Thalapathy Vijay Sangeeta Sornalingam Divorce News: तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीचे सुपरस्टार विजय यांच्याबद्दल मोठी बातमी समोर आली आहे. विजय यांची पत्नी संगीता सोर्नालिंगम यांनी तमिळनाडूतील चेंगलपट्टू जिल्हा न्यायालयात दाखल केलेली घटस्फोटाची याचिका मागे घेतली आहे. संगीता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या सुनावणीत सहभागी झाल्या होत्या आणि त्यांनी याचिका मागे घेण्याची कारणं न्यायालयासमोर मांडली. त्यामुळे न्यायालयाने हे प्रकरण निकाली काढले आहे.

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, यावर्षी फेब्रुवारी महिन्यात संगीता यांनी तमिळनाडूतील चेंगलपट्टू येथील न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. त्यात त्यांनी हे लग्न कायदेशीररित्या संपवण्याची मागणी केली होती. त्यानंतर या प्रकरणाची सुनावणी अनेकदा पुढे ढकलण्यात आली होती. १५ जून रोजी संगीता यांनी याचिका मागे घेण्याची इच्छा व्यक्त केली होती, तेव्हाही कामकाज तहकूब करण्यात आले होते. त्या सुनावणीदरम्यानही त्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित राहिल्या होत्या आणि त्यांनी न्यायालयाला आपल्या निर्णयाची माहिती दिली होती. त्यानंतर हे प्रकरण पुढील सुनावणीसाठी ७ ऑगस्ट रोजी ठेवण्यात आले होते.

संगीता सोर्नालिंगम यांनी घटस्फोटाची याचिका घेतली मागे

गेल्या महिन्यात विजय किंवा संगीता या दोघांपैकी कोणीही न्यायालयात उपस्थित न राहिल्याने कौटुंबिक न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलली होती. यापूर्वीच्या सुनावणीला देखील दोघेही हजर नव्हते, त्यावेळी त्यांच्या वकिलांनी न्यायालयात हजर राहून त्यांना स्वतः न्यायालयात उपस्थित राहण्यात अडचणी येत असल्याचं सांगितलं होतं. आज, शुक्रवारी संगीता यांनी त्यांची याचिका मागे घेतल्यानंतर हे प्रकरण बंद करण्यात आले.

Thalapathy Vijay Wife Sangeeta Withdraws Divorce Case
विजय व संगीता यांचा लग्नातील फोटो

घटस्फोटाच्या याचिकेत संगीता यांनी काय म्हटलं होतं?

दरम्यान, संगीता यांनी फेब्रुवारी महिन्यात दाखल केलेल्या याचिकेत विजय यांच्यावर आरोप केले होते. त्यांचे एका अभिनेत्रीबरोबर विवाहबाह्य संबंध आहेत.या अफेअरबद्दल आपल्याला २०२१ मध्ये समजलं. त्यानंतर विजय यांनी हे अफेअर संपवण्याचं आश्वासन दिलं होतं, पण तसं केलं नाही आणि अफेअर सुरूच ठेवलं. विजय त्या अभिनेत्रीबरोबर विदेशात फिरायचे आणि सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावायचे. ती अभिनेत्री विजय यांच्याबरोबरचे परदेशातील फोटो वारंवार सोशल मीडियावर शेअर करत असे, पण विजय यांनी तिला तसं करण्यापासून रोखलं नाही आणि तिच्याबरोबरचं अफेअरही नाकारलं नाही. या पोस्ट्समुळे आपला आणि दोन्ही मुलं जेसन संजय आणि दिव्या साशा यांचा वारंवार अपमान झाला, असं संगीता यांनी याचिकेत म्हटलं होतं.

संगीता यांनी म्हटलं होतं की विजय यांचं असं वागणं आणि २०२४ मध्ये सोशल मीडियावर झालेल्या वादांमुळे आपल्याला प्रचंड मानसिक त्रास झाला. त्यामुळे लग्न आता फक्त कागदोपत्रीच उरलं आहे. या नात्यातून फक्त मानसिक त्रास, अपमान आणि वेदनाच मिळाल्या. संगीता यांनी आपल्या याचिकेत त्यांनी दोघांमधील न मिटणारे मतभेद हे घटस्फोटाचे कारण असल्याचं म्हटलं होतं. तसेच त्यांनी कायमस्वरूपी पोटगी मागितली होती आणि चेन्नईतील नीलांकरई येथील त्यांच्या वैवाहिक घरीच राहण्याची परवानगी देण्याची विनंती केली होती. पण आता मात्र संगीता यांनी त्यांची याचिका मागे घेतली आहे.

दरम्यान, विजय व संगीता यांनी २५ ऑगस्ट १९९९ रोजी चेन्नईमध्ये पारंपरिक हिंदू पद्धतीने लग्न केलं होतं. त्यांना  २००० मध्ये मुलगा आणि २००५ मध्ये मुलगी झाली.