scorecardresearch

Premium

मैत्रीतल्या जांगडगुत्त्याची विनोदी कथा

या चित्रपटातील तीन मित्रांच्या भूमिकेत आलोक राजवाडे, वैभव तत्त्ववादी आणि संकर्षण कऱ्हाडे असे तीन अभिनयाची भिन्न तऱ्हा असलेल्या कलाकारांनी एकत्र काम केलं आहे.

teen adkun sitaram marathi movie cast visit loksatta office for film promotion
हृषिकेश जोशी, चित्रपटातील तीन मित्रांपैकी एकाची भूमिका साकारणारा अभिनेता आलोक राजवाडे आणि अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी ‘लोकसत्ता’ कार्यालयाला भेट देत संवाद साधला.

जिवलग मित्रांच्या मौजमस्तीला वयाचं बंधन नसतं. त्यांच्या मस्तीचा त्रास अनेकदा त्यांच्या घरच्या मंडळींनाही होतो. मात्र परिणामांचा विचार न करता काही अवली मित्र असे असतात जे कोणालाही न जुमानता मनाला वाटेल ते करतात. अशाच तीन जिवलग मित्रांच्या गंमतीशीर मजामस्तीतून घडलेल्या जांगडगुत्त्याची गोष्ट प्रसिद्ध अभिनेते ह्रषिकेश जोशी दिग्दर्शित ‘तीन अडकून सीताराम’ या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. २९ सप्टेंबरला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाच्या निमित्ताने हृषिकेश जोशी, चित्रपटातील तीन मित्रांपैकी एकाची भूमिका साकारणारा अभिनेता आलोक राजवाडे आणि अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी ‘लोकसत्ता’ कार्यालयाला भेट देत संवाद साधला.

हेही वाचा >>> “तीन वर्ष मी…”; प्रार्थना बेहरेने सांगितलं लग्नानंतर चित्रपटात न दिसण्यामागचं कारण

sardari begum
सूर संवाद : श्रीमंत करणारा अनुभव!
nitin gadkri biopic
नितीन गडकरींचं आयुष्य मोठ्या पडद्यावर पाहता येणार; चित्रपटाचं पहिलं पोस्टर आलं समोर, प्रदर्शनाची तारीखही ठरली
Siddharth on being forced to leave Chithha event in Bengaluru
“मी पैसे खर्च करून…”, राजकीय वादातून आंदोलकांनी चित्रपटाचं प्रमोशन थांबवल्यावर अभिनेत्याची प्रतिक्रिया
ashutosh-gowariker-biopic
आशुतोष गोवारीकर सादर करणार भारतातील ‘या’ उत्तुंग व्यक्तिमत्त्वावरील बायोपिक; पोस्टरसह केली चित्रपटाची घोषणा

‘तीन अडकून सीताराम’ या नावामागची गंमत उलगडून सांगताना हा कोल्हापुरातील जुना आणि फार प्रचलित असलेला वाक्यप्रचार असल्याची माहिती हृषिकेश जोशी यांनी दिली. ‘विचित्र परिस्थितीत अडकलेल्या एखाद्याचे वर्णन करताना हा वाक्प्रचार वापरला जातो. चित्रपट लिहून पूर्ण झाल्यानंतर सुरुवातीला कामापुरतं म्हणून मी हे शीर्षक देऊन ठेवलं होतं. महाराष्ट्रातील अनेक लोकप्रिय वाक्प्रचारांप्रमाणे हेही लोकांच्या परिचयाचं असेल असं मला वाटलं होतं. प्रत्यक्षात ते ऐकल्यानंतर याचा अर्थ काय हे कोणालाच माहिती नाही असं लक्षात आलं. थोडंसं गमतीशीर आणि कोडय़ात टाकणारा हा वाक्प्रचार चित्रपटाचं शीर्षक म्हणून निर्मात्यांना ऐकवल्यावर त्यांनाही ते आवडलं आणि मग त्यावर एकमत झालं’ अशी आठवण हृषिकेश यांनी सांगितली.

आमच्या भूमिका..

