‘तूच माझी सुमी’, ‘महासागर’ बघायला आलेले नाटकाचे लेखक जयवंत दळवी मला भेटायला आत आले तेव्हा त्यांनी उच्चारलेले हे शब्द आणि माझ्या अभिनयाची केलेली तारीफ ऐकून इतका आनंद झाला होता की, मी सांगूच शकत नाही. कारण गुजराती रंगभूमीवरचं ते माझं मुख्य भूमिका असलेलं पहिलं नाटक होतं. या नाटकानं जणू जादू केली आणि मी मुख्य भूमिका करायला लागले.’’ स्वरूप संपत गप्पा मारताना सांगत असतात तेव्हा त्यांच्या डोळ्यासमोर भूतकाळ लख्ख जागा झालेला दिसतो. 

गप्पांचं निमित्त असतं, त्यांच्या आगामी हिंदी नाटकाचं. गजेंद्र अहिरे लिखित-दिग्दर्शित ‘जाने पहचाने अनजाने’ या नाटकाचा आज (१२ एप्रिल) ‘वर्ल्ड प्रीमिअर’ ‘एनसीपीए’मधील ‘टाटा थिएटर’ येथे होतो आहे. स्वरूप संपत आज २५ वर्षांनी पुन्हा एकदा रंगमंचावर येत आहेत, यातली आणखी एक योगायोगाची गोष्ट म्हणजे १८ व्या वर्षी त्यांनी पहिल्यांदा रंगमंचावर पदार्पण केलं होतं आणि आता ६८ व्या वर्षी, त्या पुन्हा एकदा चेहर्‍याला ‘रंग’ लावून सज्ज झाल्या आहेत.

त्या सांगतात, ‘‘रंगभूमी हे माझं पहिलं प्रेम आहे. वडील बच्चु संपत हा गुजराती रंगभूमीवरचा बापमाणूस. त्यांच्या तालमीत तयार झालेल्या मला रंगमंचावर आणि मागेही अनेक गोष्टी करायला लागायच्या. पुन्हा एकदा मी तो सारा माहोल अनुभवते आहे. यानिमित्ताने दौरे करायला मिळणार, लोकांना भेटता येणार याचाच आनंद जास्त आहे. मला ही प्रक्रियाच जास्त आवडते. म्हणजे जसं हे नाटक माझ्यापर्यंत आलं, आवडलं… मग तुमचा प्रत्यक्ष सहभाग सुरू होतो… तालमी सुरू होतात, सुरुवातीला बसूनच, मग मात्र उभं राहून… नंतर दिग्दर्शक त्यात नाट्य भरतो, तुमचा रंगमंचावरचा चालता-बोलता वावर सुरू होतो… मग संगीतकार सूर-तालाची जोड देतो आणि काल संगीताशिवाय केलेली तालीम आज अचानक वेगळ्याच उंचीवर पोहोचते… नंतर ‘लाइट्स’ने रंगभूमी उजळते. त्या प्रकाशात तुमच्यातला कलाकार अधिकच सावध होतो.

प्रेक्षकांना सामोरं जायची वेळ नजीक आल्याचं जाणवतं. हुरहुर वाढू लागते. नंतर वेशभूषाकार येतो – कोणत्या प्रवेशात कोणती साडी नेसणार, माझ्या हातातली पिशवी अशी हवी, पर्स अशी हवी… मग शेवटी येतो रंगभूषाकार… चेहर्‍यावर रंग लावून तुम्ही नाटकासाठी पूर्णत: सज्ज होता… पुन्हा एकदा हा अनुभव किती ‘एक्सायटिंग’ना.’’ स्वरूप यांच्या आवाजातला उत्साह लपत नाही. त्या उत्साहातच हे नाटक स्वीकारण्यामागचं कारणही सांगितलं.   

‘गजेंद्र अहिरे यांनाच माझं नाव सुचलं, मी त्यातल्या विधवेच्या भूमिकेत चपखल बसते, असं त्यांनी अनुपम खेरना सांगितलं. खेर यांनी मला विचारलं तेव्हा साशंकच होते. त्यांनी गजेंद्र यांचंच सध्या सुरू असलेलं ‘शेवग्याच्या शेंगा’ हे मराठी नाटक बघायला बोलावलं. नाटक मला खूपच आवडलं. आत्मविश्वास वाटत नव्हता, पण अनुपम खेर यांचा आग्रह आणि मुलांचं प्रोत्साहन यामुळे स्वीकारलं. शिवाय आजच्या काळाची ही गोष्ट आहे, दुसरं म्हणजे हे प्रसन्न, विनोदी नाटक आहे. माझ्या शैक्षणिक कामातील तणाव, काही कटकटी यावरचा उतारा. खरं सांगते, सुरुवातीला मी चाचरतच होते. नोव्हेंबरपासून तालमी सुरू झाल्या… आता एप्रिलपर्यंत मी पूर्णत: बदललेय. शिकण्याची प्रक्रिया पुन्हा अनुभवतेय. ‘हे असं नको’ किंवा ‘हे वेगळ्या पद्धतीनं केलं तर चालेल का?’ असं कोणी तरी सांगतंय, तुमच्या चुका काढतंय, हे किती मस्त आहे ना! रोजच्या रोज तालमीला पळायचं आणि रात्री थकून घरी यायचं, मी खूप ‘एन्जॉय’ करतेय.

