‘सर्जनशील क्षेत्रात असणाऱ्यांचं पहिलं काम हेच आहे की ऐकायचं. ऐकल्यावर कशाची दखल घ्यायची आणि काय सोडून द्यायचं याची जाण असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. अशा गोष्टींकडे लक्ष देऊन महत्त्व देऊ लागलो तर आपण पुढे वाटचाल करू शकणार नाही. अशा गोष्टी मी ऐकत नाही, वाचत नाही. लक्षच देत नाही’, असं अभिनेत्री तमन्ना भाटिया हिने सांगितलं. तमन्नावर चित्रित झालेल्या ‘आज की रात’ गाण्यावर ज्येष्ठ कलाकार अन्नू कपूर यांनी प्रतिक्रिया दिली होती. कपूर यांना त्या वक्तव्यावरून ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं होतं. त्या वक्तव्यासंदर्भात पहिल्यांदाच तमन्नाने स्वत:चं म्हणणं मांडलं.

‘मी माझ्या कामावर लक्ष केंद्रित करते. ज्या कलाकृतीचा मी भाग आहे त्यासाठी १०० टक्के देण्यावर माझा भर असतो. माझा अभिनय अधिक चांगला कसा होईल याकडे पाहते. माझं काम लोकांना आवडतंय म्हणूनच त्यांचं प्रेम, पाठिंबा मिळत राहतो. लोकांचा विश्वास असं ठरवून मिळत नाही’, असं तमन्ना म्हणाली.

गेल्या वर्षी शुभंकर मिश्रा यांच्याशी बोलताना अन्नू कपूर यांनी ‘स्त्री २’ चित्रपटातलं सुपरहिट गाणं ‘आज की रात’ बाबत बोलले होते. हे गाणं तुम्हाला आवडलं का? असं शुभांकर यांनी अन्नू यांना विचारलं होतं. तमन्ना यांचं काम आवडतं असं कपूर म्हणाले होते. तमन्ना यांच्या शरीराचा उल्लेख कपूर यांनी ‘दूधिया बदन’ असा केला होता. माझं गाणं ऐकून लहान मुलं शांत झोपतात असं तमन्ना म्हणाल्या होत्या असं शुभंकर यांनी सांगितलं. त्यावर कपूर म्हणाले, ‘एखाद्या गाण्यातून, शरीराद्वारे, चेहऱ्याने लहान मुलांना शांत झोप येत असेल तर ती चांगलीच गोष्ट आहे. देशातली सगळी मुलं शांतपणे झोपली तर उत्तमच आहे. तमन्ना यांच्या अन्य काही इच्छा असतील तर देव त्या पूर्ण करो’, असं कपूर पुढे म्हणाले.

कपूर यांच्या वक्तव्यावरून वादाला तोंड फुटलं. त्यानंतर सिद्धार्थ कनन यांना दिलेल्या मुलाखतीत कपूर म्हणाले, ‘लोकांनी मला शिव्या दिल्या. चावट म्हातारा म्हणाले. दूधिया बदन म्हणालो म्हणून एवढा वाद झाला. इंग्रजीत मिल्की बॉडी म्हटलं असतं तर कोणालाही काहीही अडचण नव्हती. तमन्ना यांनी स्वत: यासंदर्भात विचारलं तरी माझं उत्तर हेच असेल’.

‘जर माझ्या बोलण्याने तमन्ना दुखावल्या गेल्या असतील तर तर मी पाया पडून त्यांची माफी मागायला तयार आहे. ७१ वर्षांचा माणूस पाया पडून माफी मागतोय तर त्या काय म्हणतील? माझं बोलणं स्पष्ट होतं आणि त्यातला सच्चेपणा मला ठाऊक आहे’, असं कपूर म्हणाले होते.