शहरात आग लागण्याच्या, रस्ते अपघातांच्या, इमारत पडण्याच्या घटना घडत असतात. या दुर्घटनांच्या चौकशीत अनेकदा जबाबदार बड्या असामी बाजूला राहतात आणि कोणत्या तरी कामगार, नोकरदार वर्गाच्या खांद्यावर बंदूक ठेवली जाते. श्रीमंत वर्ग पैशांच्या जोरावर वकिलांना कामाला लावून आपली बाजू सुरक्षित करतो. गुन्हा करणारा तो गुन्हा सिद्ध झाला तरच दोषी ठरतो, अन्यथा समाजात मोकाट वावरतो… यंत्रणेच्या या मर्यादांवर ‘सिस्टम’ या ॲमेझॉन प्राइम व्हिडीओवरील सिनेमात बोट ठेवलं आहे.

सिनेमात नेहा राजवंश (अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा) प्रमुख भूमिकेत आहे. रवी राजवंश (आशुतोष गोवारीकर) नामांकित वकील आहे. आतापर्यंत एकही केस न हरलेला आणि युक्तिवादातून प्रतिस्पर्धी वकिलांना आत्मविश्वास गमावायला भाग पाडणारा अशी त्याची ख्याती आहे. नेहा ही त्याची मुलगी, स्वत:च्या बळावर वकिली करणारी. तिला तसं करण्यास तोच भाग पाडतो. त्याची मुलगी म्हणून तिला कोणतीही मुभा नसते. तिला वडिलांच्या फर्ममध्ये काम करायचं असतं, पण दहा खटले सलग जिंकून दाखव असं आव्हान तो तिला देतो. बाप-लेकीचा हा व्यावसायिक संघर्ष एकीकडे सुरू असताना दुसरीकडे ती सरकारी वकील म्हणून काम करत असते. त्या प्रवासात तिची ओळख न्यायालयातील लिपिक सारिका (ज्योतिका) हिच्याशी होते. आपल्या खटल्यांसाठी नेहा सारिकाची मदत घेते. दहाव्या खटल्याभोवती हा सिनेमा फिरतो.

सोनाक्षीने वकिलाची भूमिका चांगली निभावली आहे, पण सिनेमात ज्योतिका चांगलाच भाव खाऊन जाते. तिने साकारलेल्या सारिका या पात्राला अनेक कंगोरे आहेत. अनेक दृश्यांमध्ये ज्योतिकाने सोनाक्षीलाही मागे टाकले आहे. आशुतोष गोवारीकर यांचाही अभिनय उत्तम.

सिनेमात हत्येच्या ज्या खटल्यावर सिनेमाभर युक्तिवाद करण्यात आला आहे, ती हत्या झालेली सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर किंवा हत्येचा आरोप असणारा बिल्डर हे पडद्यावर नावापुरते आलेत. खटल्याचा तपास करणारा पोलीस, खटल्याच्या अनुषंगाने येणारी कोणतीही पात्रे न दिसता पडद्यावर केवळ सोनाक्षी सिन्हा आणि ज्योतिका यांचाच वावर दिसतो. तो कधी कधी अति होतो.

एकुणात दिग्दर्शक अश्विनी अय्यर तिवारी यांच्या यापूर्वीच्या ‘बरेली की बर्फी’ आणि ‘निल बटे सन्नाटा’ या वाखाणल्या गेलेल्या सिनेमांची पार्श्वभूमी पाहता त्याच तोडीचा हा सिनेमा आहे. समाजात न्याय पूर्ण चूक किंवा पूर्ण बरोबर असू शकत नाही. सत्ता, अधिकार, परिस्थितीवर निकाल ठरत असतो. न्याय देणार्‍या समाजाच्या यंत्रणेत मूल्ये, नातीही तावून सुलाखून निघतात, हे या कोर्टरूम ड्रामामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तो एकदा पाहण्यास हरकत नाही.

सिस्टम

ओटीटी :  प्राइम व्हिडिओ

दिग्दर्शक : अश्विनी अय्यर तिवारी

कलाकार : सोनाक्षी सिन्हा, ज्योतिका, आशुतोष गोवारीकर