अनुष्का शर्माच्या आगामी चित्रपटाच्या सेटवर अपघात झाला असून सेटवरील वातावरणाला गालबोट लागलं आहे. ‘परी’ या चित्रपटाच्या सेटवर एका प्रकाशयोजना तंत्रज्ञाचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी शहाबे आलम नावाच्या या तंत्रज्ञाचा वीजेच्या तारेच्या संपर्कात आल्यामुळे शॉक लागून सेटवरच मृत्यू झाला.

‘काल एका दुर्दैवी घटनेमध्ये आमच्या सेटवरील प्रकाश योजना विभागामध्ये काम करणाऱ्या शहाबे आलम नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. बरेच प्रयत्न करुनही आम्ही त्यांचे प्राण वाचवू शकलो नाही. आम्ही संबंधित व्यक्तींसोबत सल्लामसलत करुन कुटुंबियांशी त्याच्या अंत्यसंस्कारासाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहोत. या कठिण प्रसंगी आम्ही त्यांच्या कुटुंबियांच्या पाठिशी आहोत’, असं ‘क्लिन स्लेट’ फिल्म्सच्या कर्णेश शर्मा यांनी एका पत्रकात म्हटलं.

वाचा : इस्लाममध्ये लग्नाची गाठ स्वर्गात बांधलेली नसते – शबाना आजमी

क्लिन स्लेट फिल्म्स ही निर्मिती संस्था अनुष्का शर्माची असून, कर्णेश शर्मा यामध्ये तिचे भागीदार आहेत. दरम्यान, मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्यासाठी चित्रपटाची टीम पुढे सरसावली असल्याचं कळतय. चित्रपटाच्या सेटवर अपघात होऊन गंभीर प्रसंग ओढवण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये. त्यातही अनेकजण त्या सेटवर विविध कामांमध्ये व्यग्र असल्यामुळे अपघात होणं टाळता येणं शक्य नाही. पण, निदान प्राथमिक काळजी घेत कलाकार, तंत्रज्ञ आणि इतर सर्वच लहानमोठ्या कामांना हातभार लावणाऱ्या व्यक्तींच्या सुरक्षिततेकडे लक्ष देण्याची गरज आहे हा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय.