दिग्दर्शक संजय जाधव यांचा चित्रपट 'तमाशा लाईव्ह' मागाच्या काही काळापासून सोशल मीडियावर बराच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटातील 'नांदी' हे गाणं प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत बरीच उत्सुकता पाहायला मिळत होती. त्यानंतर आता नुकताच या चित्रपटाच टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या थरारक टीझरची सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा पाहायला मिळत आहे. संजय जाधव दिग्दर्शित 'तमाशा लाईव्ह' या चित्रपटाचा टीझर अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. टीझरची सुरुवात होते ती एका मुलीच्या आर्त किंकाळीने आणि त्यापाठोपाठ एक मुलगी उंच इमारतीवरून खाली पडताना दिसते. त्यानंतर सिद्धार्थ जाधव स्क्रीनवर दिसतो. त्यानंतर "कुणी पडला ना की बातमी रंगतेच मग ते तोंडावर पडू दे, जमिनीवर पडू दे नाहीतर लोकांच्या नजरेत." हे त्याचं वाक्य अक्षरशः अंगावर काटा आणतं. आणखी वाचा- “तू फक्त स्वतःवर विश्वास ठेव…” मंजिरी ओकच्या वाढदिवशी अमृता खानविलकरची खास पोस्ट संपूर्ण टीझरमध्ये सोनाली कुलकर्णी आणि सचित पाटीलही एकच वाक्य बोलताना दिसत आहेत, 'आता कोणत्या दगडाला शेंदूर फासणार?' पण हे दोघं कशाबद्दल बोलत आहेत? हे नेमकं काय प्रकरण आहे? याची उत्तरं प्रेक्षकांना २४ जूनला मिळणार आहे. याशिवाय ‘तमाशा लाईव्ह'मध्ये सचित आणि सोनालीचा रॉकिंग डान्सही पाहायला मिळत आहे. यात पाश्चिमात्य नृत्यासोबतच महाराष्ट्राची लोककलाही झळकत असून नृत्याला दिलेले हे आधुनिक रूप ही या चित्रपटाची खासियत आहे. 'तमाशा लाईव्ह'बद्दल दिग्दर्शक संजय जाधव म्हणतात, '' 'तमाशा लाईव्ह'च्या माध्यमातून आम्ही प्रेक्षकांना काहीतरी नाविन्यपूर्ण देण्याचा प्रयत्न केला आहे. चित्रपटात अतिशय कसलेले कलाकार, तगडी संगीत टीम आहे. हा एक संगीतमय चित्रपट असला तरी त्याला आधुनिकतेची जोड लाभली आहे." या चित्रपटाचा टीझर सध्या सोशल मीडियावर बराच चर्चेत आहे. प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबतची उत्सुकता ताणली गेल्याचं पाहायला मिळत आहे. आणखी वाचा- Fact Check: मिथुन चक्रवर्ती रुग्णालयात दाखल? जाणून घ्या व्हायरल फोटोमागचं सत्य प्लॅनेट मराठी आणि माऊली प्रॉडक्शन प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती अक्षय बर्दापूरकर यांनी केली आहे. सौम्या विळेकर, डॉ. मनीषा किशोर तोलमारे, समीर विष्णू केळकर, अजय वासुदेव उपर्वात सहनिर्मिती 'तमाशा लाईव्ह'ची कथा मनीष कदम यांनी लिहिली आहे. तर संवाद अरविंद जगताप यांचे आहेत. अमितराज, पंकज पडघन यांचे संगीत असलेल्या या चित्रपटातील गाण्यांचे बोल क्षितिज पटवर्धन यांचे आहेत. या चित्रपटात सोनाली कुलकर्णी, सचित पाटील, सिद्धार्थ जाधव, हेमांगी कवी, पुष्कर जोग, नागेश भोसले, मृणाल देशपांडे, मनमीत पेम, आयुषी भावे, भरत जाधव यांच्या भूमिका आहेत. येत्या २४ जूनला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.