तमिळ चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक आणि पटकथालेखक के. भाग्यराज यांच्या निधनाने संपूर्ण मनोरंजनविश्वावर शोककळा पसरली आहे. शनिवारी हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचं निधन झालं. ते ७३ वर्षांचे होते. निधनाच्या अवघ्या दोन दिवसांपूर्वी त्यांनी अभिनेत्री-राजकारणी खुशबू सुंदर यांची लेक अवंतिका हिच्या गोव्यात झालेल्या विवाहसोहळ्याला हजेरी लावली होती.
या दुःखद घटनेनंतर अभिनेत्री त्रिशा कृष्णनने भावुक पोस्ट शेअर करत सांगितलं की, भाग्यराज यांच्या निधनाच्या अवघ्या एक दिवस आधी तिने त्यांच्याबरोबर जेवण केलं होतं. त्यामुळे त्यांच्या निधनाच्या बातमीवर तिचा विश्वास बसत नसल्याचं तिने म्हटलं.
त्रिशा कृष्णनची भावुक पोस्ट
त्रिशाने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत म्हटलं की, “प्रिय भाग्यराज सर, तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली. कालच आपण एकत्र बसून जेवण केलं होतं आणि आज तुमच्या निधनाची ही मन हेलावून टाकणारी बातमी ऐकावी लागतेय, यावर विश्वास बसत नाही. पूर्णिमा मॅडम, शांतनू, अमलू आणि किकी यांना या कठीण काळातून सावरण्याचं बळ मिळो.”

गोव्यात झालेल्या विवाहसोहळ्यातील के. भाग्यराज यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल होत आहे. अनेक चाहत्यांच्या मते, सार्वजनिक कार्यक्रमातील त्यांचा हा अखेरच्या उपस्थितींपैकी एक व्हिडिओ होता. या व्हिडिओमध्ये के. भाग्यराज हसत अभिनेते चिरंजीवी यांच्याशी संवाद साधताना दिसत आहेत. या विवाहसोहळ्याला त्रिशा कृष्णनही उपस्थित होती.
माध्यमांतील वृत्तांनुसार, सकाळी फिरून घरी परतल्यानंतर के. भाग्यराज यांना अचानक छातीत तीव्र वेदना सुरू झाल्या. त्यानंतर त्यांना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. के. भाग्यराज यांच्या पश्चात पत्नी पूर्णिमा भाग्यराज, मुलगा शांतनू भाग्यराज आणि मुलगी सारण्या भाग्यराज असा परिवार आहे.
के. भाग्यराज यांच्या निधनामुळे निर्माण झालेलं दुःख तमिळ चित्रपटसृष्टीतील कलाकारांसाठी अधिक आहे. कारण त्यांच्या निधनाच्या अवघ्या १७ दिवसांपूर्वीच त्यांचे गुरू आणि ज्येष्ठ दिग्दर्शक के. भारतीराजा यांचंही निधन झालं होतं. तमिळ चित्रपटसृष्टीला नवी दिशा देण्यात आणि अनेक कलाकार घडवण्यात या दिग्गज दिग्दर्शकांचं मोलाचं योगदान मानलं जातं.
