गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला चित्रपट म्हणजे ‘तमाशा लाईव्ह’. या चित्रपटाचे नावच इतके निराळे आहे की, या चित्रपटाविषयी मनात आपसूकच उत्सुकता निर्माण होते. त्यातच आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून यात काहीतरी जबरदस्त आणि मनोरंजनात्मक दिसत आहे. ‘तमाशा लाईव्ह’मध्ये सोनाली कुलकर्णी, सचित पाटील, सिद्धार्थ जाधव, हेमांगी कवी, पुष्कर जोग, नागेश भोसले, मृणाल देशपांडे, मनमीत पेम, आयुषी भावे, यांच्या प्रमुख भूमिका असून हा चित्रपट येत्या १५ जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यापूर्वीच चित्रपटाच्या संगीताची रसिकांवर भुरळ पडली आहे. आता ट्रेलरही प्रेक्षकांना आवडत असून हा काहीतरी भन्नाट विषय असल्याचे दिसतेय. यात सचित पाटील आणि सोनाली कुलकर्णी वृत्तनिवेदकाच्या भूमिकेत आहेत. व्यावसायिक कारकिर्दीत आपण किती वरचढ आहोत, हे दाखवण्यात त्यांची चढाओढ सुरु असून त्यात ‘ब्रेकिंग न्यूज’साठीची त्यांची धडपड, एकमेकांबद्दल असलेली ईर्षा यात अधोरेखित होत आहे. आता यातून आणखी काही ‘ब्रेकिंग न्यूज’ आपल्या समोर येणार का, हे ‘तमाशा लाईव्ह’ पाहिल्यावरच कळेल. यात सिद्धार्थ आणि हेमांगीही महत्वपूर्ण भूमिकेत दिसत आहेत. ट्रेलरमध्ये दिसणारी गाणी कथा पुढे नेणारी आहेत. त्यामुळे या चित्रपटात काहीतरी वेगळे पाहायला मिळणार असल्याचे दिसतेय.

आणखी वाचा- सोनाली कुलकर्णी झाली गायिका! ‘तमाशा लाईव्ह’चं नवं गाणं ‘कडक लक्ष्मी’ प्रेक्षकांच्या भेटीला

दिग्दर्शक संजय जाधव म्हणतात, ” यात मी थोडा वेगळा विषय हाताळण्याचा प्रयत्न केलाय. संगीताच्या माध्यमातून हा चित्रपट पुढे जाणारा असून यातील प्रत्येक गाण्यामध्ये एक कथा आहे, जी चित्रपटाला पुढे नेते. याचे श्रेय मी संगीत टीमला देईन. कारण यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे. प्रत्येक सीनला साजेसे गाणे, संगीत त्यांनी दिले आहे. लोककलेला आधुनिकतेचे स्वरूप देण्यात आलेल्या ‘तमाशा लाईव्ह’ची कथा एका अशा वेगळया वळणावर जाणार आहे, ज्याचा शेवट अतिशय रंजक असणार आहे. प्रत्येक कलाकाराने आपली व्यक्तिरेखा उत्कृष्ट सादर केली आहे. आमचा हा प्रयोग प्रेक्षकांना आवडेल, अशी आशा आहे.”

एटीएट पिक्चर्स प्रस्तुत, अक्षय बर्दापूरकर निर्मित या चित्रपटाचे सहनिर्माते सौम्या विळेकर (प्लॅनेट मराठी, अ व्हिस्टास मीडिया कॅपिटल कंपनी), माऊली प्रॉडक्शन्स, डॉ. मनीषा किशोर तोलमारे, समीर विष्णू केळकर व अजय वासुदेव उपर्वात असून चित्रपटाची कथा मनिष कदम यांची आहे. तर संवाद अरविंद जगताप यांचे आहेत. चित्रपटाचे संगीत अमितराज व पंकज पडघन यांचे असून गाण्यांचे बोल क्षितीज पटवर्धन यांचे आहेत. उमेश जाधव यांचे ‘तमाशा लाईव्ह’ला नृत्य दिग्दर्शन लाभले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tamasha live official trailer release today sanjay jadhav sonalee kulkarni sachit patil sidharth jadhav mrj
First published on: 04-07-2022 at 13:01 IST