मध्यंतरी एक ग्रुपवर ‘आरआयपी डॉ. श्रीराम लागू’ अशी पोस्ट आली. नुकतीच त्यांच्या कार्याला धरून एक भूमिका साकारल्याने क्षणभर हलले. चौकशी केल्यानंतर लक्षात आलं ती अफवा होती. त्यानंतर उगाच शांत बसले थोडा वेळ. भीती वाटली माणसाच्या कोरडेपणाची आणि नवल वाटलं, आज माणसाच्या आयुष्यापेक्षा सोशल नेटवर्किंग साइट्सवर सर्वप्रथम आरआयपी मी पोस्ट केलं यातच धन्यता आणि इतकीच समाजाप्रति आपलं कर्तव्य उरलं आहे का? सुख-दु:खाच्या व्याख्या बदलताहेत. आनंद ‘फिलिंग हॅपी’ आणि शोक ‘आरआयपी’ मध्ये उरलाय.

असो.. पण, या सगळ्यात प्रकर्षांने जाणवलेली आणखी एक गोष्ट म्हणजे एखादी बातमी सोशल साइटवर किती पटकन व्हायरल होऊन जाते. आज न्यूजपेपर आणि न्यूज चॅनल यांच्याही आधी ही माध्यमं बोलायला लागली आहेत. पण, या अशा प्रकारच्या माध्यमांमुळे बातम्यांमधली विश्वासार्हता कमी व्हायला लागली आहे. बरं! हे फक्त एखाद्याच्या जगण्या-मरण्यापर्यंत मर्यादित नाहीये. कारण विविध क्षेत्रांमधल्या विविध घडामोडींच्या बाबतीतही हेच आढळून येतंय.

मला मध्यंतरी एका प्रख्यात न्यूजपेपरमधून मोदींच्या सरकारकडून स्त्रियांसाठी राबवल्या जाणाऱ्या योजनांची विचारणा करण्यात आली आणि मी प्रांजळपणे इथे कबूल करते, त्या फोनवर ‘आज सेलिब्रिटी म्हणून बोलताना आपण किती जास्त जबाबदारीने बोललं पाहिजे’ या जाणिवेतून पटकन मी असं म्हणाले, ‘मला माफ करा; पण या विषयावर भाष्य करण्याइतपत माहिती मला नाहीये. त्यामुळे उगाचच मला फार माहितीये आणि मी माझं मत देतेय हा आविर्भाव चुकीचा ठरेल.’ फोन करणाऱ्यानेही माझी अडचण समजून घेऊन फोन ठेवला.

मी माझ्या रोजच्या कामाला लागले. पण, मनात कुठे तरी एक सल निर्माण झाली. स्वत:चा रागही येऊ लागला. आज आपण ज्या समाजाचा घटक म्हणवतो स्वत:ला, त्या समाजातली महत्त्वाची घडामोड ही आपल्याला माहितीच नसावी. मग कुठल्या अधिकाराने एखाद्या नेत्याबद्दलच्या फॉरवर्डेड मेसेजेसना विनोद म्हणून घेऊन हसावं आपण?

आज मी खूप व्यग्र आयुष्य जगतेय. खूप तास काम करीत असते; असं म्हटल्यावर कुठे तरी नकळत वेळापत्रकातल्या काही गोष्टी करायच्या राहून जातात आणि त्यातही स्वत:मध्ये व्यग्र असलेली ‘मी’, ‘हे नाही केलं तरी चालेल’ या यादीमध्ये बातम्या बघणं किंवा वाचणं सगळ्यात पहिल्या नंबरवर ठेवून जगतेय. आयुष्यात काही तरी विधायक करायचं राहून जातंय, याची जाणीवही दूरदूपर्यंत मेंदूला स्पर्शू देत नाहीये; असं लक्षात आलंय माझ्या.

या बातम्यांच्या संदर्भावरून मी एकदम माझ्या लहानपणच्या आठवणीत जाऊन पोहोचले. त्या वेळी संध्याकाळी खेळून सात वाजता घरी येण्याच्या बाबतीत आई आग्रही असायची. मग हात-पाय-तोंड धुवून येऊन हॉलमध्ये आई-बाबा, आजी-आजोबा यांच्याबरोबर बसून, मनात कितीही ‘कार्टून नेटवर्क’ बघायचं असलं तरीही दूरदर्शनच्या सातच्या बातम्या पहाणं, समाजाशी परिचित राहणं, मग घटना आणि दुर्घटनांचा आढावा घेणं, दिवसभरातल्या घडामोडींबद्दल एकमेकांशी संवाद साधणं हे आजही आठवतंय. त्या वेळच्या बातम्या रोज एका पैशाने माझं ज्ञान वाढवत होत्या. त्या बातम्या ७.२० ला संपल्या की मग देवाने आपल्याला, आपल्या समाजाला, आपल्या देशाला आजही सुखरूप ठेवलंय. यासाठी देवघरात बसून ‘शुभंकरोति’ म्हणत त्याचे नित्यनियमाने मी आभार मानायचे. ही सगळी दिनचर्या आठवली तेव्हा लक्षात आलं, माझ्या, ‘हे नाही केलं तरी चालेल’च्या लिस्टमध्ये घरच्यांशी संवाद आणि तेव्हाची ‘शुभंकरोति’ याचीही नकळत भर पडली आहे.

