स्वप्नीलच्या चाहत्यांवर चढला ‘फुगे’चा फिव्हर

स्वप्नील आणि सुबोधच्या चाहत्यांनीदेखील आपापल्यापरीने ‘फुगे’ चे प्रमोशन करायला सुरुवात केली आहे.

'फुगे'
‘फुगे’ या नावातच धम्माल मस्ती असलेल्या आगामी चित्रपटाची संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शनाआधीच मोठी चर्चा होत आहे. हा सिनेमा येत्या १० फेब्रुवारीला प्रदर्शित होत असल्यामुळे स्वप्नील आणि सुबोधच्या चाहत्यांनीदेखील आपापल्यापरीने ‘फुगे’ चे प्रमोशन करायला सुरुवात केली आहे. खास करून मराठीचा रोमॅण्टिक हिरो म्हणून प्रसिद्ध असलेल्या स्वप्नील जोशीच्या महिला चाहत्यापैकी एकीने ‘फुगे’ सिनेमाचे नाव असलेली मेहंदी आपल्या हातावर रेखाटून घेतली आहे. तर एकीने १० फेब्रुवारी ‘फुगे’ असे नाव कोरलेली संत्री बाजारात विकायला ठेवली आहेत. एवढेच नाही तर, स्वप्नील जोशीची चाहती असलेल्या एका महिला शिक्षिकेने आपल्या शाळेतील मुलांचा ‘पार्टी दे’ या गाण्यावर नाच बसवत, हा व्हिडिओ सोशल साईटवर पोस्ट केला आहे. शिवाय स्वप्नील जोशी आणि सुबोध भावेच्या ‘फुगे’ या सिनेमाच्या यशासाठी किरण जाधव नामक एका फॅनने चक्क कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात जाऊन देवीचा अभिषेक केला.

लव्हस्टोरी नव्हे तर प्रेमाची हटके बॅकस्टोरी सांगणारा हा सिनेमा एका वेगळ्याच धाटणीचा असल्याचे यातून पाहायला मिळते. इंदर राज कपूर प्रस्तुत आणि एस टीव्ही नेटवर्क्ससोबत जीसिम्सचे अर्जुनसिंग बऱ्हान, कार्तिक निशानदार तसेच अश्विन आंचन आणि अनुराधा जोशी निर्मित हा सिनेमा स्वप्ना वाघमारे जोशी यांनी दिग्दर्शित केला आहे. सिनेमाची प्रदर्शनापुर्वीच सामान्य प्रेक्षकांकडून होत असलेली प्रसिद्धी लक्षात घेता हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर हाउसफुल कामगिरी करेल, असे भाकीत केल्यास वावगे ठरणार नाही.

swapnil-fan-kiran-jadhav-at-mahalaxmi-temple

काही दिवसांपूर्वी चित्रपटातील ‘काही कळे तुला…’ हे गाणे प्रदर्शित करण्यात आले होते. स्वप्नील जोशी- प्रार्थना बेहेरे आणि सुबोध भावे-नीता शेट्टीवर आधारित असलेले हे गाणे रसिकांना एका स्वप्नवत दुनियेची सफर घडवून आणते. रोमॅण्टिक या शब्दाला साजेल असा स्पेशल टच देखील या गाण्याला लाभला आहे. विशेष तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे हे गाणे तितकेच दर्जेदार देखील झाले असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. सोशल साईटवर लाँच  करण्यात आलेले हे गाणे अधिक सुंदर दिसावे यासाठी, त्यावर २० लाखाहून अधिक खर्च करण्यात आला आहे. त्यामुळे यावर्षीच्या सर्वात महागड्या गाण्यांच्या यादीत, ‘फुगे’ सिनेमाच्या या गाण्यांचा समावेश होतो.

swapnil-fans-mehendi

‘फुगे’ या सिनेमाच्या नावातच रंजकता असणाऱ्या या सिनेमाला प्रदर्शनापूर्वीच मोठी प्रसिद्धी मिळत आहे. दोन जिवलग मित्राच्या घनिष्ट मैत्रीवर आधारित असलेल्या ‘फुगे’ सिनेमामध्ये बापलेकाची जोडीदेखील पाहायला मिळणार आहे. मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे आणि त्याचा मुलगा मल्हार भावे एकत्र झळकणार आहेत. रुपेरी पडद्यावर मल्हारचे हे पदार्पणच आहे असेच म्हणावे लागेल. मल्हार या सिनेमात छोट्या सुबोधच्या भूमिकेत दिसणार असून, स्वप्नील जोशीच्या लहानपणीच्या भूमिकेत विहान निशानदार हा गोंडस मुलगा आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Swapnil joshis fans pramoting his movie fugey

ताज्या बातम्या