Superstar Yash Movie Toxic Release Date Update: काही दिवसांपासून जगात युद्धसदृश स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे यामध्ये थेट सहभागी नसलेल्या देशांसुद्धा याचा फटका बसत असून, याचा अनेक क्षेत्रांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यापैकीच एक म्हणजे मनोरंजन क्षेत्र. काही चित्रपट जागतिक स्तरावर प्रदर्शित होत असतात. त्यामुळे सध्या निर्माण झालेल्या या तणावपूर्ण परिस्थितीचा चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर परिणाम होऊ नये म्हणून बिग बजेट चित्रपटाच्या मेकर्सनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

दाक्षिणात्य सुपरस्टार यशची मुख्य भूमिका असलेला ‘टॉक्सिक’ हा चित्रपट काही दिवसांपासून चर्चेत आहे. त्यामध्ये कियारा अडवाणी, तारा सुतारिया यांसारख्या काही लोकप्रिय अभिनेत्री महत्त्वपूर्ण भूमिकांतून झळकणार आहेत. हा चित्रपट मार्च महिन्याच्या १९ तारखेला प्रदर्शित होणार होता. परंतु, आता या चित्रपटाची रिलीज डेट बदलण्यात आली असून, चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे.

यश पोस्ट शेअर करत काय म्हणाला?

यशने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत म्हटलं, “टॉक्सिक ए फॅरी टेल फॉर ग्रॉन अप्स (Toxic a Fairy tale for Grown-ups) हा एक असा चित्रपट आहे, जो आम्ही जगातीक स्तरावरील प्रेक्षकांसाठी बनवला आहे. हा चित्रपट कन्नड आणि इंग्रजीत बनवण्यात आला आहे. जागतिक स्तरावरील आणि आपल्या देशातील प्रेक्षक चित्रपटाशी रिलेट करतील या दृष्टीनेच हा चित्रपट बनवण्यात आला आहे. अनेक वर्षे या चित्रपटावर मेहनत घेतल्यानंतर आम्ही हा चित्रपट तुम्हा सर्वांना १९ मार्चला दाखवण्यासाठी उत्सुक होतो. परंतु, सध्याचं वातावरण पाहता विशेषकरून मध्य पूर्वेमधील परिस्थिती लक्षात घेता, आम्ही चित्रपट मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकणार नाही म्हणून हा कठीण, पण महत्त्वाचा निर्णय घेत चित्रपटाची तारीख बदलत आहोत.”

‘या’ तारखेला प्रदर्शित होणार ‘टॉक्सिक’

यशने पुढे या पोस्टमधून “तुम्हा सर्वांच्या प्रेमासाठी तुमचे धन्यवाद. तुमचा असाच पाठिंबा कायम राहू द्या. टॉक्सिक हा चित्रपट आता चित्रपटगृहांत भारतीय भाषांसह इंग्रजीत ४ जून २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे.” असं म्हटलं आहे. ‘टॉक्सिक’ची रिलीज डेट बदलल्यामुळे आता ‘धुरंधर’ आणि ‘टॉक्सिक’ हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर क्लॅश होणार नाहीत. त्याशिवाय जगभरात निर्माण झालेल्या या परिस्थितीचाही चित्रपटाला फटका बसणार नाही, अशी मेकर्सची आशा आहे.

अनेकदा एकाच दिवशी दोन बिग बजेट चित्रपट प्रदर्शित झाल्याने त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही आणि दोघांचही नुकसान होतं, असं चित्र पाहायला मिळतं. येत्या काळातसुद्धा रणवीर सिंह-अक्षय खन्नाचा ‘धुरंधर’, तर दाक्षिणात्य अभिनेता यशचा ‘टॉक्सिक’ हे दोन मोठी स्टारकास्ट असलेले सिनेमे एकाच दिवशी प्रदर्शित होणार होते. परंतु, आता ‘टॉक्सिक’ची तारीख बदलण्यात आल्यामुळे निदान देशभरातली कलेक्शनवर तरी त्याचा परिणाम होणार नाही.