South Superstar Suriya mental struggle : दाक्षिणात्य सुपरस्टार सूर्या हा त्याच्या ‘विश्वनाथ अँड सन्स’ सिनेमामुळे चर्चेत आला आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर पहिल्याच आठवड्यात दमदार कमाई केली आहे. या सिनेमामध्ये त्याच्याबरोबर राधिका सरथकुमार यांनीदेखील मुख्य भूमिका साकारली आहे. सूर्या व राधिका यांची अनेक वर्षांपासून घट्ट मैत्री असून, आता त्यांनी एकत्र सिनेमामध्ये काम केले आहे. राधिका यांनी सूर्याच्या अभिनयाचे कौतुक करीत त्याच्या मानसिक आरोग्याबाबत वक्तव्य केले.
‘विश्वनाथ अँड सन्स’ला बॉक्स ऑफिसवर मिळत असलेल्या तुफान प्रतिसादामुळे सिनेमाच्या सक्सेस पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राधिका सरथकुमार यांनी दिग्दर्शक वेंकी अटलुरी आणि चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे आभार मानले. यावेळी त्यांनी सूर्याचा अभिनय आणि त्याचा वैयक्तिक आयुष्य याबद्दल खास भावना व्यक्त केल्या. तो माझ्यासाठी एक घरातील व्यक्ती असल्याचे मत राधिका सरथकुमार यांनी व्यक्त केले.
आयुष्यातील मानसिक लढा पूर्णपणे वेगळा – राधिका सरथकुमार
त्या म्हणाल्या, “मला सूर्या ही माझ्या घरातील एक व्यक्ती असल्यासारखं वाटतं. कारण- मी त्याचा सगळा संघर्ष आणि कष्ट जवळून पाहिले आहेत. सिनेमामध्ये पडद्यावर आव्हानांचा सामना करणं आणि खऱ्या आयुष्यात गोष्टी हाताळणं फार वेगळं असतं. प्रत्यक्ष आयुष्यातील मानसिक लढा हा पूर्णपणे वेगळ्याच पद्धतीचा असतो. सूर्यानं त्या सर्व संघर्षांवर मात केली असून, मी ते सर्व पाहिलं आहे. त्यानं दिलेला लढा मी पाहिल्यामुळे त्याच्याबद्दल खरोखरच खूप अभिमान वाटतो.”
राधिका यांनी सूर्या यांच्या स्वभावाबद्दलही सांगितलं. सूर्याला खूपच खासगी आयुष्य जगणारी व्यक्ती असल्याचं त्या म्हणाल्या आहेत. राधिका म्हणाल्या, “सूर्या ही जास्त बोलणारी व्यक्ती नाही. तो क्वचितच एखाद्या व्यक्तीसमोर त्याचं मन मोकळं करतो. तो मोजक्या लोकांशीच बोलतो आणि त्याच्या भावना व्यक्त करतो. त्याच्याशी बोलणाऱ्या मोजक्या लोकांपैकी मी एक होते. मी त्याला हे असं करू नकोस, असं कर, असं सांगायचे.”
‘विश्वनाथ अँड सन्स’ हा वेंकी अटलुरी दिग्दर्शित तमीळ चित्रपट असून, तो तेलुगूमध्येही डब करण्यात आला आहे. सूर्यदेवरा नागा वामशी आणि साई सौजन्या यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटात सूर्या यांनी चाळिशीतील व्यावसायिक पिस्तूल नेमबाज संजय विश्वनाथ यांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात राधिका यांनी सूर्या यांच्या आईची भूमिका साकारली आहे.
