Tanvi Kakad-Bipin Mahore Engagement Video: विदर्भातील लोकप्रिय कंटेंट क्रिएटर जोडीने खऱ्या आयुष्यात साखरपुडा केला आहे. अमरावतीची रीलस्टार जोडी तन्वी काकड व बिपीन माहोरे यांनी साखरपुड्याचे फोटो व व्हिडीओ शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. अनेक वर्षांची मैत्री व ५ वर्षांच्या प्रेमानंतर दोघांनी घरच्यांच्या संमतीने लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.
बिपीन माहोरे व तन्वी काकड हे दोघेही सोशल मीडियावरील एक लोकप्रिय रीलस्टार आणि कंटेंट क्रिएटर आहेत. इन्स्टाग्राम आणि यूट्यूबवर त्यांची मोठी फॅन फॉलोइंग आहे. चाहत्यांकडून या जोडीला खूप पसंती मिळत होती. अशातच आता त्यांनी खऱ्या आयुष्यात साखरपुडा करत सर्वांना सुखद धक्का दिला. बिपीनने इन्स्टाग्रामवर एक रील पोस्ट करून त्याच्या व तन्वीच्या नात्याचा प्रवास सांगितला आहे.
बिपिन व तन्वीने २०२१ मध्ये एक व्हिडीओ एकत्र शूट केला होता. तेव्हा त्यांना कल्पनाही नव्हती की ते दोघे कंटेंट क्रिएटर म्हणून इतके लोकप्रिय होतील आणि एकेदिवशी खऱ्या आयुष्यात एकमेकांचे सोबती होतील. बिपिनच्या व्हिडीओमध्ये पहिल्या रीलची व त्यांच्या साखरपुड्याची झलक पाहायला मिळतेय.
बिपिन माहोरेची पोस्ट
“हा माझ्या लाइफमधला खूप मोठा दिवस आहे भाऊ
२०२१ पासून सुरू झालेल्या या सस्पेन्स जर्नीचा आज फायनली रिझल्ट लागला.
रिझल्ट तर आधीच लागणार होता… पण आम्ही बालवाडीतले लेकरं दिसत होतो
(म्हणजे वागण्यात अजूनही आहे म्हणा…)
पण सोडा… हा कॉमेडीचा विषय झाला…आजचा मुद्दा जरा सिरियस आहे
मी आणि माझी क्रश, फ्रेंड आणि बेस्ट फ्रेंड तन्वी काकड घरच्यांच्या आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने ऑफिशिअली इंगेज्ड झालो
हा आनंद असाच कायम राहो, अशी देवाजवळ मनापासून प्रार्थना करा
आणि आम्हा दोघांना व आमच्या संपूर्ण परिवाराला तुमचे आशीर्वाद द्या,” असं कॅप्शन बिपिन माहोरेने या व्हिडीओला दिलं आहे.
तन्वी काकड हिची पोस्ट
साध्या गप्पांनी सुरुवात केली होती आणि त्यांचं रूपांतर आठवणींमध्ये केलं आणि हळूहळू प्रेमात पडलो. प्रत्येक हास्यात, प्रत्येक भांडणात, प्रत्येक क्षणात आम्ही एकमेकांना निवडलं आणि आता आम्ही कायमस्वरुपी एकत्र राहणं निवडतोय, अशा आशयाचं कॅप्शन देत तन्वीने एक सुंदर व्हिडीओ पोस्ट केला आहे.
तन्वी व बिपिन साखरपुड्यात खूपच सुंदर दिसत होते. दोघांच्या साखरपुड्यातील फोटो व व्हिडीओंनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यांना या नवीन, सुंदर प्रवासासाठी त्यांचे चाहते शुभेच्छा देत आहेत.
