गेल्या आठवड्याभरापासून तनुश्री विरुद्ध नाना असा वाद चांगलाच रंगला आहे. हा वाद वेगळं वळण घेताना दिसत आहे. एकीकडे तनुश्रीवर हा प्रसिद्धीसाठी केलेला स्टंट असल्याचा आरोप अनेकांनी केलाय तर दुसरीकडे बॉलिवूडमधले अनेक कलाकार तनुश्रीच्या हिंमतीची दाद देत आहे. या प्रकरणावर काही कलाकारांनी ठोस अशी भूमिका घेतली असली तरी अमिताभ बच्चन यांनी मात्र कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त न करणं हिताचं मानलं आहे. या वादावर त्यांना विचारले असता मी तनुश्री दत्ता किंवा नाना पाटेकर नाही असं म्हणत बिग बींनी बोलणं टाळलं.
बिग बींच्या या भूमिकेवर तनुश्री दत्तानं जळजळीत टीका केली आहे. ‘मी खूप दुखावले आहे. आपल्या चित्रपटातून सामाजिक संदेश प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला जाईल अशा प्रकारचे चित्रपट करण्याचा आग्रह त्यांच्या असतो. मात्र तुमच्या समोर एखाद्या व्यक्तीसोबत वाईट गोष्ट घडत आहे तेव्हा त्या व्यक्तीच्या पाठी उभं राहण्याचं सोडून अशा प्रकारच्या प्रतिक्रिया देणं हे साफ चुकीचं आहे’ अशा शब्दात तिनं बिग बींवर एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीतून टीका केली आहे.
तर दुसरीकडे मात्र प्रियांका चोपडा, ट्विंकल खन्ना, रिचा चड्ढा, स्वरा भास्कर, फरहान अख्तर, परिणिती चोपडा, शिल्पा शेट्टी यांसारख्या कलाकारांनी तनुश्रीला पाठिंबा दिला आहे. २००८ साली ‘हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटादरम्यान नानांनी माझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असभ्य वर्तन केले, असा खळबळजनक आरोप तिनं एका मुलाखतीत केला होता.
