छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ कायम चर्चेत असते. या मालिकेत नट्टू काकांची भूमिका साकारणारे घनश्याम नायक यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. आता मालिकेत नट्टू काकांची भूमिका कोण साकारणार? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. मालिकेचे निर्माते असित मोदी यांनी यावर प्रतिक्रिया देत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर नट्टू काकांचा एक फोटो व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये एक व्यक्ती इलेक्ट्रॉनिकच्या दुकानात बसल्याचे दिसत होते. तो फोटोपाहून निर्मात्यांना नवे नट्टू काका सापडले अशा चर्चा रंगल्या होत्या. पण या सर्व अफवा असल्याचे आता समोर आले आहे.

प्रोडक्शन हाऊसशी जोडलेल्या एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, गढा इलेक्ट्रॉनिक्समध्ये बसलेली ती व्यक्ती कोणताही अभिनेता नाहीये. ते दुकान मालकांचे वडील आहेत. प्रोडक्शन हाऊसला नट्टू काकांच्या जागी अजून कोणताही अभिनेता मिळालेला नाही. पण लोकांनी अशा अफवा पसरवताना विचार करायला हवा.

दरम्यान, मालिकेचे निर्माते असित मोदी यांनी देखील मीडियाशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, ‘आताच घनश्याम यांच्या निधनाला एक महिना झाला आहे. नट्टू काका म्हणजेत घनश्याम माझे खूप चांगले मित्र होते. गेली कित्येक वर्षे मी त्यांच्यासोबत काम करत आहे. मालिकेतील त्यांचे पात्र खूप महत्त्वाचे आहे. सध्या नट्टू काकांच्या भूमिकेसाठी दुसऱ्या कोणत्या कलाकाराला घेण्याचा आमचा विचार नाही. सध्या या संबंधी अनेक अफवा सुरु आहेत. पण प्रेक्षकांना विनंती करतो की अशा अफवांवर विश्वास ठेवू नका.’