मुलं अनिरुद्ध, आदित्य, नवरा परेश (रावल) सारेच नाटकवाले असल्यानं त्यांना मी घरी आल्यावर तालमीतल्या गोष्टी सांगते तेव्हा त्यांना ते नेमकेपणानं समजतं. माझ्यातला बदलही त्यांना जाणवतोय. ४०-५० वर्षांपूर्वीची स्वरूप मला पुन्हा सापडलीय… मुख्य म्हणजे आमची ‘टीम’ खूप छान आहे. लेखक आणि दिग्दर्शक म्हणून गजेंद्र जमिनीवर राहणारा माणूस आहे. खूपच सांभाळून घेतलं त्यांनी मला. माझे सहकलाकार अनुपम खेर, ‘ही वॉज बिग सरप्राइज फॉर मी’. मुळात इतकी अभिनयनिपुण, ज्येष्ठ-श्रेष्ठ व्यक्ती, पण इतके विनम्र आहेत की, सहकलाकारांवर रागावले तरी दहा वेळा माफी मागतील. त्यांच्याबरोबर नाटक करायला मिळणं ही खूप मोठी संधी आहे.’’  

बोलण्याच्या ओघातच स्वरूप यांना त्यांच्या भूतकाळात नेलं तेव्हा त्या अधिकच उत्साहात आल्या. म्हणाल्या, ‘‘मी १८ वर्षांची असेन तेव्हा, पहिली भूमिका खूपच छोटी होती. पण नाटकं सुरू होतीच. मी आणि परेशने एकत्र केलेलं पहिलं नाटक ‘एक्वस’. मग परेशशी लग्न झालं. ‘महारथी’ हे आमचं नाटक परेशनं २१ दिवसांत बसवलं होतं. आम्ही १७०० प्रयोग केले. खूप धमाल यायची. नाटक संपलं की घरी जायची कुणालाच घाई नसायची. सगळे एकत्र येऊन नाटकांच्या अनुभवावर गप्पा मारायचो. रात्री ३-४ वाजता आमच्या घरी आलो की माझ्या हातची मसाला खिचडी खायची की पुन्हा गप्पा, असा सारा सिलसिला. ‘द लेसन’, ‘मिन पियासी’, शफी इनामदारबरोबर ‘कस्तुरीमृग’, टिकू तहसालनियांबरोबर ‘नट्स’चं गुजराती रूपांतर, शैलेश दवेबरोबर ‘प्रतिशोध’, ‘चिरंजीव’, ‘शादी ॲट बर्बादी डॉट कॉम’ किती तरी नाटकं. ‘शादी…’ ची एक गंमत, हे हिंदी नाटक होतं.

आम्ही अमेरिकेला गेलो तर तिथल्या संस्थेने सांगितलं, ‘आम्हाला हिंदी येत नाही. तुम्ही गुजरातीमध्येच नाटक करा.’ जरी आम्ही सगळे गुजराती असलो तरी शेवटच्या मिनिटाला सगळं गुजरातीत करायचं? दिग्दर्शक परेश म्हणाला, ‘करू या आपण.’ मग काय, केलं, विनोदी नाटक असल्याने लोक पोट धरून हसत होते. तसाच अनुभव आम्हाला ‘महारथी’ला यायचा. नाटक अडीच तासांचं, पण आम्हाला साडेतीन तास लागायचे इतका ‘लाफ्टर’ यायचा. म्हणूनच मला रंगभूमी आवडते. ‘ये जो है जिंदगी’ मालिका असेल किंवा ‘नरम गरम’, ‘साथिया’, ‘उरी’सारखे चित्रपट केले असले तरीही.  रंगमंचाचे तुम्ही राजे असता. तुम्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचला आहात याची साक्ष तुम्हाला लगेच पटते, त्यांना नाटक आवडत नसेल तरी त्यांचा अस्वस्थपणा लक्षात येतो, तुम्ही केलेला विनोद त्यांना कळला की लाफ्टर येतोच, गंभीर प्रसंगानंतर हॉलभर पसरलेली नि:शब्द शांतता… आणि शेवटी टाळ्यांचा कडकडाट… हे सारं अनुभवायला खरंच खूप खूप आवडतं.’

सादरकर्ते – अनुपम खेर स्टुडिओ

नाटक – जाने पहचाने अनजाने,

लेखक – दिग्दर्शक गजेंद्र अहिरे,

संगीत – अनु मलिक,

कलाकार – अनुपम खेर, स्वरूप संपत, मेघना मलिक, माया शर्मा, विकास रावत, श्रद्धा मंडाले.

arati.kadam@expressindia.com