अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी दररोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. या प्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीवर सुशांतच्या कुटुंबीयांनी अनेक आरोप केले आहेत. तसंच तपासकार्यात देखील रियाविषयी अनेक गोष्टी समोर येत आहेत.मात्र आता या सगळ्यावर रियाने मौन सोडलं आहे. ‘मी सुशांतवर प्रेम केलं हाच माझ्या गुन्हा होता’, असं रियाने म्हटल्याचं ‘आजतक’च्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.
सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केल्यानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. यामध्ये रिया चक्रवर्तीवर सुशांतच्या कुटुंबीयांनी अनेक आरोप केले आहेत. रियानेच सुशांतला मारायचा प्रयत्न केला, त्याला विष दिलं असा आरोप सुशांतच्या वडिलांनी केला आहे. त्यानंतर रियाने आता या प्रकरणी तिची भूमिका मांडली आहे. सुशांतवर प्रेम करणं हाच माझा गुन्हा होता असं ती म्हणाली आहे.
“माझा एकच गुन्हा झाला मी सुशांतवर प्रेम केलं. तपासकार्यात मला जे – जे विचारण्यात आलं त्याची मी सगळी उत्तरं दिली आहेत. काहीच लपवलं नाही”, असं रियाने म्हटलं.
दरम्यान, या मुलाखतीत रियाने अनेक गोष्टींचा खुलासा केला. युरोप ट्रीपमध्ये सुशांतसोबत नेमकं काय झालं होतं यावरदेखील तिने भाष्य केलं आहे. इतकचं नाही तर सुशांतच्या घरातल्यांनी रियावर जे आरोप केले त्यावरही ती व्यक्त झाल्याचं पाहायला मिळालं.