या चित्रपटातील तीन मित्रांच्या भूमिकेत आलोक राजवाडे, वैभव तत्त्ववादी आणि संकर्षण कऱ्हाडे असे तीन अभिनयाची भिन्न तऱ्हा असलेल्या कलाकारांनी एकत्र काम केलं आहे. चित्रपटातील पात्ररचनेविषयी माहिती देताना आलोक म्हणाला, ‘वैभव आणि संकर्षण साकारत असलेल्या पात्रांचे वडील राजकारणात आहेत, मात्र ते एकमेकांचे कट्टर राजकीय शत्रू आहेत. यांची दोघांची घट्ट मैत्री आहेच आणि त्यांच्याबरोबर असलेल्या कौटिल्य (जी भूमिका मी केली आहे)  नावाच्या मित्राचे वडील हे शहरातील प्रतिष्ठित सीए आहेत. कौटिल्य या दोघांपेक्षा जरा वेगळा आणि त्यातल्या त्यात हुशार आहे’. या चित्रपटाच्या निमित्ताने हृषिकेश जोशींसारख्या उत्तम अभिनेत्याच्या दिग्दर्शनाखाली काम करायची संधी मिळाली. तो स्वत: अभिनयातला जाणकार असल्याने दिग्दर्शन करतानाही समोरच्या कलाकारातील बारकावे तो अचूक ओळखतो. त्याने दिलेल्या सूचना त्यामुळे खूप महत्त्वाच्या होत्या, असं आलोकने सांगितलं.

तर या तिघांबरोबर पहिल्यांदाच काम केलेल्या प्राजक्तानेही आलोकच्या म्हणण्याला पुष्टी देत एक उत्तम अभिनेता तुम्हाला दिग्दर्शक म्हणून लाभतो तेव्हा त्याच्या हाताखाली काम करताना खूप काही शिकायला मिळतं, अशी भावना व्यक्त केली. या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी म्हणून पहिल्यांदा झालेली लंडनवारी हाही आगळा अनुभव असल्याचं तिने सांगितलं.

हेही वाचा >>> “राजकारण आपल्या जागी असेल…”, विजू मानेंनी मुख्यमंत्र्यांसाठी शेअर केलेली पोस्ट चर्चेत; म्हणाले, “सामान्य जनतेशी…”

आणि राणी गेली..

परदेशात चित्रीकरण करणं हे नेहमीच आव्हानात्मक असतं, असं सांगताना मोजक्याच लोकांमध्ये काम करावं लागणं, अचानक बदलणारं हवामान, स्थानिक भौगोलिक, सामाजिक-राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन काम करणं अशा अनेक बाबींची काळजी घ्यावी लागते अशी माहिती हृषिकेश यांनी दिली. या चित्रपटाच्या बाबतीत घडलेला किस्साही त्यांनी सांगितला. चित्रीकरणासाठी लंडनला पोहोचलो आणि नेमके तेव्हाच राणी व्हिक्टोरियाचं निधन झालं. संपूर्ण लंडन बंद असल्याने हातावर हात धरून बसून राहण्याशिवाय काही पर्याय नव्हता, अशी आठवणही त्यांनी सांगितली.

विचारांना पुन्हा वलय मिळालं पाहिजे..

मराठी भाषा आणि मराठी चित्रपटांचे अवमूल्यन याबाबत सातत्याने बोललं जातं. याविषयी बोलताना मराठी परंपरा म्हणजे नेमकं काय याचा विचार झाला पाहिजे, असं मत आलोकने मांडलं. ‘मराठी परंपरांचं चित्रण करणाऱ्या वा महत्त्वाचं काही सांगू पाहणाऱ्या चित्रपटांना प्रेक्षक नेहमी येतात. मात्र परंपरा म्हणजे नेमकं काय? आपण कोणते कपडे घालतो, कोणती वाद्य वाजवतो एवढय़ापुरतं आपलं मराठी असणं मर्यादित झालं आहे. त्यापलीकडे महाराष्ट्रात जी थोर विचारवंतांची परंपरा होऊन गेली त्याचा विचार कोणालाच करावासा वाटत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साने गुरुजींसारख्या अनेक थोर व्यक्तींनी वैचारिकतेला वलय मिळवून दिलं होतं. आता विचारांऐवजी उथळपणा अधिक वलयांकित झाला आहे’ या वास्तवाकडे आलोकने लक्ष वेधलं.

‘महाराष्ट्राच्या या वैचारिक परंपरेचं वैश्विक मूल्य डोळय़ासमोर ठेवून काम केलं तर नवं चैतन्य येईल. मागच्या पिढीने जे केलं त्यालाच परंपरा न मानता मराठी असणं म्हणजे नक्की काय हे समजून घेऊन आपलं वागणं सुधारण्याची गरज आहे’ असं परखड मत त्याने व्यक्त केलं.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Teen adkun sitaram marathi movie cast visit loksatta office for film promotion zws

First published on: 24-09-2023 at 05:49 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×