‘बिग बॉस’ Big Boss 11 या रिअॅलिटी शोचा मुख्य उद्देश आहे प्रेक्षकांचे मनोरंजन. पण, या वादग्रस्त रिअॅलिटी शोच्या ११ व्या पर्वात अगदी पहिल्या दिवसापासून मनोरंजनाच्या नावावर वारंवार होणारे वादच समोर येत आहेत. सर्वसामान्य आणि सेलिब्रिटी स्पर्धकांचा सहभाग असणाऱ्या या घरात सध्या सर्वाधिक चर्चेत असणारा वाद म्हणजे विकास गुप्ता आणि शिल्पा शिंदे यांचा.

‘बिग बॉस’च्या घरात अगदी पहिल्या दिवसापासूनच या दोघांमध्ये बरेच खटके उडाल्याचे पाहायला मिळाले. इतकच नव्हे तर, शिल्पाचे टोमणे ऐकून त्रासलेल्या विकासने ‘बिग बॉस’च्या घरातून पळण्याचाही प्रयत्न केला होता. शिल्पा आणि विकासमध्ये आरोप प्रत्यारोपांचं सुरु असणारं हे सत्र पाहून शिल्पाच्या या वागण्याविषयी अनेकांनीच सोशल मीडियावर नाराजीही व्यक्त केली. त्यामध्ये टेलिव्हिजन अभिनेत्री काम्या पंजाबीचाही समावेश आहे. ट्विटरवर शिल्पाच्या फॅन क्लबसोबतही काम्याचे खटके उडाले असून तिने एक सूचक ट्विट केलं आहे. ‘तुमच्या मॅडमना सांगा, की जर तिचं हे वागणं असंच सुरु राहिलं तर आयुष्यभर तिला घरातच राहावं लागेल’, असं ट्विट तिने केलं.

वाचा : अभिनयाव्यतिरिक्त बॉलिवूडकरांचे ‘हे’ आहेत ‘इन्कम सोर्स’

काम्याने ‘बिग बॉस’च्या घरातील स्पर्धक विकास गुप्ताची बाजू घेत एक ट्विट केलं. यामध्ये तिने म्हटलं, ‘घरी बसल्या बसल्या जर कोणी असे होत असेल तर देवाने कधी कोणाला घरी बसवू नये’. काम्याच्या या ट्विटनंतर ‘बिग बॉस’च्याच गेल्या पर्वातील स्पर्धक असलेल्या सुयश रायनेही निराशाजनक ट्विट केलं. शिल्पाच्या वागण्याविषयी अनेकांनीच नाराजी व्यक्त केली असून, तिचा नेमका हेतू काय आहे, असाच प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे. शिल्पाच्या या वागण्याविषयी ‘स्पॉटबॉय ई’कडे व्यक्त होताना काम्या म्हणाली, ‘कोणत्या वेळी काय बोलावं आणि काय बोलू नये हे तिला कळत नाही. विकासची प्रकृती ठिक नसताना ज्या पद्धतीने शिल्पा त्याच्याशी वागली होती ते अत्यंत निराशाजनक होतं.’ सध्या ‘बिग बॉस’च्या घरातून येणारी प्रत्येक चर्चा बातमी स्वरुपात सर्वांसमोर धडकत आहे. त्यामुळे येत्या काळात या घरात आणखी किती खटके उडणार हे जाणून घेण्याकडेच अनेकांचं लक्ष लागलं आहे.

Story img Loader