सूर्या व ज्योतिका तमिळ फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात लोकप्रिय व आदर्श जोडपं आहे. दोघांनी नुकतंच लग्नाच्या २० व्या वाढदिवसानिमित्त पुन्हा लग्न केलं. त्यांच्या लग्नाला त्यांची मुलं दिया व देव, तसेच कुटुंबीय व सूर्याचा भाऊ कार्ती व काही जवळचे मित्र उपस्थित होते. सूर्याचे वडील ज्येष्ठ अभिनेते शिवकुमार यांनी या दोघांचं कौतुक केलं. लग्नानंतर ज्योतिका सूर्याबरोबर मुंबईत सहज वेगळी राहू शकली असती, त्याला आमच्यापासून दूर करू शकली असती, पण तिने तसं केलं नाही. तिचं शहर, घर सगळं सोडून ती १८ वर्षे आमच्याबरोबर राहिली, असं ते म्हणाले.
“प्रेम सर्वांच्याच नशिबात नसतं. जेव्हा सूर्याच्या आईने त्याला विचारलं होतं की, तो कोणाच्या प्रेमात का पडत नाही, तेव्हा तो म्हणाला होता, ‘आपण कोणत्याही मुलीच्या प्रेमात पडू शकत नाही.’ त्यानंतर मुंबईच्या एका मुलीच्या (ज्योतिका) प्रेमात तो पडला. लग्न करेन तर तिच्याशीच करेन या निर्णयावर ठाम राहून त्याने चार वर्षे वाट पाहिली आणि शेवटी त्यांनी लग्न केलं,” असं जेएफडब्ल्यू फेव्हरेट्स अवॉर्ड्स २०२६ च्या रेड कार्पेटवर बोलताना शिवकुमार म्हणाले.
ज्योतिका १८ वर्षे आमच्याबरोबर राहिली – शिवकुमार
शिवकुमार पुढे म्हणाले, “लग्नानंतर ती सूर्याला मुंबईला घेऊन जाऊ शकली असती आणि तिथे स्थायिक होऊ शकली असती. मी काहीही बोलू शकलो नसतो. पण ती १८ वर्षे इथेच राहिली. शिवाय, आजकाल अभिनेत्री लग्नानंतर मुले जन्माला घालण्यास तयार नसतात आणि नवऱ्यालाही आई-वडिलांपासून वेगळं होण्यास सांगतात, पण ज्योतिका आमच्याबरोबर राहिली, तिला दोन मुलं आहेत. तिने मुलांसाठी कामातून ब्रेक घेतला.”

शिवकुमार यांना सूर्या व ज्योतिकाचा अभिमान
ज्योतिका व सूर्याचं प्रेम आजही २० वर्षांपूर्वी होतं तसंच आहे, असंही त्यांनी नमूद केलं. “आता त्यांची मुलं विदेशात शिकत आहेत. एका सेलिब्रिटी जोडप्याला २० वर्षांच्या संसारानंतरही तितक्याच प्रेमाने एकत्र आनंदाने राहताना पाहणं दुर्मिळ आहे. असा मुलगा आणि सून मिळाल्याचा मला खूप अभिमान आहे,” असं शिवकुमार म्हणाले.

दरम्यान, सूर्या आणि ज्योतिका यांनी १९९९ मध्ये दिग्दर्शक वसंत यांच्या ‘पुवेल्लाम केट्टुप्पार’ या चित्रपटात पहिल्यांदा एकत्र काम केलं होतं. त्यानंतर त्यांनी ‘उयिरिले कलंथथु’ (२०००), ‘काखा काखा’ (२००३), ‘पेरळगन’ (२००४), ‘मायावी’ (२००५) आणि ‘सिल्लुनु ओरु काधल’ (२००६) या चित्रपटांमध्ये काम केलं. सूर्या व ज्योतिका यांनी २००६ मध्ये लग्न केलं.
