वादग्रस्त वक्तव्यांसाठी आणि आंदोलनात उतरून तडाखेबाज भाषणासाठी प्रसिद्ध असणारी अभिनेत्री स्वरा भास्कर आता महात्मा गांधींच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने पुन्हा चर्चेत आली आहे. “राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणारी विचारसरणी आजही आपल्या समाजात जिवंत आहे.” असे ट्विट स्वरा भास्करने केले आहे.

३० जानेवारी १९४८ साली नथुराम गोडसे याने महात्मा गांधी यांची गोळ्या घालून हत्या केली होती. आज गांधीजींची ७२वी पुण्यतिथी आहे. आजचा दिवस शहीद दिवस म्हणून पाळला जातो. त्यानिमित्ताने स्वरा भास्कर हिने टि्वट केले.

काय म्हणाली स्वरा भास्कर?

स्वराने गांधीजींच्या अखेरच्या क्षणांचे एक पेंटिंग पोस्ट केले आहे. हे पेंटिंग टॉम वट्टाकुझी यांचं आहे. या चित्रात बापूंचा मृत्यृ झाल्यानंतरचा क्षण रंगवण्यात आला आहे. त्यावेळी जनमानसात पसरलेली शोककळा या चित्रातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. त्या चित्रासोबत स्वराने आपलं मतही व्यक्त केलं. ती म्हणाली, “राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणारी विचारसरणी आजही आपल्या समाजात जिवंत आहे. या विचारसरणीकडे न वळता, आपण बापूंच्या पदचिन्हांवर चालूया.”

स्वराचे हे ट्विट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासांत हजारो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहे. अनेकांनी या चित्राखाली बापूंना श्रद्धांजली वाहिली आहे.