‘झी मराठी’वर  बऱ्याच काळानंतर ऐतिहासिक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेचा प्रोमो प्रक्षेपित झाल्यापासूनच यात संभाजीची भूमिका कोण साकारणार? संभाजीराजांचे रूप, त्यांचा इतिहास मालिकेत कसा दाखवला जाईल? असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात पिंगा घालू लागले होते. आता या मालिकेचे प्रोमोज प्रदर्शित झाल्यापासून संभाजींच्या भूमिकेत डॉ. अमोल कोल्हे प्रेक्षकांसमोर आले आहेत. मात्र यावेळी केवळ अभिनेता म्हणून नव्हे तर मालिकेच्या निर्मितीचे शिवधनुष्यही त्यांनीच खांद्यावर पेलले आहे. ‘राजा शिवछत्रपती’ या मालिके आधीपासूनच मला ‘संभाजी’ राजांवर मालिका किंवा चित्रपट सर्व प्रेक्षकांसमोर आणायचा होता. गेली ९ वर्षे मी हे स्वप्न उराशी बाळगून होतो. आणि आज कुठे हे स्वप्न अस्तित्वात आलं आहे. याचा विशेष आनंद आहे. संभाजी राजेंनी आपल्या कर्तृत्वाने औरंगजेबासारख्या शहेनशहाला मात दिली, शौर्य व कर्तृत्वाचा संगम करत ज्याने सर्व लढाया जिंकल्या अशा अजेय राजाची महती अजूनही आपल्यापर्यंत हवी तशी पोहोचलेली नाही. ही मालिका म्हणजे त्याच राजाचा देदीप्यमान इतिहास सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न असेल, असे डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले.

‘राजा शिवछत्रपती’ या मालिकेतील अमोल कोल्हे यांनी साकारलेली शिवाजी महाराजांची भूमिका ही अजरामर ठरली आहे. आजही लोक ती मालिका आवर्जून समाजमाध्यमांवर बघतात. या पाश्र्वभूमीवर शिवाजी महाराजांच्या भूमिकेतून बाहेर पडून संभाजी राजे साकारताना तुम्हाला कोणते आव्हान स्वीकारावे लागले असा प्रश्न विचारला असता, सगळ्यात सुरुवातीला मी ‘कलावैभव’ या संस्थेचे ‘शंभूराजे’ हे नाटक करत होतो. ज्याचे मी ५२० प्रयोग केले. या नाटकामुळेच मला ‘राजा शिवछत्रपती’ या मालिकेत शिवाजी महाराजांची भूमिका मिळाली, असे कोल्हे यांनी स्पष्ट केले. त्यानंतर ‘शिवपुत्र संभाजी राजे’ हे महानाटय़ केलं. ज्याचे १२५ प्रयोग झाले. या व्यक्तिरेखा साकारत असतानाच संभाजी राजे व शिवाजी महाराज या दोन्ही राजपुरुषांचा मी मानसशास्त्रीय आलेख पाहिला. ज्यात माझ्या असं लक्षात आलं की या दोन्ही पुरुषांची शरीरयष्टी, त्यांची चाल, त्यांचे दोन पायांमध्ये अंतर ठेवण्याची पद्धत, शब्दफेक, उच्चार या सर्वच गोष्टींमध्ये खूप फरक आहे. स्वराज्य स्थापन करताना शिवाजी महाराजांना त्यांचं अंतिम ध्येय माहीत नव्हतं. या सर्व टप्प्यांवरून जात असताना ते छत्रपती झाले. आणि दुसरीकडे संभाजी महाराजांना मात्र लहानपणापासूनच भावी राजा म्हणूनच वाढवण्यात आलं. हा जो एक फार मोठा फरक आहे. तो फरक लक्षात घेऊन दोन्ही भूमिका साकारणं खूप मोठं आव्हान होतं, असं त्यांनी स्पष्ट केलं.

