Suriya Jyothika Love story Secret: दाक्षिणात्य सिनेविश्वातील सुपरस्टार सूर्या व ज्योतिका यांची जोडी लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहे. त्यांच्या लग्नाला २० वर्षे पूर्ण होत असून आता ते मुंबईत स्थायिक झाले आहेत. दोन दशकांपूर्वी त्यांच्या संसाराला सुरुवात झाली होती. पण विशेष गोष्ट म्हणजे, लग्नाच्या तीन दिवस आधीच सूर्या व ज्योतिका यांनी ऑनस्क्रीन पती-पत्नीची भूमिका साकारली होती. यानंतर त्यांनी विधीवत लग्न करून खऱ्या आयुष्यात ते एकमेकांचे जोडीदार बनले.
‘सिल्लुनु ओरु काधल’या सिनेमामध्ये सूर्या व ज्योतिका यांनी भूमिका केली होती. एन. कृष्णा दिग्दर्शित या सिनेमामध्ये त्यांनी ऑनस्क्रीन पती-पत्नीची भूमिका साकारली होती. विशेष म्हणजे, या भूमिकेसाठी दोघेही पहिली निवड नव्हते. गौतम या नायकासाठी थलपति विजय तर अभिनेत्री म्हणून भूमिका चावला हिची निवड करण्यात आली होती. मात्र, तिने पत्नीचे पात्र साकारण्यास नकार देत प्रेयसीची भूमिका स्वीकारली होती. यानंतर सूर्याने गौतम तर ज्योतिकाने कुंदवी हे पात्र साकारले होते.
सिनेमा रिलीज होताच तीन दिवसांत केले लग्न
ऑनस्क्रीन पती-पत्नी साकारल्यानंतर ज्योतिका व सूर्या यांनी खऱ्या आयुष्यातही लग्न करण्याचा निर्णय घेतला. अवघ्या तीन दिवसांमध्ये त्यांनी लग्न केले होते. ‘सिल्लुनु ओरु काधल’ सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर तीन दिवसांनी, ११ सप्टेंबर २००६ रोजी चेन्नईतील ‘पार्क शेराटन हॉटेल’मध्ये सूर्या आणि ज्योतिका यांचा विवाह झाला. कुटुंबीय व जवळच्या मित्र-मैत्रिणींच्या उपस्थितीत त्यांचे लग्न झाले.
सुपरस्टार सूर्या व ज्योतिका यांची ‘लव्हस्टोरी’
सिनेमातील गोष्टीप्रमाणे खऱ्या आयुष्यातही सूर्या व ज्योतिका यांची प्रेमकहाणी हटके आहे. दोघांची पहिली भेट ‘पूवेल्लम केट्टुप्पर’च्या सेटवर झाली होती. मुंबईमध्ये वाढलेली ज्योतिका तमिळ सिनेविश्वामध्ये आल्यामुळे ती भाषा शिकून घेत होती. यावेळी तिला सूर्याने डायलॉग समजून सांगण्यास मदत केली. यावेळी त्यांच्यामध्ये मैत्री झाली आणि पुढे याचे रुपांतर प्रेमात झाले. ‘काका काका’ या सिनेमाच्या शूटिंगपासून ते एकमेकांना डेट करत होते. पुढे घरातून सुरुवातीला विरोध झाल्यानंतरही ते लग्न करण्याच्या निर्णयावर ठाम राहिले. यानंतर कुटुंबाच्या उपस्थितीत त्यांचे लग्न पार पडले.
ज्योतिका व सूर्या यांना दोन अपत्य आहेत. २००७ मध्ये त्यांची मुलगी दिया आणि २०१० मध्ये त्यांचा मुलगा देव यांचा जन्म झाला. आता सुपरस्टार सूर्या आणि त्याची पत्नी ज्योतिका करोना काळात चेन्नई सोडून मुंबईत स्थायिक झाले आहेत. ज्योतिकाच्या आई-वडिलांच्या जवळ राहता यावे आणि तिचे बॉलीवूडमधील करिअर पुन्हा सुरू व्हावे, यासाठी सूर्याने हा निर्णय घेतला.
