सध्या ‘बॉयकॉट’ हा ट्रेंड चांगलाच व्हायरल होत आहे. आमिर आणि अक्षयसारख्या सुपरस्टारचे सिनेमे लोकांनी बॉयकॉट केले. आता नेटीजन्स येणाऱ्या इतरही मोठ्या स्टार्सच्या आणि स्टारकिड्सच्या चित्रपटांना बॉयकॉट करताना दिसत आहे. शाहरुखचा ‘पठाण’, हृतिकचा ‘विक्रम वेधा’, सलमानचा ‘टायगर ३’ या चित्रपटांना बॉयकॉट करायची मागणी होऊ लागली आहे. अशातच आता ‘बॉयकॉट ब्रह्मास्त्र’ हा ट्रेंड काही दिवसांपासून ट्विटर तसेच इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होऊ लागला आहे.

हा ट्रेंड व्हायरल करण्यात सुशांत सिंग राजपूतच्या कट्टर चाहत्यांच्या सहभाग असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दिग्दर्शक करण जोहरनेसुद्धा ‘ब्रह्मास्त्र’च्या भविष्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. सुशांतच्या चाहत्यांचं असं म्हणणं आहे की, ‘ब्रह्मास्त्र’साठी पहिली निवड ही सुशांतची झाली होती. नंतर करण जोहरने स्टारकिड्सना पुढे आणण्यासाठी सुशांतचा पत्ता कापला आहे. इतकंच नाही तर रणबीरने ‘पीके’ या चित्रपटात आमिरबरोबर काम केलं असल्याचं कारण देऊन लोकं ‘ब्रह्मास्त्र’ला बॉयकॉट करत आहेत

आणखीन वाचा : ‘बॉयकॉट ब्रम्हास्त्र’मुळे करण जोहर चिंतेत? म्हणाला, “९ सप्टेंबरला काय होईल हे याक्षणी…”

पुढच्या महिन्यात म्हणजेच ९ सप्टेंबर रोजी ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट सिनेगृहात प्रदर्शित होणार आहे. या बॉयकॉट ट्रेंडमुळे सध्या निर्माता करण जोहर आणि दिग्दर्शक अयान मुखर्जी हे चिंतेत आहेत. पॅन इंडिया स्केलवर हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याने याकडून दोघांनाही खूप अपेक्षा आहेत. गेली कित्येक वर्षं अयान यावर काम करतोय आणि त्याच्यासाठी हा चित्रपट म्हणजे त्याचा ड्रीम प्रोजेक्ट आहे असं त्याने बऱ्याच मुलाखतीत कबूल केलं आहे.

चित्रपटात रणबीर कपूर, आलिया भट, अमिताभ बच्चन, मौनी रॉय, नागार्जुन अशी दिग्गज मंडळी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटातली २ गाणी प्रदर्शित झाली असून त्यातलं ‘केसरिया’ हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. या चित्रपटात बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान याची झलकदेखील बघायला मिळणार आहे.