Tamil Actor Ravi Mohan Divorce : मीळ अभिनेता रवी मोहन हा त्याच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. रवी मोहन आणि पत्नी आरती यांचे नाते घटस्फोटाच्या मार्गावर असून, त्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. मात्र, घटस्फोटादरम्यान, अभिनेता रवीचे नाव गायिका केनिशा फ्रान्सिससोबत जोडले गेले आहे. त्यांच्या अफेअरच्या चर्चा सुरू असताना रवी मोहनने सिनेविश्वातून ब्रेक घेणार असल्याचे घोषित केले आहे. त्याने पत्रकार परिषद घेत पूर्वपत्नी आरतीवर गंभीर आरोप केले. सायबर गुन्ह्यांसह काळी जादू केल्याचे गंभीर आरोप रवी मोहनने आरतीवर केले आहेत.

मी आता गप्प राहणार नाही – रवी

रवी मोहनने पत्रकार परिषदेत पत्नी आरतीमुळे विनाकारण अपमान सहन करावा लागत असल्याचे म्हटले आहे. “गेली अनेक वर्षं गुलामासारखी वागणूक दिली; पण आता पुरे झाले. मी अनेक वर्षं गप्प राहिलो. आता ती वेळ आली आहे, जेव्हा लोकांना वाटतं की, रवी मोहन एक हळव्या मनाचा माणूस आहे; पण लोक माझ्या सहनशक्तीची परीक्षा घेत आहेत. मी पूर्वी तसा होतो; पण आता नाही. आता मी गप्प राहणार नाही,” असा इशारा रवीने दिला आहे.

रवी मोहन झाला भावूक

वैयक्तिक आयुष्यामुळे त्रस्त झालेला अभिनेता रवी मोहन हा पत्रकार परिषदेमध्ये अत्यंत अस्वस्थ असल्याचे दिसून आले. बायकोबाबत राग व्यक्त करतानाच दु:खामुळे रवी मोहनला अश्रूही अनावर झाले. भावूक झालेल्या रवी मोहन याने जोपर्यंत माझा घटस्फोट होत नाही, तोपर्यंत मी अभिनय करणार नाही. जेव्हा माझा घटस्फोट होईल, माझं आयुष्य पुन्हा सामान्य होईल आणि सायबरबुलिंग थांबेल, तेव्हा मी परत येईन, असे म्हणत सिनेविश्वातून ब्रेक घेत असल्याचे जाहीर केले.

मुलांना भेटण्याचीही परवानगी नाही

रवी मोहन म्हणाला की, मी २३ वर्षांपासून अभिनय क्षेत्रामध्ये काम करतो आहे. दिवस-रात्र मेहनत करून मी माझ्या कुटुंबासाठी काम केलं; पण आज माझ्या मुलांना मला भेटू दिलं जात नाही. मी माझ्या मुलांना कसं सोडू शकतो? मला त्यांना भेटण्याची परवानगी नाही. त्यांना शाळेतून आणायला गेलो तरी बॉडीगार्ड पाठवतात. मी त्या आयुष्यातून निघून आलो, अशा भावना रवीने व्यक्त केल्या आहेत.

केनिशाचा सायबर छळ

तसेच आरतीने हाताची नस कापून घेत मला लग्नासाठी ब्लॅकमेल केलं. त्याला कुटुंबाच्या नावाखाली आलेल्या चित्रपटांमध्ये काम करण्यास भाग पाडले. एक झाला की, दुसरा चित्रपट ते माझ्याकडून करून घेत राहिले. त्यांनी केनिशाचा सायबर छळही केला आणि तिला दूर लोटले. मी त्यांच्यापैकी कोणालाही शांतपणे जाऊ देणार नाही, असा इशारा अभिनेता रवी मोहन यांनी दिला आहे.

रवी मोहनवर काळी जादू?

रवी मोहनने त्याची एक्स पत्नी आणि तिच्या कुटुंबावर काळी जादूटोणा केल्याचा आरोपही केला. तो म्हणाला, “मला रक्ताच्या उलट्या होत आहेत. ते माझ्यावर काळी जादू करीत आहेत. हे असे त्यांनी याआधीही केले आहे, असा गंभीर आरोप अभिनेता रवी मोहनने केला आहे. तसेच बँकेमध्ये त्याचे पत्नीसह जॉईंट अकाउंट असल्याने त्याला पैशांचा पूर्ण हिशोब मागितला जातो. अभिनेत्याच्या पैशांवर नियंत्रण ठेवले असून, थोडे जास्त पैसे खर्च केले की लगेच फोन येतो, असा आरोप अभिनेता रवी मोहनने केला आहे. त्यामुळे रवी मोहन, त्याची पत्नी आरती रवी आणि गायिका केनिशा फ्रान्सिस चर्चेत आले आहेत.