Suriya-Jyothika’s daughter Diya school Graduation Video : दाक्षिणात्य सुपरस्टार सूर्या व अभिनेत्री ज्योतिका यांची लाडकी लेक दिया सूर्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. दियाच्या शाळेत दीक्षांत समारंभ पार पडला. दियाचे आई-वडील या दीक्षांत समारंभाला उपस्थित होते. दियाच्या आईने म्हणजेच अभिनेत्री ज्योतिकाने एक खास व्हिडीओ शेअर केला आहे.

कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटी अंतर्गत असलेल्या मुंबईतील अॅसेंड इंटरनॅशनल स्कूलमध्ये दिया शिकत होती. दियाने अर्थशास्त्र व इंटरनॅशनल रिलेशन्समध्ये शिक्षण पूर्ण केलं आहे. ज्योतिका व सूर्यासाठी लेकीचा दीक्षांत समारंभ खूप अभिमानाचा क्षण ठरला. दोघांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. तिच्याबरोबरचे फोटो व व्हिडीओ ज्योतिकाने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. व्हिडीओमध्ये दिया डिग्री घेताना दिसत आहे.

इन्स्टाग्राम स्टोरीतील एका व्हिडीओत ज्योतिकाने दियाच्या शिक्षकांचे व जेवण बनवणाऱ्या देवी नावाच्या महिलेचे आभार मानले आहेत. दियाच्या शिक्षकांबद्दल ज्योतिकाने लिहिलं, “एक चांगला शिक्षक मेणबत्तीसारखा असतो, जो स्वतः जळून विद्यार्थ्यांचं आयुष्य उजळून टाकतो.”

पाहा व्हिडीओ –

ज्योतिकाने एलकेजीपासून ते १२ वी पर्यंत लेक दियासाठी जेवण बनवणाऱ्या देवीचे आभार मानले आणि तिची डिग्री तिला समर्पित केली. “आमच्या फॅमिली कूक देवी यांनी एका दशकापेक्षा जास्त काळांपासून दियाला या प्रवासात मदत केली. यश हा कधीच एकट्या व्यक्तीचा प्रवास नसतो, जे कळत नकळत तुमच्या या प्रवासात सोबत चालतात त्या सर्वांचा त्यात वाटा असतो,” असं ज्योतिका म्हणाली. ज्योतिकाच्या या व्हिडीओवर कमेंट्स करून चाहत्यांनी दियाचं अभिनंदन केलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सूर्या व अभिनेत्री ज्योतिका यांनी २००६ साली लग्न केलं होतं. दोघांचा प्रेमविवाह होता. या जोडप्याला दोन अपत्ये आहेत. दिया ही १७ वर्षांची आहे, तर त्यांच्या धाकट्या मुलाचं नाव देव असं आहे. काम व मुलांच्या शिक्षणासाठी सूर्या व ज्योतिका चेन्नई सोडून मुंबईला स्थायिक झाले आहेत.