या भूमिकेसाठी डॉ. अमोल कोल्हेंना शारीरिक, बौद्धिक व मानसिक या तिन्ही स्तरांवर विशेष मेहनत घ्यावी लागली. याविषयी बोलताना शारीरिक स्तरावर मी भारदस्त छाती, धिप्पाड शरीर यासाठी बराच काळ मेहनत घेतली आणि अजूनही घेतोय. बौद्धिक स्तरावर मेहनत घेताना मी ज्यांनी ज्यांनी संभाजी महाराजांवर पुस्तकं  लिहिली आहेत ती पुस्तकं तसेच ज्यांनी ज्यांनी संभाजी महाराजांवर प्रबंध लिहिले आहेत तेही वाचले. प्रत्येकाचं महाराजांवरचं लिखाण, त्यांचा महाराजांकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे वेगळा होता. तो दृष्टिकोन मी समजून घेतला. आपली मालिका ही इतिहासाच्या एकेकाळच्या सुवर्णकाळाचे प्रतिनिधित्व करणारी आहे. त्यामुळे इतिहासाला कुठेही गालबोट न लागता ही मालिका प्रेक्षकांसमोर सादर करणं आणि आजच्या तरुणाईला संभाजींची ओळख करून देणं याचं भान ठेवत ही मालिका केली असल्याचं त्यांनी सांगितलं.

‘झी मराठी’चे व्यवसाय प्रमुख नीलेश मयेकर मालिकेविषयी म्हणतात, ‘आजवर ‘झी मराठी’ने आपल्या प्रेक्षकांना कायम मनोरंजनापलीकडे काही तरी वेगळं दिलंय. कारण मनोरंजन हा जरी उद्देश असला तरी त्यासोबत सामाजिक जबाबदारीचंही भान आम्ही कायम बाळगतो. यापूर्वी ‘जय मल्हार’ या पौराणिक मालिकेतून महाराष्ट्राच्या आराध्याची खंडेरायांची गाथा अवघ्या महाराष्ट्राला आम्ही सांगितली. आता ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या या वीरपुत्राची गाथा प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे आणि ती सर्वानाच भारावून टाकणारी असेल.’

डॉ. अमोल कोल्हे यांनी पहिल्यांदाच मालिकेची निर्मिती केली आहे. याविषयी बोलताना ते म्हणतात, माझं आणि माझ्या टीमचं खूप वर्षांचं स्वप्न आज पूर्ण होतंय. आम्ही सर्वानीच या मालिकेसाठी खूप मेहनत घेतली आहे. ही मेहनत आज ‘झी मराठी’मुळे फळाला आली. त्यांच्यामुळे १४७ देशांमध्ये संभाजी महाराजांचा इतिहास पोहोचणार आहे. हीच माझ्यासाठी खूप मोठी भेट आहे. आपण नेहमीच ऐकतो की वाहिनीतील लोकांचं आणि निर्मात्याच्या टीमचं नातं हे सासू-सुनांचं असतं. पण आमचं नातं हे मायलेकीसारखं नितळ प्रेमाचं आहे. ते असंच राहो, अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली. या मालिकेत आपल्या जिजाऊंच्या भूमिकेत प्रतीक्षा लोणकर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत शंतनू मोघे तर औरंगजेबाच्या भूमिकेत अमित बहल हे कलावंत दिसणार आहेत. प्रताप गंगावणेंच्या लेखणीतून शब्दबद्ध होणारी ही मालिका कार्तिक केंढेनी दिग्दर्शित केली आहे. २५ सप्टेंबरपासून ही मालिका सोमवार ते शनिवार दररोज रात्री ९ वाजता ‘झी मराठी’सह ‘झी मराठी एचडी’वर पाहायला मिळणार आहे.

हिंदुस्थानातील इतिहासातला एकमेव ‘अँग्री यंग मॅन’ म्हणजे राजे संभाजी. संभाजी महाराज जर आणखी काही काळ असते, तर संपूर्ण हिंदुस्थानचा इतिहास त्यांनी बदलला असता. त्यांचाच इतिहास मी तरुणांना सांगण्यासाठी ही मालिका करतोय.   – डॉ अमोल कोल्हे