छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा.’ ही मालिका गेल्या १३ वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील स्टारकास्ट देखील सतत चर्चेत असते. काही कलाकारांनी या मालिकाला निरोप दिला तर काही कलाकार अजूनही प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. काही दिवसांपूर्वी मालिकेत रोशन सोढीची भूमिका साकारणारे अभिनेते गुरुचरण सिंह यांनी मालिका सोडली. सध्या ते काय करत आहेत हे जाणून घेण्यासाठी चाहते फार उत्सुक आहेत.

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत गेल्या १२ वर्षांपासून रोशन सोढीची भूमिका अभिनेते गुरुचरण साकारत होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी मालिका सोडली. गुरुचरण यांनी मालिका सोडल्यानंतर सर्वांना धक्काच बसला. पण मालिका सोडल्यानंतर गुरुचरण हे काय करत आहेत हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

आणखी वाचा : ‘तारक महेता…’मधील ‘हा’ कलाकार दिसणार बिग बॉस १५च्या घरात?

गुरुचरण सिंह यांनी नुकताच ‘आजतक’ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी मालिका सोडण्यामागचे कारण देखील सांगितले आहे. ‘जेव्हा मी ही मालिका सोडली तेव्हा यावर जास्त चर्चा झाली नाही. तारक मेहता का उल्टा चष्मा हा अप्रतिम शो आहे. आसित सर आणि संपूर्ण टीमचे अभिनंदन कारण मालिकेला १३ वर्षे पूर्ण झाली आहेत. या मालिकेमुळे मला स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करता आली. लोक मला आज पण रोशन सोढी या नावाने ओळखतात’ असे गुरुचरण म्हणाले.

आणखी वाचा : ‘मी घाबरले आणि राजला धक्का देऊन..’, शर्लिन चोप्राने केला खुलासा

पुढे ते म्हणाले, ‘माझ्या वडिलांची सर्जरी झाली. त्यामुळे मला त्यांच्यासोबत रहावे लागले. तसेच कुटुंबाशीसंबंधीत आणखी काही समस्या होत्या. त्यामुळे मला मालिका सोडावी लागली. मी जवळपास १२ वर्षे मालिकेत काम केले. त्यामुळे मला वाईट वाटले नाही. मी जवळपास दोन महिने यूएसमध्ये होतो. तेथे देखील मला लहान मुले सोढी काका म्हणून आवाज देत होते.’

गुरुचरण यांनी पुढे सांगितले की ते सध्या स्वत:ला वेळ देत आहेत. स्वत:मध्ये कोणत्या गोष्टींची कमतरता आहे यावर काम करत आहे. आई-वडिलांसाठी देखील काम करत आहे.