दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या ईमेल आणि सोशल मीडिया अकाऊंटमधून डिलीट केलेला डेटा परत मिळवण्यासाठी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) औपचारिकपणे अमेरिकेची मदत मागितली आहे. १४ जून २०२० म्हणजेच ज्या दिवशी सुशांत सिंह त्याच्या घरात मृतावस्थेत सापडला त्या दिवशी असे काय घडले होते याचा तपास सीबीआयला करायचा आहे. यासाठी सीबीआयने अमेरिकेकडे मदत मागितली आहे. सुशांतसिंह याच्या ईमेल आणि सोशल मीडिया अकाउंट्सची डिलीट केलेली माहिती मिळवण्यासाठी तपास यंत्रणेने अमेरिकन कंपन्यांकडून मदत मागितली आहे.
हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार सीबीआयने ही माहिती एमएलएटी म्हणजेच परस्पर कायदेशीर सहाय्य करारांतर्गत कॅलिफोर्नियास्थित गुगल आणि फेसबुककडून मागवली आहे. डिलीट केलेल्या मेल्स आणि चॅटची सर्व माहिती दोन्ही कंपन्यांकडून मागवण्यात आली आहे.




भारत आणि अमेरिका यांच्यात एक एमएलएटी आहे ज्या अंतर्गत दोन्ही बाजू देशांतर्गत प्रकरणांच्या तपासात माहिती घेऊ शकतात. भारतात, गृह मंत्रालय हे एमएलएटी अंतर्गत कोणतीही माहिती पाठविण्याचे किंवा प्राप्त करण्याचे केंद्र आहे, तर अमेरिकेत अशी माहिती अॅटर्नी जनरल कार्यालयाकडून प्राप्त होते.
नाव न सांगण्याच्या अटीवर एका अधिकाऱ्याने सांगितले की, “आम्ही या खटल्याच्या निकालापर्यंत पोहोचण्यापूर्वी कोणतीही बाब मागे ठेवू इच्छित नाही. या प्रकरणात उपयुक्त ठरू शकतील अशा काही हटवलेल्या चॅट किंवा पोस्ट आहेत का हे आम्हाला जाणून घ्यायचे आहे.”
याचा अर्थ असा आहे की सुशांत सिंग राजपूत प्रकरणाचा तपास पूर्ण होण्यासाठी आणखी काही वेळ लागू शकतो कारण एमएलएटी अंतर्गत माहिती मिळविण्यासाठी बराच वेळ लागतो. सुशांत सिंहच्या कुटुंबाचे वकील विकास सिंग यांनी सीबीआयच्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे आणि म्हटले आहे की, ते प्रत्येक पैलूवर तपास करू इच्छित असल्याने मला याबद्दल आश्चर्य वाटले नाही. सुशांत प्रकरणात एकही साक्षीदार नसल्याने अनेक गूढ बाबी आहेत.
सुशांत सिंह राजपूत गेल्या वर्षी १४ जून रोजी मुंबईतील त्याच्या घरी मृतावस्थेत आढळला होता. सुशांतचे वडील केके सिंग यांनी रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ आणि पालकांविरुद्ध पाटणा पोलिसात तक्रार दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयने ऑगस्ट २०२० मध्ये या प्रकरणाचा तपास हाती घेतला. या प्रकरणाच्या तपासात अंमलबजावणी संचालनालय आणि एनसीबी यांचाही सहभाग आहे.