Suriya Jyothika Marriage relationship secret : दाक्षिणात्य सिनेविश्वातील लोकप्रिय अभिनेता सूर्या व अभिनेत्री ज्योतिका यांची जोडी प्रचंड लोकप्रिय आहे. त्यांच्या लग्नाला २० वर्षे झाली असून, आदर्श जोडपे म्हणून अनेकदा त्यांचे नाव घेतले जाते. ज्योतिका व सूर्या यांच्या दोन दशकांच्या सुखी संसाराचे कारण ज्योतिकाने सांगितले आहे. सूर्याकडून नात्यामध्ये मिळणारी समान वागणूक आणि निर्णय घेताना तो देत असलेला पाठिंबा, याचे कौतुक केले आहे.
‘गलट्टा इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत ज्योतिकाने सूर्याबरोबरच्या अनेक वर्षांच्या नात्याचे गुपित उघड केले. ती म्हणाली, “नात्यात एकमेकांचा आदर केला, एकमेकांचे कौतुक केले, एकमेकांना स्वतःची स्पेस दिली आणि नात्यात मैत्री जपली, तर दोघेही त्या नात्यात समान राहतात. या चार गोष्टी नात्यातील समतोल राखतात आणि खरं तर याच गोष्टींमधून प्रेमाची भावना निर्माण होते.”
एका स्त्रीच्या आयुष्यामध्ये खूप मोठी गोष्ट – ज्योतिका
पुढे ती म्हणाली, “माझ्या आणि सूर्याच्या नात्यात नेहमीच एकमेकांबद्दल कौतुक आणि आदर राहिला आहे. कारण- नात्यामध्ये ८० टक्के महिला या प्रेम आणि आदर देतात; पण जेव्हा ही गोष्ट पुरुषाकडून मिळते, तेव्हा ती एका स्त्रीच्या आयुष्यामध्ये खूप मोठी गोष्ट असते.”

२००६ मध्ये सूर्याशी लग्न केल्यानंतर ज्योतिकाने कुटुंबाला वेळ देत अभिनयातून काही काळ ब्रेक घेतला होता. सात वर्षांच्या ब्रेकनंतर तिने पुन्हा तमीळ चित्रपटसृष्टीत काम सुरू केले. या प्रवासात सूर्याने दिलेल्या पाठिंब्याबद्दल बोलताना ती म्हणाली, “मी काम सुरू केलं, मला हवं तेव्हा थांबले आणि नंतर मुंबईला आले. आता मी मुलांबरोबर इथेच राहते. या पूर्ण प्रवासात सूर्यानं मला खूप साथ दिली.”

पुढे ती म्हणाली, नात्यातील समानता ही फक्त तुमच्या करिअरमध्ये तुम्ही किती यशस्वी आहात किंवा किती मोठे आहात, यावरून ठरत नाहीत. तर नात्यात एकमेकांचं कौतुक करणं, आदर करणं आणि स्वतःची स्पेस जपणं या गोष्टी जास्त महत्त्वाच्या असतात. मला वाटतं की, याचा नात्यावर खूप चांगला परिणाम होतो.

सूर्या आणि ज्योतिका यांनी ११ सप्टेंबर २००६ रोजी चेन्नईमध्ये लग्न केले होते. लग्नापूर्वी काही वर्षे ते एकमेकांना डेट करीत होते. त्यांच्या लग्नाला २० वर्षे झाल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा स्कॉटलंडमधील एका किल्ल्यात लग्न केले. त्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले. सध्या ज्योतिका व सूर्या हे मुंबईत राहत असून, ज्योतिकाने पुन्हा एकदा सिनेविश्वात काम करण्यास सुरुवात केली आहे. सूर्या व ज्योतिकाला मुलगी दिया आणि मुलगा देव अशी दोन अपत्ये आहेत.