आज मोठमोठय़ा सेमिनार्समधून, वर्कशॉप्समधून मोठी भरगच्च रक्कम घेऊन शिकवलं जाणारं ‘पॉझिटिव्ह थिंकिंग फॉर पॉझिटिव्ह लिव्हिंग’ हे खरंतर लहानपणी आजी-आजोबांच्या सहवासात, त्या मंद तेवत राहणाऱ्या वातीसमोर बसूनच शिकले होते मी. कारण त्या वेळी परीक्षेत मार्क मिळवणं, गृहपाठ, मित्रमैत्रिणी, सोसायटीमधली लुटुपुटुची भांडणं; थोडक्यात लहानपणी उभ्या ठाकणाऱ्या समस्या देवबाप्पासमोर बसल्यावर डोक्यातून थोडा वेळ का होईना खरंच निघून जायच्या आणि आई-बाबा, आजी-आजोबा, काळजी घेणारी बहीण यांच्या सहवासात किती जास्त सुरक्षित आणि निर्धोक वाटायचं. तेव्हा नकळत मनंही ग्वाही द्यायचं ‘सगळं सुरळीत आहे’ याची. झालं की नाही आयुष्य पॉझिटिव्ह! आणि आज समाजात उघडय़ा डोळ्यांनी वावरतेय, असा स्वत:मध्ये आभास निर्माण करू पाहणारी मी खरं तर त्या वेळी आई-बाबांच्या छत्रछायेखालीच या सातच्या बातम्या पाहत समाजाच्या जास्त जवळ आणि अपडेटेड होते. कारण त्या वेळी ‘हे न करून चालणार नाही,’ हे अधिकारवाणीने सांगणाऱ्या आई-बाबांच्या शब्दांचा धाक वाटायचा. अर्थात आजही त्यांच्या शब्दांना मान आहेच. पण व्यवधानं वाढली आहेत ना माझी. आणि मला पंखही फुटलेत. त्यामुळे त्या वेळचा त्यांचा अधिकार आज कधी तरी बंधन वाटून जातो.

पण, त्या दिवशीच्या त्या फोनने पुन्हा एकदा लहानपणचे धडे, संस्कार आणि आई-बाबांची अधिकारवाणी हे सगळं रोजच्या जगण्यात कसं गरजेचं आहे याची आठवण करून दिली आहे. हा! आता आजचा काळ काही सात वाजता घरी पोहोचण्याचा उरलेला नाहीये. म्हणजे शक्य होत नाही तसं. पण, त्या वेळची सात ते साडेसात ही ‘तीस मिनिटे’ नक्कीच आजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपण काढू शकतो; हे पटलंय मला. त्यामुळेच वीस-पंचवीस मिनिटांच्या बातम्या आणि पाच मिनिटांचा परवचा जमेलच की. दशकं बदलताहेत आणि काळही पुढे धावतोय. पण न्यूजपेपर, न्यूज चॅनल आपल्याला समृद्ध  करायला आणि परवचा आपल्यामध्ये संस्कार पेरायला आजही तिथेच आहेत. कारण आजच्या लखलखाटातही देवघरातल्या निरांजनामध्ये मंद तेवत घर उजळवण्याएवढं सामथ्र्य आहेच की!

म्हणूनच मी ठरवून टाकलंय की आता खरंच माझ्या, ‘हे केलंच पाहिजे’च्या यादीमध्ये ‘त्या तीस मिनिटांचा’ मी समावेश केला आहे. सो.. आता नियमितपणे वर्तमानपत्र माझ्याबरोबर असतं आणि प्रवासात, कामात, वेळ मिळेल तसतसं ते मला साथ करतं. एखाद्या विषयावर भाष्य करण्यासाठी त्या विषयाबद्दलची माहिती मला हा माझा नवा सवंगडी सतत देत राहतो आणि मग दिवस संपवून समाधानाने घरी परतलेली मी आजी-आजोबांना स्मरून आणि आई-बाबांची आठवण काढून शांत मनाने ‘घरातली पीडा बाहेर जावो, बाहेरची लक्ष्मी घरात येवो, घरच्या धन्याला उदंड आयुष्य लाभो’ हा परवचा म्हणूनच माझ्या दिवसाची सांगता करते.
तेजश्री प्रधान – response.lokprabha@expressindia.com