या भावनांचा विचार करता पुढीव ३ दिवसांत या गाण्याच्या लिरिक्स बदलल्या जाणार आहेत. त्यानंतर गाण्याचं नवीन व्हर्जन प्रदर्शित केलं जाणार आहे. तसंच जुनं गाणं इंटरनेटवरून हटवण्यात येणार आहे.’ सनी लिओनीवर चित्रत झालेलं हे गाणं २२ डिसेंबरला प्रदर्शित झालं होतं. ‘मधुबन में राधिका नाचे जैसे जंगल में नाचे मोर’ अशा या गाण्याच्या ओळी आहेत.

‘मधुबन में राधिका’ हे मूळ गाणं मोहम्मद रफी यांनी १९६० सालात कोहिनूर या सिनेमासाठी गायलं होतं. त्यानंतर आता गायिका कनिका कपूर आणि गायक अरिंदम चक्रवर्ती यांनी या गाण्याचं रिमेक सारेगामा म्युझिक आणि साकीब तोशी यांच्यासाठी गायलं आहे. हे गाणं रिलीज झाल्यानंतर यूट्यूबवर कोट्यवधींनी व्यूज घेत असताना मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी त्यावर तीव्र आक्षेप घेतला होता.

“काही लोक सातत्याने हिंदू भावनांचा अनादर करत आहेत. भारतात राधेची मंदिरं आहेत. आपण तिची पूजा करतो. साकिब तोशी यांनी त्यांच्या धर्माबाबत गाणी बनवावी, पण अशी गाणी आमच्या भावना दुखावतात. जर हा व्हिडीओ येत्या तीन दिवसांत काढून टाकण्यात आला नाही, तर मी सनी लिओनी आणि तोशी यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करेन”, असं नरोत्तम मिश्रा म्हणाले होते.

दरम्यान, मथुरेतील एका पुजाऱ्यांनी देखील या व्हिडीओवर बंदी आणण्याची मागणी केली होती. “सरकारने सदर अभिनेत्रीविरोधात कारवाई केली नाही आणि तिच्या व्हिडिओवर बंदी घातली नाही, तर आम्ही न्यायालयात जाऊ”, असा इशारा वृंदावनमधील संत नवल गिरी महाराज यांनी दिला होता.